ठक!
सारे ठरून गेले हे नाटकाप्रमाणे !
मी नोकराप्रमाणे; तू मालकाप्रमाणे !

छोटा तुझ्यापुढे मी...पण यामुळेच मोठा...
दारी तुझ्या न आलो मी याचकाप्रमाणे !

नाही तुझी मिळाली पाठीस स्पर्शमाया...
फटकारलेस तूही मज चाबकाप्रमाणे !

ओथंबलीसही तू ! खोळंबलीसही तू !
केली न मी प्रतीक्षा पण चातकाप्रमाणे !

काळास कोणत्याही मी बांधला न गेलो...
मी चाललो कधी का कुठल्या शकाप्रमाणे ?

मी एवढा न साधा; मी एवढा न सोपा...
वाचू नये कुणीही मज पुस्तकाप्रमाणे !

फसलो जिथे तिथे अन् परिणाम हा असा की -
मी भेटतो मलाही आता ठकाप्रमाणे !!

-- प्रदीप कुलकर्णी

प्रतिसाद

हे तीन शेर फारच सुंदर आहेत.

ठक आणि शक - मस्तच शेर!!