वाटले सरली प्रतिक्षा...

वाटले सरली प्रतिक्षा भेटलीस तेंव्हा
अन् सुरू झाली परीक्षा बोललीस तेंव्हा

मापही पडले थिटे की लाजले कळेना
अंतरे अपुल्या मनाची मोजलीस तेंव्हा

सर्व सांभाळून होतो आजही तसे, पण...
काळजाचा तोल गेला लाजलीस तेंव्हा

झाकलेली मूठसुद्धा वाटली हवीशी
थाप प्रेमाच्या भुकेची मारलीस तेंव्हा

तीर अलगद काळजाच्या आरपार गेला
फक्त माझ्या चाहुलीने थांबलीस तेंव्हा

मुरविलेल्या आसवांना आज पाट फुटला
तू उधारी जन्मभरची फेडलीस तेंव्हा

गझल: 

प्रतिसाद

सर्व सांभाळून होतो आजही तसे, पण...
काळजाचा तोल गेला लाजलीस तेंव्हा

उत्तम शेर....

मुरविलेल्या आसवांना आज पाट फुटला
तू उधारी जन्मभरची फेडलीस तेंव्हा

व्वा....

झाकलेली मूठसुद्धा वाटली हवीशी
थाप प्रेमाच्या भुकेची मारलीस तेंव्हा

हा शेर जरा फसलेला जाणवतोय.....
कारण, प्रेमाच्या भुकेची थाप = झाकलेली मूठ हे समीकरण ......पटत नाही....कदाचित मला शेर उमगला नसावा.

डॉ.कैलास

अजयजी, छान ग़ज़ल....
फक्त " सरली प्रतिक्षा " येथे कोठ्ले वज़न धरावे ही शंका.
( गा ल गा गा - गा ल गा गा - गा ल गा - ल गा गा )? बाकी बेह्तरीन ग़ज़ल....
` ख़लिश '/९-४-२०१०.

हा हा हा हा
कैलास,
तुम्हाला अर्थ कळला नाही हेच खरे..! बाकी धन्यवाद.

खलिश,
तुम्ही दिलेला लघु-गुरू क्रम बरोबर आहे. तेच वजन धरा. धन्यवाद.

सर्व सांभाळून होतो आजही तसे, पण...
काळजाचा तोल गेला लाजलीस तेंव्हा

या ऐवजी..

सर्व सांभाळून होतो आजही तसे, पण...
संयमाचा तोल गेला लाजलीस तेंव्हा..

असे लिहिल्यास?...अर्थात निर्णय आपलाच.....

डॉ.कैलास

कैलास,
काळजाचा ऐवजी संयमाचा कशाला घ्यायचे? उगाचच..? वेळ जात नाही म्हणून..?

गझल आवडली. तीर आणि तोल अप्रतिम!

धन्यवाद क्रांति.

मस्त गझल. सर्वच शेर आवडले.

झाकलेली मूठसुद्धा वाटली हवीशी
थाप प्रेमाच्या भुकेची मारलीस तेंव्हा

तीर अलगद काळजाच्या आरपार गेला
फक्त माझ्या चाहुलीने थांबलीस तेंव्हा

हे दोन आवडले..