नको नको त्या शंका मजला शहर विचारत होते

नको नको त्या शंका मजला शहर विचारत होते
खुले खुले रस्ते होते पण धक्के लागत होते

उगाच का दवबिंदू सगळे खिन्न थरारत होते !
कुठेतरी डोळ्यात रात्रभर अश्रू जागत होते

आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते

कुणीतरी बाहेर असे जे धीर देउनी गेले
कुणीतरी अंतरी असे जे शंका काढत होते

ते तर होते आपलेच घर लागली ज्याला
तेही होते आपलेच जे आगी लावत होते

एक कुणी दैवी कोलाहल अवतरलेला आहे
महान बहिरे पुढ्यात त्याच्या डोके टेकत होते

तिकडे गेले होते त्यांची वाफच झाली नाही
आणि इकडे होते त्यांचे झरेच आटत होते

--चंद्रशेखर सानेकर.

(साक्षात, जाफेमा, २००७)

प्रतिसाद

आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते
कुणीतरी बाहेर असे जे धीर देउनी गेले
कुणीतरी अंतरी असे जे शंका काढत होते
एक कुणी दैवी कोलाहल अवतरलेला आहे
महान बहिरे पुढ्यात त्याच्या डोके टेकत होते
हे मस्त.
तिकडे गेले होते त्यांची वाफच झाली नाही
आणि इकडे होते त्यांचे झरेच आटत होते
हा हासिल शेर. हा कशाचा वर्षाव आहे....?
सानेकरांची ही गझल म्हणजे प्रतिभेचा सशक्त प्रवाह आहे.


आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते

काय मतला आहे. अख्खी गझल फार आवडली.

तिकडे गेले होते त्यांची वाफच झाली नाही
आणि इकडे होते त्यांचे झरेच आटत होते
उच्च.

नको नको त्या शंका मजला शहर विचारत होते
खुले खुले रस्ते होते पण धक्के लागत होते

आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते

ते तर होते आपलेच घर (---) लागली ज्याला
तेही होते आपलेच जे आगी लावत होते
माझ्या मते या ठिकाणी 'आग' असा शब्द हवा आहे.
ते तर होते आपलेच घर आग लागली ज्याला
तेही होते आपलेच जे आगी लावत होते               व्वा!
एक कुणी दैवी कोलाहल अवतरलेला आहे
महान बहिरे पुढ्यात त्याच्या डोके टेकत होते      व्वा!   महान बहिरे.. व्वा!
उगाच का दवबिंदू सगळे खिन्न थरारत होते !
कुठेतरी डोळ्यात रात्रभर अश्रू जागत होते           व्वा!
तिकडे गेले होते त्यांची वाफच झाली नाही
आणि इकडे होते त्यांचे झरेच आटत होते
या ठिकाणी 'आणि' हा दीर्घ 'आणी' करावा लागतोय. अन्यथा मात्रा जुळत नाहीत. किंवा..
अन् जे इकडे होते त्यांचे झरेच आटत होते     ....असे काही करता येईल.
मूळ काय आहे मला माहित नाही. इथे जे दिसले त्यावरून सांगितले.

कलोअ चूभूद्याघ्या

आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते...

आपल्या शहराची फारच सुन्दर ओळख दिली आहे.