इकडे कुठे रे आज... या भागात?
इकडे कुठे रे आज या भागात आनंदा?
आहेस चुकलेलाच तर.... ये आत आनंदा
ये, बैस आल्यासारखा..... दु:खे, चहा काही?
मीही कधी जगणार आनंदात आनंदा?
कायमस्वरूपी बांधकामे वेदनांसाठी
परवानगी नाही तुला हृदयात आनंदा
मागेन जेव्हा हात मी..... वाटेल एकाकी
दिसशील का तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदा?
अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा
केव्हातरी कोठेतरी रस्त्यात दिसलेलो
कोणीतरी ठेवेल का लक्षात आनंदा?
तू पाहिला होतास तो मी 'बेफिकिर' नाही
जगण्या तुझ्यावाचून आरामात आनंदा
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 22/03/2010 - 18:30
Permalink
छान...... इकडे कुठे रे आज या
छान......
इकडे कुठे रे आज या भागात आनंदा?
आहेस चुकलेलाच तर.... ये आत आनंदा
मतला मस्त गुनगुणता येतो.....
डॉ.कैलास
ज्ञानेश.
मंगळ, 23/03/2010 - 11:47
Permalink
मागेन जेव्हा हात मी.....
मागेन जेव्हा हात मी..... वाटेल एकाकी
दिसशील का तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदा?
खूप सुंदर शेर आहे हा !
मतलाही वेगळा आणि प्रभावी वाटला.
चित्तरंजन भट
मंगळ, 23/03/2010 - 11:54
Permalink
ये, बैस आल्यासारखा.....
ये, बैस आल्यासारखा..... दु:खे, चहा काही?
मीही कधी जगणार आनंदात आनंदा?
खालची ओळ छान! माझ्यामते दुःखांसोबत चहा काही जात नाही. व्यथा चालून गेले असते. (अर्थात चहामुळे तरतरी येते ही गोष्ट निराळी)
एकंदर छान आहे गझल. लहजा आवडला विशेषतः.
बेफिकीर
मंगळ, 23/03/2010 - 14:04
Permalink
कैलास, ज्ञानेश व चित्त!
कैलास, ज्ञानेश व चित्त!
सर्वांचे मनापासून आभार!
चित्तरंजन,
मला व्यथा सुचायला हवे होते. आपण लिहिल्यानंतर असे वाटले की हा शब्द का नाही सुचला आपल्याला. आणि नंतर असेही वाटले की 'चहा वगैरे' मधे जो पाहुणचाराचा संकेत आहे तो 'दु:खे, व्यथा काही?' मधून स्पष्ट झाला असता की नाही वगैरे! मात्र चहा दु:खांसोबत काही जात नाही हे खरे. व्यथा सुचायला हवे होते.
मनापासून धन्यवाद!
अजय अनंत जोशी
मंगळ, 23/03/2010 - 20:53
Permalink
अगदी सहज भेटायचे असले तरच
अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
ही ओळ छान.
बाकी चहा-कॉफी वगैरे जाऊदे, फारशी पकड घेत नाही गझल.
खलिश
बुध, 24/03/2010 - 09:11
Permalink
" अगदी सहज भेटायचे असले तरच
" अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा "
हा शे`र आवडला.छान लहजा.. छान ग़ज़ल...
` ख़लिश ' - वि. घारपुरे / २४-०३-२०१०.
वैभव जोशी
बुध, 24/03/2010 - 13:29
Permalink
छान आहे पण सहज लहजा सुध्दा
छान आहे पण
सहज लहजा सुध्दा ओढून ताणून आणल्यासारखी शब्दरचना वाटते. दैनंदिन वापरातले शब्द आणल्याने गझल सहज सुलभ होते असे वाटत नाही. कदाचित सादरीकरणाने होणारा परिणाम पण गझल पूर्ण होण्याआधीच विचारांमधे अंतर्भूत झाला असावा.
ये, बैस आल्यासारखा..... दु:खे, चहा काही?
मीही कधी जगणार आनंदात आनंदा?
(दु:खे ,चहा एकत्र जात नाहीत हे चित्त ने लिहीलेच आहे त्यामुळे त्याला पुन्हा उकळी नको)
समजा जरी ते एकत्र जात असते तरीही पहिल्या ओळीत कुठेही कुणी जिवाभावाचे आल्याचे स्पष्ट होत नाही. आल्यासारखे बसा हे इलाज नसतानाही म्हणावे लागते. ना?
अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा
असलेच तर भेटू? असे जास्त योग्य नाही वाटत?
बेफिकीर
बुध, 24/03/2010 - 19:14
Permalink
अजय व
अजय व खलिश,
धन्यवाद!
वैभव,
विचार करायला प्रवृत्त केल्याबद्दल खरच आभार! जिवाभावाचे - हा मुद्दा पटला. 'असलेच' हा मुद्दा जरा पटला नाही. मला अभिप्रेत 'च' सहज या शब्दाशी लिंक्ड असायला हवा होता. 'असलेच' या शब्दात तो आल्यास 'भेटायचे' या शब्दाशी लिंक होईल की काय असे वाटले. पण पुन्हा बघतो.
धन्यवाद!
ऋत्विक फाटक
गुरु, 25/03/2010 - 20:01
Permalink
गझल ठीक वाटली, दैनंदिन
गझल ठीक वाटली,
दैनंदिन वापरातले शब्द आणल्याने गझल सहज सुलभ होतेच असे वाटत नाही.
हे मनापासून पटले.
चित्तरंजन भट
गुरु, 25/03/2010 - 08:49
Permalink
'ओढूनताणून'ता देखील सापेक्ष
'ओढूनताणून'ता देखील सापेक्ष असते. एका कवीला इतर कवींनी वापरलेली/केलेली गिमिक्स लक्षात येणे स्वाभाविक आहे. उदा. "इकडे कुठे रे" हा तुकडा. ह्यातला 'रे'. असे अनेक तुकडे कवी वापरत असतात. त्यांचा अभ्यास मजेदार होईल.
अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा
बहुधा तालावर म्हणायचे असावे. (मागच्या वेळेस हे लिहायचे राहून गेले होते.)
बाय द वे
कायमस्वरूपी बांधकामे वेदनांसाठी
परवानगी नाही तुला हृदयात आनंदा
हा शेर चांगला बांधला आहे.
अजय अनंत जोशी
गुरु, 25/03/2010 - 09:03
Permalink
वैभव, दैनंदिन वापरातले शब्द
वैभव,
दैनंदिन वापरातले शब्द आणल्याने गझल सहज सुलभ होते असे वाटत नाही.
यावर कदाचित मतभेद होईल. कारण, सुलभता ही व्यक्तिसापेक्ष असेल. कोणाला जमेल, कोणाला नाही. कदाचित वेगळ्या वृत्ताचा वापर केल्यास आणखी सुलभ होवू शकली असती.
दैनंदिन वापरातले शब्द आणल्याने त्या शब्दांची संख्या, आपण निवडलेले वृत्त याची योग्य सांगड घालता आली तरच ते काव्य चांगले आणि सहज होईल असे वाटते. कारण, दैनंदिन वापरातले शब्द बर्याचवेळा फारसे काही सांगून जात नाहीत. त्यामुळे ती स्पेस वाया गेली की काय? असेही वाटू शकते.
चित्तरंजन,
'ओढूनताणून'ता देखील सापेक्ष असते. एका कवीला इतर कवींनी वापरलेली/केलेली गिमिक्स लक्षात येणे स्वाभाविक आहे. उदा. "इकडे कुठे रे" हा तुकडा. ह्यातला 'रे'. असे अनेक तुकडे कवी वापरत असतात. त्यांचा अभ्यास मजेदार होईल.
या आपल्या मताशी सहमत.
बेफिकीर
गुरु, 25/03/2010 - 09:44
Permalink
सुखा? इकडे कुठे तू आज? सगळे
सुखा? इकडे कुठे तू आज? सगळे ठीक आहे ना?
मला भेटायचे नाही असा लैकीक आहे ना?
असा काहीतरी मतला मूळ स्वरुपात मनात होता. पण तो मलाच पटला नव्हता. आनंद ही रदीफ सुचल्यावर सहज म्हणून एक दोन शेर करून पाहिले. मूळ आठवलेली ओळ म्हणजे 'इकडे कुठे रे आज, या भागात, आनंदा'! त्यानंतर 'मीही कधी जगणार आनंदात आनंदा'! बाकी अर्थातच कल्पनाविलास!
पण! वरील प्रतिसादांमधील नेमका अर्थ मला समजला आहे याबाबत मी 'शुअर' नाही. पण जर 'रे' हा शब्द ओढून ताणून आला आहे असे मत पडत असेल तर व्यक्तीश: मला ते पटले नाही. (अर्थातच, सर्व मतांचा आदर आहे.) पण अगदी शाळेतला वगैर कधीच फारसा न भेटणारा मित्र अचानक आपल्या रोजच्या पान टपरीपाशी वगैरे भेटतो तेव्हा आपण सहज म्हणून जातो 'इकडे कुठे रे आज?'
असो. शेर चांगला बांधला आहे हा चित्त यांचा मार्मिक प्रतिसादही आवडला.
सर्वांचे धन्यवाद!
वैभव देशमुख
गुरु, 25/03/2010 - 11:27
Permalink
" अगदी सहज भेटायचे असले तरच
" अगदी सहज भेटायचे असले तरच भेटू
नाचायला लावू नको तालात आनंदा "
गझल आवड्ली....