...काय करू मी ?


...काय करू मी ?


सांग जगू की सांग मरू मी...काय करू मी ?
काय करू मी...काय करू मी...काय करू मी ?


एकच सांगावेस कराया...शक्य मला जे -
बोल, स्मरू की तुज विसरू मी... काय करू मी  ?


झेप कशी घेऊ...? गगनाची सक्त मनाई... !
पंख अता कोठे पसरू मी...काय करू मी ?


का जम कोठेही न बसे...बस्तान बसेना...
कायमचा का होतकरू मी...काय करू मी ?


स्वप्न कितीदा तेच बघू मी रोज नव्याने ?
रंग कितीदा तेच भरू मी...काय करू मी ?


सोबत घेऊ आज कुणाला....दूरच सारे...
हात कुणाचा सांग धरू मी...काय करू मी ?


गाव कसा... येथे घर नाही वा पडवीही...
हे न कळे कोठे उतरू मी...काय करू मी ?


रोज खुणावे एक अनोखी वाट परंतू...
- थांबवलेला वाटसरू मी...काय करू मी ?


आवड आहे काय तुझी ते सांग मला तू...!
पूर बनू की संथ झरू मी...काय करू मी ?


मान्यच आहे, आजवरी होतो वठलेला...
काय नको आता बहरू मी...काय करू मी ?


- प्रदीप कुलकर्णी


गझल: 

प्रतिसाद

प्रदीपराव, सुंदर ग़ज़ल! होतकरू, उतरू, वाटसरू, झरू विशेष आवडले.
रोज खुणावे एक अनोखी वाट परंतू...
वा!

प्रणवरावांशी सहमत. 
स्वप्न कितीदा तेच बघू मी रोज नव्याने ?
रंग कितीदा तेच भरू मी...काय करू मी ?हादेखील फार आवडला.

चित्तरंजन यांच्याशी पूर्णपणे सहमत!

रोज खुणावे एक अनोखी वाट परंतू...
- थांबवलेला वाटसरू मी...काय करू मी ?

का जम कोठेही न बसे...बस्तान बसेना...
कायमचा का होतकरू मी...काय करू मी ?
**** सुंदर गझल !

सोबत घेऊ आज कुणाला....दूरच सारे...
हात कुणाचा सांग धरू मी...काय करू मी ?
मान्यच आहे, आजवरी होतो वठलेला...
काय नको आता बहरू मी...काय करू मी ?

सुंदर गझल. मला निफाडकर यांची एक गझल आठवली

करुनही काय मी करु तू तिथे इथे मी
कसा तुझा हात मी  धरु तू तिथे इथे मी

वठून गेल्यावरी मला का दिल्यास हाका
कसा अता सांग मोहरु  तू तिथे इथे मी
स्वप्नमेण्यात आहे ती. मस्त.

'काय करू मी...?' फारच सुंदर गझल आहे. अभिनंदन!!!!
संतोष कुलकर्णी

सुंदर ग़ज़ल . आवडली.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दाद-प्रतिसाद देणाऱ्या  सर्वांचे  अगदी मनापासून आभार...!

पंख, होतकरू, वठलेला आणि पूर हे शेर विशेष आवडले!!
-- पुलस्ति.

कायमचा होतकरू मी
हा शेर सर्वाधिक आवडला.

प्रदीप,
सुंदर गझल... मतला फारच आवडला. (माझं आधी लिहिलेलं वाक्य पुनः एकदा - सुंदर वेगळी रदीफ!)
कायमचा का होतकरू मी...काय करू मी ? - वा! हा मिसरा आणि मक्ताही आवडले.
बोल, स्मरू की तुज विसरू मी... काय करू मी  ? आणि 'पंख अता' - हे मिसरे थोडे कमी सहज वाटले..कदाचित 'अता' या (मला खटकणार्‍या) शब्दप्रयोगामुळे असेल.
- कुमार