इथे असतीस तर तू.....

किती बर्फाळलेला क्षण... इथे असतीस तर तू?
उबेला आपले आपण... इथे असतीस तर तू...

हिमाच्छादीत शिखरांनी स्वतःला रमवतो मी
मला नसतेच हे कारण... इथे असतीस तर तू

ऋतूंनी ग्रीष्म बेमालूम गोठवलाच असता
वसंताच्या पुढे श्रावण... इथे असतीस तर तू

तुझी पूजा, गुलामी, प्रार्थना, वरदान, शिक्षा
इथे नसतीस निष्कारण..... इथे असतीस तर तू

स्मृती कवटाळुनी सार्‍या..... तुला स्वप्नांमधे मी
कसे करणार पाचारण इथे असतीस तर तू?

सुरक्षेवीण हे लावण्य कोणी मागते का?
स्वतः असतोच मी तारण इथे असतीस तर तू

अताशा 'बेफिकिर' वाचाळतो आहे स्वतःशी
असे नसतेच संभाषण इथे असतीस तर तू

टीप - यमकानुसारी गझल!

गझल: 

प्रतिसाद

हिमाच्छादीत शिखरांनी स्वतःला रमवतो मी
मला नसतेच हे कारण... इथे असतीस तर तू

ऋतूंनी ग्रीष्म बेमालूम गोठवलाच असता
वसंताच्या पुढे श्रावण... इथे असतीस तर तू
सुंदर!

मतलाही चांगला झालाय,
गझलेची लय खूप छान आहे.. तुम्ही गुणगुणतच गझल लिहिलेली दिसते.

तुझी पूजा, गुलामी, प्रार्थना, वरदान, शिक्षा
इथे नसतीस निष्कारण..... इथे असतीस तर तू

हे काही कळलं नाही.. पुन्हा वाचल्यावर कळेल कदाचित!

छानच आहे हो गझल.
(आधी वाचतांना माझ्याकडून 'इथे असतीस तू तर' असेच वाचले गेले. आणि मला ते जास्त सहज वाटले.)

सुरेखच !!
ज्ञानेश शी सहमत !! "इथे असतीस तू तर" हे जास्त स्वाभाविक वाटलं !!

तारण, पाचारण, श्रावण, कारण......अगदी मस्तच उतरले आहेत..........!!

छान आहे गझल.
आवडली.

सर्वांचे आभार!

हिमाच्छादीत शिखरांनी स्वतःला रमवतो मी
मला नसतेच हे कारण... इथे असतीस तर तू
छान.

ऋतूंनी ग्रीष्म बेमालूम गोठवलाच असता
वसंताच्या पुढे श्रावण... इथे असतीस तर तू

सुरक्षेवीण हे लावण्य कोणी मागते का?
स्वतः असतोच मी तारण इथे असतीस तर तू
हे समजले नाही.

खुप आवडली. श्रावण आवडले.