कवी

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिशा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

कुणी म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे निखारताहे!

गझल: 

प्रतिसाद

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

व्वा!

गुमान आणि कवी सुंदर शेर..!
असाच जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
या ओळीत दिशा असे हवे होते का? कदाचित ही टायपोग्राफिकल मिस्टेक असेल असे वाटते. 'कोणाच्या' लक्षात नाही आले म्हणून मी सांगितले. करता आले तर पहा...

'दिशा' ऐवजी चुकून दिसा टाइप झालं.. क्षमस्व!
आता संपादनाचा पर्याय दिसत नाहीये... विश्वस्तांना विनंती की जमल्यास त्यांनी 'सा' चा 'शा' करावा!

ऋत्विकजी,
छान गज़ल.सगळेच शेर आवडले.
` ख़लिश ' - वि. घारपुरे. १५-०३-२०१०.

खुप आवडली. गुमान आवडले.

गुमान आणि कवी सुंदर शेर विशेष आवडले.
बाकी गझल सुंदर.

बेफिकीर, अजयजी, खलिश, प्रताप व गंगाधरजी सर्वांचे आभार!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

वा!

एकंदर छानच. 'ताहे' ची कानांना सवय नसल्याने कानांना खटकताहे.

धन्यवाद, चित्तरंजनजी!

अजून एक शेर...

फिरून आलो तमाम सारी पवित्रधामे
'उगाच गेलो' विचार आता दृढावताहे!