गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही

गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही
शोधती खोली जळाची ते दगड टाकूनही..

तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते परंतू एवढे सोसूनही

वादळाची एवढी का वाटते भीती तुला
बदलले ना सत्य कोणी फार घोंघावूनही..

झोत वार्‍याचा जसा येतो तशी उडती फुले..
तू जिथे जातो तिथे पोचेन मी ...थांबूनही..

का तुझ्या बोलावल्या तू आज येथे मैत्रिणी?
चूक माझी मान्य केली नाक मी रगडूनही ..

ठेवते केवळ तुझा मी चेहरा डोळयापुढे
मन भरत नाहीच इतके सारखे पाहूनही..

दूरदेशीच्या कथा अन माणसे जर चांगली-
एकटेपण का म्हणे छळते तिथे राहूनही?

गझल: 

प्रतिसाद

छान गझल.....

ठेवते मी केवळ तुझा चेहरा डोळयापुढे
मन भरत नाहीच इतके सारखे पाहूनही.

या ऐवजी

ठेवते केवळ तुझा मी चेहरा डोळ्यापुढे
मन भरत नाहिच इतके सारखे पाहुनही

असे केल्यास ?

डॉ.कैलास

सर्वच शेर छान झालेत.

गझल आवडली. एकंदर साधीसोपी, चांगलीच झाली आहे.

तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते परंतू एवढे सोसूनही

परंतू च्या ऐवजी तरीही सुचले. परंतु विरुद्ध परंतू ची ओढाताण नाही.

झोत वार्‍याचा जसा येतो तशी उडती फुले..
तू जिथे जातो तिथे पोचेन मी ...थांबूनही..

तू जिथे जातो/जाते योग्य. त्यामुळे तू च्या ऐवजी तो/ती योग्य ठरेलसे वाटते.

का तुझ्या बोलावल्या तू आज येथे मैत्रिणी?
चूक माझी मान्य केली नाक मी रगडूनही ..

काहीसा मजेमजेचा शेर वाटतो आहे. नवरा-बायकोच्या भांडणानंतरची नवर्‍याची लाडिक तक्रार असावीसा. कल्पनाविलासातून गंभीर अर्थ काढता येतीलच. पण एकंदर हा शेर गझलेत नसता तरी चालले असते, असे (मला) वाटते.

दूरदेशीच्या कथा अन माणसे जर चांगली-
एकटेपण का म्हणे छळते तिथे राहूनही

सुंदर शेर. सगळ्यात जास्त आवडलेला.

सुंदर गझल! चक्रपाणिंशी सहमत. त्यांनी सांगितलेल्या सुधारणाही रास्त आहेत!
त्यात आण्खी एक....
का तुझ्या बोलावल्या तू आज येथे मैत्रिणी?

बोलावल्या असे पाहिजे खरे तर!
त्यामुळे
का तुझ्या बोलावल्या आहेस येथे मैत्रिणी?
असे करता आले तर पहा!

वादळाची एवढी का वाटते भीती तुला
बदलले ना सत्य कोणी फार घोंघावूनही..

वा.
खालची ओळ प्रश्नार्थक हवी होती असे वाटून गेले.

बदलले का सत्य कोणी फार घोंघावूनही?

अशी काहीशी.

एकंदर छान झाली आहे गझल.

सोनाली,
वादळ, चेहरा, दूरदेशी आवडले.
छान गझल.
काही तृटी राहणारच..:)

मला असे सुचले:

वादळाची एवढी का वाटते भीती तुला
बदलले ना सत्य कोणी पूर्ण पस्तावूनही..

एकंदर जातो'स', बोलावल्या'स' वगैरे महत्वाचे असते असे मलाही वाटते अन वरील प्रतिसादांवरूनही वाटते. बाकी भाषा हवी तशी 'वापरता' येते हे आहेच! (भर सभेत कोणी हे मान्य करत नाही म्हणा) :-))

(यावरून आठवले. माझे सन्मित्र ज्ञानेश यांच्या 'भास व्हायला हवे' स भास व्हायला हवे'त' करणे शक्य नसल्यामुळे एका ज्येष्ट कवींनी 'भासवायला हवे' असे सुचवले होते.) :-)

एकंदर बरी गझल! आपले पोटेन्शिअल याहून बरेच जास्त आहे हे सगळ्यांना माहीत आहेच.

सोनाली..मस्त !!
मला दूरदेशी खूपच आवडला.
धरा, वादळ पण मस्तच !!

छान गझल. वादळ आणि झोत खूप आवडले.

सुंदर गझल...
मैत्रिणीच्या शेराबद्दल चक्रपाणिशी सहमत...

ठेवते केवळ तुझा मी चेहरा डोळयापुढे
मन भरत नाहीच इतके सारखे पाहूनही..
यातला सहजपणा खूप आवडला..
पुलेशु.

खुप आवडली. वादळ आवडले.