संताप

संताप
-----------------------------------------------------------------
हा नसे अभ्यास आणि हा नसे आनंदही,
गीत हा संताप माझा आतला आवाजही....

कैकदा प्रत्येकवेळा मी जरी नाकारले,
गीत आहे प्राण माझा घेतलेला श्वासही...

भोगलेले शाप सारे मोजले नाही कधी,
लेखणी उ:शाप आहे आसरा आधारही...

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले,
दूर गेले स्वप्न झाले पोरके आभासही...

मी ईमाने डाव माझा खेळलो होतो जरी,
हारलो सारेच आता घेतलेला शापही.....

मी असा जाहीरतेने पेटलो होतो कुठे?
शेवटी मी पेटताना जाळले आकाशही....

--------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

गझल: 

प्रतिसाद

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले....
आवडले.

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले,
दूर गेले स्वप्न झाले पोरके आभासही
..
आवडले.

'ही निकामी आढ्यता का दाद द्या अन शुद्ध व्हा' च्या चालीवर चांगली वाटेल.

भोगलेले शाप सारे मोजले नाही कधी,
लेखणी उ:शाप आहे आसरा आधारही... वा मस्त
-मानस६

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.
याच रचनेचा आणखी एक शेर सादर करतो,

मी असा जाहीरतेने पेटलो होतो कुठे?
शेवटी मी पेटताना जाळले आकाशही....

धन्यवाद,
------------------------नचिकेत भिंगार्डे

व्वा..........संपूर्ण गझलच आवडली !! फार सुरेख !!

मी असा जाहीरतेने पेटलो होतो कुठे?
शेवटी मी पेटताना जाळले आकाशही.................... लाजवाब !!

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले,
दूर गेले स्वप्न झाले पोरके आभासही...

चांगल्या ओळी !

का सुखाला हाक देण्या शब्द होते धावले,
दूर गेले स्वप्न झाले पोरके आभासही...

वावा!

मी असा जाहीरतेने पेटलो होतो कुठे?
शेवटी मी पेटताना जाळले आकाशही....

वा!

जयश्रीताई, अनंतजी आणि चित्तजी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
अजून खूप चांगले लिहायची इच्छा आहे.
तुमच्या प्रोत्साहनामुळे ते नक्कीच शक्य होईल.
शेवटचा शेर समविष्ट केल्याबद्द्ल विश्वस्तांचे आभार.
----------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

हा नसे अभ्यास आणि हा नसे आनंदही - माझ्यामते आणि मधील णि दीर्घ लिहायला हवा आहे. विश्वस्तांनी जर कुण्या एका व्यक्तीला ही जबाबदारी दिली तर नियमीतपणे हे लिहिले जाईल. काही कवींची पकड नसते वगैरे असा माझा मुळीच गैरसमज नाही. पण चुकून झालेल्या टायपोग्राफिकल वगैरेही उणीवा त्या एका व्यक्तीकडून नियमीतपणे नमूद होत राहिल्या तर वृत्त, गझलेचे नियम यासंदर्भात शिस्तीचे धोरण राबवले जाते ही प्रतिमा मेंटेन होईल असे वाटते. (चु. भु.द्या.घ्या.) (तसेच 'मी ईमाने' या ओळीतही! 'इ' र्‍हस्व असायला हवा होता.) गझलेचा काफिया सैल वाटला.

आकाश जाळले हा शेर फार आवडला. सुखांना हाक देण्याचा शेर समजला नाही.

(नचिकेत - वरील मते व्यक्तीशः आपल्याला उद्देशून अशी नाहीत, गैरसमज नसावा.)

नचिकेत,
शेवटचा शेरही आवडला.
बेफिकीर म्हणतात त्याप्रमाणे 'आणि' आणि 'ईमाने' या सुधारणा शक्य झाल्यास करा. मात्र, 'आणि'तील णि दीर्घ असण्याचे कारण नाही. याच संकेतस्थळावर मी पूर्वी त्याबद्दल लिहिले आहे. तुम्ही 'आणी' च्या ऐवजी 'आणिक' असे घेऊ शकता. मला 'क' राहिल्याचेच वाटत आहे . तसेच ईमाने तला इ र्‍हस्व करा. मात्र, आणि मधील णी दीर्घ करू नका. तशी आवश्यकता नाही.
नि, अन् , आणि, आणिक, आणखी असे साधारण समानार्थी शब्द आहेतच की...!

भूषणजी आणि अजयजी,
आपल्या मार्गदर्शनासाठी आभारी आहे.
असेच लक्ष असू द्या.
'आणिक' मलाही आधी गुणगुणताना सुचले होते पण लिहिले मात्र गेले नाही.
त्या जागी किंवा सुद्धा चालेल.
धन्यवाद अजयजी.
ईमाने च्या ऐवजी इमाने असले पाहीजे.
दोन्ही बदल अगदी बरोबर आणि चपखल आहेत.
रसभंग झाला असल्यास माफ करावे.
पुढील वेळी नक्की चांगला प्रयत्न करेन.
धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

खुप छान. शाप आवडले.