काव्य जगावे

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न. सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.

ओठांवरती तुज सजवावे
गीतापरि गुणगुणत रहावे

लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे

या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळावे

तुला पुरेसे स्मरून झाले,
अता तरी तू मला स्मरावे

तुझ्या मिठीतच श्वास विरावा,
मरणानेही काव्य जगावे

आणि ही मूळ गझल ::::::::

अपने होटोंपर सजाना चाहता हूं
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं

कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं

छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हूं

थक गया हूं करते करते याद तुझको,
अब तुझे मैं याद आना चाहता हूं

आखरी हिचकी तेरे जानों पे आए,
मौत भी मैं शाइराना चाहता हूं

गझल: 

प्रतिसाद

अनुवाद आवडला. घरटे जाळण्याचा शेर खासच जमला आहे.

अनुवाद चांगला वाटत आहे आणि असेही वाटत आहे की ती एक स्वतंत्र गझलच म्हणून चांगलि झाली आहे.

दोन मते:

थकलो तुजला स्मरता स्मरता
अता वाटते तूच स्मरावे

जानो = गुडघे !

त्यामुळे मिठीऐवजी काहीतरी बदल केल्यास सुंदर वाटेलच.

पण स्वतंत्र गझल म्हणूनही खासच!

अनुवाद छान आहेच.....पण क्षणभर कतिल शिफाइंची रचना बाजुला ठेवल्यास उत्तम स्वतंत्र गझल आहे.

डॉ.कैलास

अनुवाद आवडला.

मला काही विशेष भावला नाही. जरी स्वैर असला तरी मूळ गझलेत 'चाहता' असा उल्लेख आहे. अनुवादात इच्छेला पूर्णपणे फाटा दिलेला आहे. अनुवाद होताना त्याचा कल भावगीताच्या वळणाने गेला आहे.
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं .... यासाठी
गीतापरि गुणगुणत रहावे .... अशी ओळ दिली आहे. पण कोणी? कोणासाठी गुणगुणावे हे समजत नाही आहे. जे मूळ ओळीत 'तुझे' आणि 'मैं' यामुळे व्यवस्थित कळते आहे. 'आ' या शब्दाची मजाही अनुवादातून निसटली आहे.

अब तुझे मैं याद आना चाहता हूं ...यासाठी
अता तरी तू मला स्मरावे .... असा अनुवाद आहे.
मूळ ओळीत एक प्रकारचा अदृश्य हट्ट वाटतो आहे. अनुवादात 'अता तरी' यातील 'तरी' मुळे ती इच्छा अगतिकतेकडे झुकली आहे , केविलवाणी वाटते आहे.

तरी प्रयत्न चांगला आहे. त्या निमित्ताने काही अभ्यासायला मिळाले.
अर्थात, हे सर्व मला वाटते. बाकी निर्णय तुमचाच.

खुप छान. दोनही आवडले.