स्वप्नभूमी

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार झालो
मी तुझा झालो उसासा की तुझा सुस्कार झालो

बोलते सारेच काही हृदयाची लाल स्याही
का मुकया अद्याक्षरांचा मी नवा उच्चार झालो

धुमसल्या होत्या स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन् विस्तवासा गार झालो

चांदण्या शोषून सार्‍या गोठलो होतो स्वताशी
जवळ तू आलीस माझ्या मी पुन्हा ऊबदार झालो

राहिलो आजन्म आपण एकमेका सोबतीला
उन्ह तू झालीस आणी मी तुझा अंधार झालो

हात तो हातात गोरा दाबुनी हातात थोडा
सोडली मी स्वपनभूमी अंबराच्या पार झालो

गझल: 

प्रतिसाद

गझल वाचुन घ्यावी

छान आहे गझल....

धुमसल्या होत्या स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन् विस्तवासा गार झालो

विस्तवासा गार ?

हे कळले नही.

डॉ.कैलास

चांगला प्रयत्न आहे.
धुमसल्या होत्या स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
ही ओळ छान.
तंत्राकडे थोडे पहा....
हृदयाची लाल स्याही = यात हृदयातील 'हृ'दीर्घ करावा लागतो आहे.

मी पुन्हा ऊबदार झालो = यात ऊबदार वृत्तात बसत नाही. उबदार हवे होते.

उन्ह तू झालीस आणी मी तुझा अंधार झालो = यात उन्ह पेक्षा ऊन वृत्तात बसले असते. तसेच, आणी लिहिले की र्‍हस्वाचे दीर्घ झाले असा आरोप होईल. त्यापेक्षा आणिक असे वापरले असते तर बरे झाले असते.
नि = १मात्रेसाठी
अन् = २ मात्रेसाठी
आणि = ३ मात्रेसाठी
आणिक = ४ मात्रेसाठी
आणखी = ५ मात्रेसाठी
असे आपण वापरू शकतो. कोणाचा विरोध असण्याचे कारण नसावे.

श्री कैलास जी
विस्तवासा गार झालो
विस्तवा प्रमाणे गार झालेला अशा आशया साठी वापरला आहे नवीन लिहतो आहे कृपा असावी

छान आहे गझल.

हात तो हातात गोरा दाबुनी हातात थोडा
सोडली मी स्वपनभूमी अंबराच्या पार झालो

हातातला गोरा हात पुन्हा हातात थोडा दाबला - हे 'हातात हात घेणारे' अन 'दाबणारे' हात वेगवेगळे आहेत काय?

मला हल्ली काहीच समजेनासे झाले आहे.

मतला आणि चांदण्यांचा शेर खूप आवडला !!

जयश्री यांच्याशी पूर्ण सहमत! या दोन्ही कल्पना उत्तम आहेत.

खुप आवडली. रक्तपेशी आवडले.

विस्तवासा ऐवजी विस्तवागत जमले असते....पण तरिहि....विस्तव गार नसतो..नही का?

आणी महेश.....आपण नवीन असलात...तरी छान लिहिताहात.....
शुभेच्छा...

डॉ.कैलास

जयश्री यांच्याशी पूर्ण सहमत.मीही.

विस्तवासारखा गार म्हणजे नक्की गार कसा हे काsssही कळले नाही.
मला आत्तापर्यंत वाटत होते की विस्तव गरम असतो.

धुमसल्या होत्या स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
विस्तवागत पाहिले डोळे तुझे अन गार झालो

महेशराव असे केल्यास जमते पहा.....माझ्या मते विस्तवागत डोळे हेच आपणांस अभिप्रेत असावे.

डॉ.कैलास

खुप आवडली हि रचना ........

चांदण्या शोषून सार्‍या गोठलो होतो स्वताशी
जवळ तू आलीस माझ्या मी पुन्हा ऊबदार झालो

Too good !!! I liked this sher a lot !!! Good work Mahesh..Keep it up..