छान रमल्यासारखे

वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे

भांडणे डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर नरमल्यासारखे

एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी
भेटतो आलिंगनी नुकतेच दमल्यासारखे

एकमेकांना चुका माहीतही नसतात पण
चेहरे सवयीमुळे होती वरमल्यासारखे

हावभावातून नात्याची शिसारी सांडते
आणि मुद्दे मांडले जातात नमल्यासारखे

मीलनाची सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी करमल्यासारखे... तूही करमल्यासारखे

टाळण्यासाठी उखाणा..... झुकविणे खाली नजर
आणि भासवणे जगाला तू शरमल्यासारखे

रोज अनुभवतो तुझे ... माझ्यासवे... लोकांमधे
’बेफ़िकिर’ गंधाळणे हे.. प्रेम जमल्यासारखे

टीप - जमीन चित्त यांच्या ’राहिले माझे तुझे नाते’ या गझलशी मिळतीजुळती आहे. मात्र ’रमल्यासारखे’ हा मतल्यातील मिसरा सुचल्यानंतर रचलेली गझल आहे हे नमूद करणे मी आवश्यक समजतो. तसेच, ही फ़क्त तांत्रिकच तुलना आहे.

गझल: 

प्रतिसाद

वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे

छान....मस्तच!!

भांडणे डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर नरमल्यासारखे

ओठ भासवतात...म्हणजे ओठांवरील शब्द असा अर्थ असावा.......छान..

एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी
भेटतो आलिंगनी नुकतेच दमल्यासारखे

सुंदर !!

एकमेकांना चुका माहीतही नसतात पण
चेहरे सवयीमुळे होती वरमल्यासारखे

इथे माहीतही ऐवजी ठाऊकही घ्यावा का? चु.भु.द्या.घ्या.

हावभावातून नात्याची शिसारी सांडते
आणि मुद्दे मांडले जातात नमल्यासारखे

शिसारी येते......सांडत नाही...

मीलनाची सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी करमल्यासारखे... तूही करमल्यासारखे

टाळण्यासाठी उखाणा..... झुकविणे खाली नजर
आणि भासवणे जगाला तू शरमल्यासारखे

रोज अनुभवतो तुझे ... माझ्यासवे... लोकांमधे
’बेफ़िकिर’ गंधाळणे हे.. प्रेम जमल्यासारखे

वरील तिन्ही शेर आवडले.

डॉ.कैलास

मला गझल खूप आवडली..
प्रत्येक शेराला स्वत:ची धार आहे..
सूक्ष्मसा असला तरी भावनेला वेगळा अर्थ आहे...
वा..

सर्व शेर सुंदर!
टीप समजली नाही.
तुमच्याच 'श्वास पहिल्यासारखे'ची आठवण झाली.

मतला आवडला.
छान.

क्या बात है......जबरदस्त गझल.... अख्खी गझल आवडली !!

मतला, करमल्यासारखे, शरमल्यासारखे, प्रेम जमल्यासारखे.......तर एकदम कातिल !! मजा आ गया !!

एकंदर छान आहे गझल.

मस्त.
वेगळे विचार.

आवडले.

कैलासराव,

'शिसारी येते... सांडत नाही' ही उद्बोधक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

खुप छान. उखाणा आवडले.