आभास मीलनाचा..

आभास मीलनाचा..

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला

पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला

विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास झाला

प्रेमा सदा भुकेली उर्मी विलसित माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला
फारच छान.
सुखद कल्पनांनी जगणे सुसह्य होते.

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

वा!!

प्रेमा सदा भुकेली उर्मी विलसित माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला

यातिल उला मिसरा कळला नाही.

डॉ.कैलास

अनिलजी,कैलासजी
प्रतिसादाबद्दल आभार.
प्रेमा सदा भुकेली उर्मी विलसित माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला

यातिल उला मिसरा कळला नाही.
माझी शब्दरचनेत काहीतरी गडबड होत असावी.

खुप आवडली. पाडातल्या फळांना छान.

वृत्तबद्ध लिखाणाबद्दल अभिनंदन!

'विलसित' नीट म्हणता आले नाही.

चांगली लिहिली आहे. मतला छान. मतल्यावरून माझी 'आभास' आठवली.
शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
मला वाटते, एकतर लाजली(स) तू असे हवे किंवा लाजली ती असेही चालेल.

शून्यात पाहताना...
हा शेर छान.

जोशींशी सहमत.

प्रतापजी,बेफिकिरजी,जोशींजी,पाटणकरजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
'विलसित' नीट म्हणता आले नाही.-- नोंद घेतली.
एकतर लाजली(स) तू असे हवे किंवा लाजली ती असेही चालेल.
ती ओळ "शून्यात पाहतांना हळुवार लाजली ती" अशी करावी लागेल.
परत एकदा धन्यवाद..