फारसा वाटेत नाही आमचा वाडा

फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा

माल यालाही नकोसा आणि त्यालाही
जीवनाचा न्यायचा आता कुठे गाडा?

गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा

पादचारी मार्ग नाही या मनामध्ये
फेरिवाल्यांनो इथे घालू नका राडा

घेतली तालीम ज्याची ते कुठे घडते?
पोचतो जेथे तिथे भलताच आखाडा

काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा

रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा

काव्य साकारेल माझा धूर वा माती
मारुनी जाळा मला किंवा मला गाडा

ठेवली असती तुझी जागा मनामध्ये
जन्मभर झाला तुझा प्रेमातला खाडा

'बेफिकिर' मागून घे आधार गझलेचा
आपला बदलायला आलाय सांगाडा

गझल: 

प्रतिसाद

रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा

अप्रतिम.....

डॉ.कैलास गायकवाड

फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा
यात काही कमी आहे असे वाटते.

काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा
व्वा! (फारच माझ्या जुन्या घराची आठवण झाली....)

फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा

काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा

हे दोन्ही शेर सुरेख आहेत !

रक्तदाबाची जराशी चाचणी घेऊ
एकदा माझ्यासमोरी घाल अंबाडा
हे पण छान आहे. अर्थात आजकालच्या किती मुलांना (आणि मुलींनाही) 'अंबाडा' प्रकार माहिती आहे, कोण जाणे!

वा वा
फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा

मस्त. हा शेर फार आवडला. अंबाडा प्रकार सध्या सिनेमात तरी बघायला मिळतो पुढे काय होईल माहिती नाही.( असे वापरात नाहीत, कदाचित कळ्णार नाहीत असे वाटले तरी शब्द जरूर वापरावेत, निदान अर्थ शोधण्याची तरी कुणी तसदी घेईल असे मला तरी वाटते.)

मतला सुंदर आणि प्रचंड ओघवता आहे. तुमच्या मनात अनेक कल्पनांमुळे माजणारा गोंधळ आजकाल तुमच्या रचनेमधे डोकावत नाही ही खूपच आश्वासक बाब आहे. मी खूप जवळून तुमची प्रगती बघत आलो आहे. चित्तरंजन म्हणतो त्यानुसार तुमच्या रचनेमधे स्वतःचे विचार दिसतात हे मलाही जाणवले आहे. कविता नावाच्या जनावराच्या आहारी जाण्याऐवजी थोडेसे थांबून लिहीत राहिलात तर मराठी गझल मधे काही बावनकशी रचना जमा होतील ह्यात मला शंका वाटत नाही. वरील गझल मधले

फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा

गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा

काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा

हे शेर सर्वाधिक आवडले. (काही अनावश्यकही वाटले ) . पण एकूणच स्वच्छ झाली आहे ही रचना.

शुभेच्छा

गप्प बसण्याने कुणाला कीव येते का?
ओरडा, भोकाड पसरा, पायही झाडा
वा!

काय जाणे त्या जुन्या वस्तू कुठे गेल्या?
राहिला नाही अता भिंतीस कोनाडा
वाव्वा!

सर्वांचे मनापासून धन्यवाद!

वैभवराव,

इतक्या आपुलकीने प्रतिसाद देण्यासाठी व माझी प्रगती निरिक्षण्यासाठी मी आभार मानणे हे आपल्या मैत्रीला शोभणार नाही.

काही प्रामाणिक् मते देत आहे. याचा अर्थ आपली मते खोडून काढणे असा नसून मनापासून वाटते ते लिहीत आहे.

१. मला माझे विचार सुचतात किंवा माझ्या ओळी सुचतात हे आपले (व यापुर्वी चित्तरंजन यांनी मांडलेले ) मत खरोखरच लक्षात येत नाही. मी त्याही वेळेस चित्तरंजन यांनाही विचारले होते. मला माझ्याच ओळी सुचायला हव्यात असे मला वाटते.

२. प्रामाणिकपणे सांगतो की मी स्वच्छ रचना अगदी सहज रचू शकतो. यापुढे रचतही जाईन. मात्र ती रचना गझलेकडून साध्या वर्णनात्मक कवितेकडे वळते असे मलाच वाटल्यामुळे मग मी विचार करून करून काहीतरी नावीन्य (विचारातील, कल्पनेतील वगैरे) आणण्याच्या मागे लागतो. मात्र यापुढे आपल्या मताचा आदर ठेवून मी फक्त स्वच्छपणे समजेल अशीच रचना प्रकाशित करेन.

कृपया असेच स्पष्ट मतप्रदर्शन आपुलकीने करत राहावेत अशी विनंती! त्यामुळे मला खरा आनंद मिळेल.

अजयराव,

मतल्यात काय कमतरता जाणवली ते कृपया स्पष्ट लिहावेत.

पुन्हा सर्वांचे धन्यवाद!

माल यालाही नकोसा आणि त्यालाही
जीवनाचा न्यायचा आता कुठे गाडा?
..हा जास्त आवडला.

मला माझे विचार सुचतात किंवा माझ्या ओळी सुचतात
ह्याचा अर्थ असा की कवी जसा आहे तसा त्याच्या ओळीतून दिसणे. किंवा वेगळेपणा दिसणे. अशा सुचत असल्यास ती जमेची बाजू. पण ही एकच बाजू आहे. ज्याप्रमाणे सकस, पौष्टिक आहार मिळूनही अनेक मुलं मरतुकडीच राहतात, अन्न त्यांच्या शरीराला लागत नाही, तसेच काहीसे काही कवींच्या शेराबाबत होते.

धन्यवाद गंगाधरराव व चित्तरंजन!

त्या ओळीचा अर्थ समजला.

बेफिकीर,
फारसा वाटेत नाही आमचा वाडा
पण तरी रुंदीकरण करताय तर पाडा
या द्विपदीत पहिली ओळ एकदमच भाव खाऊन जाते. तशी दुसरी वाटली नाही. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजत आहे. पण पहिली ओळ जी अपेक्षा वाढवते ती दुसरी ओळ पूर्ण करीत नाही असे वाटले. असो. नेहमीप्रमाणेच माझे वाक्य :- शेवटी निर्णय गझलकाराचाच.

खुप आवडली. रुंदीकरण आवडले.

वैभवजी,
' कविता नावाच्या जनावराच्या आहारी'
हे काही कळले नाही.
लोभ असावा.

अनिल रत्नाकरना म्हणतात,
"कविता नावाच्या जनावराच्या आहारी'
हे काही कळले नाही ?.
कसे शक्य आहे ? मी समजावतो .
एक कवि आहे . तो लिहितो. दोन ओळींचा शेवटचा शब्द पूर्ण होण्याअगोदर त्याला कळते की अरेच्च्य्या , कविता माझ्याबरोबर व मी कवितेबरोबर आहे . परंतु मला गझलकार म्हणवण्यात स्वारस्य आहे . बस इथेच तो ले़खणी सरसावतो व खालील प्रकारांपैकी एक करतो :
अ) बालीशणा
ब) किळसवाणेपणा
नाही कळलं ?
पहातर त्यांचे काव्य वैभव :

परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी
अ) बालीशणा--------म्हातारी
ब) किळसवाणेपणा .....ओकारी

काव्यत मरणे, म्हातारी , ओकारी , हे शब्द टाळावेत . घातलेच असतील तर त्या ओळीचा आशय / अर्थ असा असावा की त्यामुळे ते वाचकाचा मुड बिघडता कामा नये. परंतु हे कविता करतांना हं . गझल लिहितांना , म्हणजेच कवितेची गझल करतांना , असे शब्द शोधावेत .
समजले साहेब ?
आधुनिक दादा ( जोशी )म्हणतात : गझलकार एक चांगला कवि , बालीशपणा व किळसवाणेपणा ह्या गुणांनी युक्त , असावा लागतो.