रुतावे कुठे

न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन दुखावे कुठे

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री

गझल: 

प्रतिसाद

विषाला अता या उतारा नको

अशा सोसण्याचे पुरावे कुठे

अशा सुट्या ओळी छान आहेत. आवरावी चे काहीतरी करा.

मतला आणि पुरावे हे शेर आवडले.
गझल चांगली आहे. चित्तरंजन यांच्याशी आवरावी बाबत सहमत!

चित्त बेफिकीर.......मोठी चूक झाली उत्साहाच्या भरात. तो शेर असा वाचावा.

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

चित्त.....मूळ गझलेत ही दुरुस्ती करता येईल का हो ?

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे व्वा!
उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे छान.
माझा मतला....
न काट्यास कळले सलावे कुठे
न पायास कळले दुखावे कुठे

उत्कृष्ट गझल. उरी वेदना.. हा शेर विशेषच आहे.

तुमच्याच कृपेने सुचलेले काही शेर इथे देण्याची गुस्ताखि करतोय, माफी असावी; पण अभिप्राय कळवावा.

कसा जायबंदी उभा देह हा
कळे वेदनांना शिरावे कुठे!

पहावे तिथे या कळ्या-पाकळ्या,
किती वाचवावे मरावे कुठे.

न काट्यास कळले सलावे कुठे
न पायास कळले दुखावे कुठे?

व्वा !! क्या बात है.....

जयश्रीजी....मूळ गझलेत दुरुस्ती झाल्याचे दिसत आहे.

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

हा शेर खूप आवडला.

डॉ.कैलास गायकवाड

छान आहे गझल !
रदीफ आणि कवाफी ओळखीचे वाटतात..! :)

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

वा !
असेच लिहीत रहा :-)

खूप खूप धन्यवाद :)

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

सही! गझल खासच उतरलीय!!!

छान गजल. अंम्बर वगैरे छान आहे.

भन्नाट ...बरका..

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

क्रांति, प्रताप, दशरथ...मनापासून धन्यवाद :)

उरी वेदना, हास्य गालावरी..हा शेर छान.

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

हा शेर जास्त आवडला.
सगळी गझल छान आहे.

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

अफलातून!