...काळजी नको !



...काळजी नको !



कोण काय ओरडेल...काळजी नको !
जे घडेल, ते घडेल...काळजी नको !


चार आसवे निदान लाभतील ना...?
कोण शेवटी रडेल...काळजी नको !


प्राण द्यायला तयार सोबती किती...
जीव कोण पाखडेल...काळजी नको !


वाग तू मना तुला जसा हवा तसा...
ते कुणास आवडेल...काळजी नको !


मेघ आज कोरडाच, मात्र तो उद्या -
- चार थेंब शिंपडेल...काळजी नको !


रागही यथावकाश मावळेल हा...
प्रेमही पुन्हा जडेल...काळजी नको !


तू तुझा स्वभाव ठेव मोकळा, खुला...
कोण केवढे अडेल...काळजी नको !


हा वसंत, ही बहार बेगडी किती...
पान पान हे झडेल...काळजी नको !


राहिलीच काळरात्र ही अशी किती ?
चांदणे पुन्हा पडेल...काळजी नको !


काढले मनास आज आवरायला...!
काय काय सापडेल...काळजी नको !


काळजी करायची तरी किती किती...?
काळजी तुला नडेल ! काळजी नको !!


- प्रदीप कुलकर्णी



गझल: 

प्रतिसाद

रागही यथावकाश मावळेल हा...
प्रेमही पुन्हा जडेल...काळजी नको !
वा! वाव्वा...

कोण काय ओरडेल...काळजी नको !
जे घडेल, ते घडेल...काळजी नको !
वाव्वा! दोन्ही शेर विशेष आवडले.

श्री. कुलकर्णी साहेब,
अजून एक झकास ग़ज़ल पेश केल्याबद्दल धन्यवाद. रदीफ़ सुंदर आहे. आणि बह़रही आमची आवडती आहे.
गालगालगालगालगालगालगा.... हे आणि या स्वरुपाची वृत्ते गुणगुणतांना आम्हाला आमच्या कोकणातल्या नागमोडी रस्त्यावरच्या हिंदोळ्यांची आठवण येते.
आपला,
(आंदोलित) धोंडोपंत
गालगालगालगालगालगालगा.... बहोत खूब
चार आसवे निदान लाभतील ना...?
कोण शेवटी रडेल...काळजी नको !

मेघ आज कोरडाच, मात्र तो उद्या -
चार थेंब शिंपडेल...काळजी नको !

काढले मनास आज आवरायला...!
काय काय सापडेल...काळजी नको !

हे तीन शेर फारच आवडले.  आपल्यासारखे प्रतिभावान मराठी ग़ज़लेच्या दिंडीत असतांना आम्हाला काळजी नाही.
आपला,
(चिंतामुक्त) धोंडोपंत
शेवटी  आमचे म्हणणे असे की...
तू असाच डाव मांड शब्द वेचुनी
तो अम्हांस आवडेल...काळजी नको

आपला,
(आश्वासक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

कुलकर्णी साहेब, वा! वा! अख्खी गझल खूप आवडली.

प्रदीप जी,
क्या बात है! झकास!
मराठी गझलच्या भवितव्याची.... काळजी नको.
जयन्ता५२

गझलेबद्दलच्या सगळ्या काळज्या सरल्या म्हणायचे :-)
गझल आवडली.
तू तुझा स्वभाव ठेव मोकळा, खुला...
कोण केवढे अडेल...काळजी नको !

हा वसंत, ही बहार बेगडी किती...
पान पान हे झडेल...काळजी नको !

हे दोन शेर विशेष आवडले. रदीफही वेगळी असल्याने मजा आली.
पुढील लेखनासाठी अनेकानेक शुभेच्छा.

प्रदीप,
खरंच पुनः एकदा अप्रतिम गझल.. आणि मी मागच्या वेळी लिहिल्याप्रमाणे इथेही एक नवीन रदीफ आहे... वा!
ते कुणास आवडेल...काळजी नको ! - वा! वा! वा!
चार आसवे निदान लाभतील ना...?
कोण शेवटी रडेल...काळजी नको !...
सुंदर!

मक्ताही आवडला; पण वरचा शेर मक्ता म्हणून लिहायला हवा होता असं मला वाटलं.
- कुमार

प्रदीपराव, ग़ज़ल खूप छान आहे.
चार आसवे निदान लाभतील ना?
रागही यथावकाश मावळेल हा
काढले मनास आज आवरायला!

ह्या ओळी विशेष आवडल्या.
ता०क० धोंडोपंतांची तरही दादही आवडली :-)

काढले मनास आज आवरायला...!
काय काय सापडेल...काळजी नको !
काळजी करायची तरी किती किती...?
काळजी तुला नडेल ! काळजी नको ....मस्तच आणि अर्थगर्भ !
-मानस६

अख्खी गझल आवडली!!
-- पुलस्ति.

दाद, प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...!

'काढले मनास आज आवरायला...' हा शेर काही वेगळाच (आणि अर्थातच सुंदर) वाटला. गझल तर छानच ! तुमच्या अजून सर्व गझला वाचल्या नाहीत. पण तुम्ही छान लिहिता. अभिनंदन!
संतोष कुलकर्णी, उदगीर

काढले मनास आज आवरायला...!
काय काय सापडेल...काळजी नको !

अप्रतिम गझल! सुरेख.