चालला शब्दांतुनी...

चालला शब्दांतुनी व्यभिचार आहे
हाच या गावातला आजार आहे

कोणत्याही चांदणीला मूल्य नाही
अन् तरीही मांडला बाजार आहे

राहिले नाही कुठेही फूल ताजे
पाकळ्यांचा रोजचा व्यापार आहे

रोज काळोखात उल्का ठार पडती
सूर्यही आहे तसा लाचार आहे

पोचले अश्रू पहाटे चांदण्यांचे
बोलले दु:खी तुझा शेजार आहे

राहतो आता उपाशी देव माझा
मद्यपींना वाहिले कोठार आहे

तू कशाला ढाळले अश्रू मघाशी ?
कोण येथे चांगला होणार आहे ?

गझल: 

प्रतिसाद

गझल ठीक वाटली.
धन्यवाद!

गझल छान झालीये!
रोज काळोखात उल्का ठार पडती
सूर्यही आहे तसा लाचार आहे

या ओळी तर खूपच छान जुळल्याय्त. विशेषतः दुसरी ओळ तर अप्रतिमच!

तू कशाला ढाळले अश्रू मघाशी ?
कोण येथे चांगला होणार आहे ?

वावा! फार आवडला हा शेर. गझल छान.

तू कशाला ढाळले अश्रू मघाशी ?
कोण येथे चांगला होणार आहे ?
वा!

सोनालीशी सहमत.
पाकळ्यांचा रोज्चा व्यापार आहे.
स्त्रीवादी आहे का?

प्रतिसाद देणार्‍या - न देणार्‍या सर्वांचे धन्यवाद!

विश्वस्तांना,
इथे श्रू येते आहे. श्र येते. मात्र उकार दिल्यावर श्रु किंवा श्रू असे होते. याचे कारण काय?
पूर्वी व्यवस्थित येत होते.

तू कशाला ढाळले अश्रू मघाशी ?
कोण येथे चांगला होणार आहे ?
वा!

राहतो आता उपाशी देव माझा
मद्यपींना वाहिले कोठार आहे

म्हणजे काय? कृपया सांगावेत.

गझल पुन्हा वाचली. आपण चांदण्यांचा दोन वेळा वापर चांगला केला आहेत असे वाटते.

बेफिकीर,
कोठार हे माझ्या मते धान्याचे असते. आता, धान्यापासून मद्यनिर्मिती होणार म्हटल्यावर....?
देव याचा एक अर्थ निर्माण करणारा... (मी शेतकरी, आपले श्रद्धास्थान असलेला कोणीही, आपण स्वतः, इ. असा घेतला आहे)
मी चांदण्यांचा दोनदा वापर केलेला नाही. फक्त,
चांदणे या शब्दाचा वापर दोनदा केला आहे हे खरे. करु नये का? तुम्हीसुद्धा करू शकता की!

अजय,

धन्यवाद!

१. कोठार व मद्यनिर्मीती लक्षात आले होते. 'देव उपाशी' म्हणजे काय ते अजूनही समजले नाही.

२. 'चांदण्यांचा दोन वेळा वापर' म्हणजे 'त्या शब्दाचा वापर' असेच म्हणायचे आहे. दोन वेळा काय, आणखीन काही वेळा केला तरी कुठे बिघडते? ('मी तसा वापर करू शकत नाही' अशा समजातून मी विचारले नव्हते.) पण दोन्ही वेळा तो वापर चांगला झाला आहे असे म्हणायचे होते.

आभार!

'श्रू'ची अडचण टंकामुळे येत आहे असे दिसते. टंक बदलल्यावर व्यवस्थित उमटते आहे.

बेफिकीर,
देव : देवाच्या(वर उल्लेखलेले कोणीही)साठी धान्य उपलब्ध नाही आणि मद्यनिर्मितीसाठी ते आहे असा अर्थ घ्यावा.
'चांदण्यां'च्या बाबतीत तुमचे मत लक्षात आले.
(तसे हल्ली चांदणेसुद्धा आपल्या मनासारखे कुठे पडते? ) हा हा

राहिले नाही कुठेही फूल ताजे
पाकळ्यांचा रोजचा व्यापार आहे

रोज काळोखात उल्का ठार पडती
सूर्यही आहे तसा लाचार आहे

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, आणि गदिमांची "मज बहिण मिळेना" ची आठवण झाली.

सुंदर गझल

धन्यवाद अनिल.
माझ्या गझलेमुळे आपल्याला कोणाच्या काव्याची आठवण येत असेल तर ते मी माझे भाग्य समजतो.
धन्यवाद!

सुंदर गझल.आवडली.

आणि गदिमांची 'मज बहिण मिळेना'??? -

फुलांचा बाजार बाबत अनिल यांच्याशी सहमत!

खुप छान. गावातला आजार, शेजार आवडले.