चेहरा

मी उगीचच तुझा पाहतो चेहरा
सावलीने तुझ्या भाजतो चेहरा

एकटा मीच नाही अताशा इथे
जो मला पाहुनी पाडतो चेहरा

जन्मभर शोधुनी भेटली तर म्हणे
पाहिल्यासारखा वाटतो चेहरा

मूळ मालाहुनी छान नकली तसा
आज माझा इथे गाजतो चेहरा

मी स्वतःला दिले एवढे चेहरे
चेहराही अता मागतो चेहरा

माणसे टाळती सत्य स्वीकारणे
आरसा का कधी टाळतो चेहरा?

कोणत्याही ठिकाणी तुला शोधतो
कोणताही तुझा चालतो चेहरा

सून माहेरला सोडते मन तिचे
सासरी एकटा नांदतो चेहरा

रात्रभर जोडतो भग्न अवशेष अन
मी सकाळी पुन्हा लावतो चेहरा

गझल: 

प्रतिसाद

संपादन - चवथा शेर

मूळ मालाहुनी छान नकली तसा
आज माझा इथे गाजतो चेहरा

धन्यवाद!

माणसे टाळती सत्य स्वीकारणे
आरसा का कधी टाळतो चेहरा?

कोणत्याही ठिकाणी तुला शोधतो
कोणताही तुझा चालतो चेहरा

हे दोन खास!

माणसे टाळती सत्य स्वीकारणे
आरसा का कधी टाळतो चेहरा?

कोणत्याही ठिकाणी तुला शोधतो
कोणताही तुझा चालतो चेहरा

--अतिशय आवडलेले आणि पटलेले शेर!
छान रचना!

सून माहेरला सोडते मन तिचे
सासरी एकटा नांदतो चेहरा

अप्रतिम!

रात्रभर जोडतो भग्न अवशेष अन
मी सकाळी पुन्हा लावतो चेहरा

हे दोन्ही शेर खास!

सून माहेरला मन नाही सोडत, ते असतेच तिच्याबरोबर.
माहेरला मन सोडले तर नवर्याबरोबर काय? पटले नाहे

सर्वांचे आभार!

अर्चनाजी,आपले बरोबर असावे. शेर बहुधा चुकला असावा.