ना उन्हाळा भोगला मी फारसा


ना उन्हाळा भोगला मी फारसा...
तू नको इतक्यात येऊ पावसा...


दु:ख आहे नेहमीचा सोबती
सांग का ठेवू सुखावर भरवसा?


हरवले गर्दीत सारे चेहरे
पारखा माणूस येथे माणसा...


सोडुनी गेला पुढे तो एकटा
(पावलाचा पुसटसा आहे ठसा)


दाटला अंधार सारा भोवती
चांदण्याचा एक आहे कवडसा...


लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख देताना मला, थोडे हसा!


- कुमार जावडेकर, मुंबई

गझल: 

प्रतिसाद

झकास ग़ज़ल. सुंदर. मतला खूप छान आणि सफाईदार आहे.
आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अत्यंत तरल, मृदु गझल.
कुमारसाहेब, क्लासिक!

ना उन्हाळा भोगला मी फारसा...
तू नको इतक्यात येऊ पावसा
बढिया.
शेर २ आणि ५ मधे वेगळे काही सांगताहेत असे वाटत नाही.

लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख देताना मला, थोडे हसा!
व्वा! सुंदर...

वा कुमार, ग़ज़ल छान आहे.

मतला आणि शेवटचा शेर खूपच छान! ठसा शेरही आवडला..
गझल, नाना म्हणताहेत तशी, 'क्लासिक'!!
-- पुलस्ति.

वाव्वा! मस्त मतला. भरवसा, कवडसा आणि हसा खास.अगदी सहजसुंदर गझल!
 

छान गझल....साधी, सोपी, सुटसुटीत
दु:ख आहे नेहमीचा सोबती
सांग का ठेवू सुखावर भरवसा?
दाटला अंधार सारा भोवती
चांदण्याचा एक आहे कवडसा...
लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख देताना मला, थोडे हसा!
हे शेर खूप खूप आवडले...शेवटचा शेर उत्कृष्टच.

आणि मक्ता विशेष आवडले. मस्त! मतल्यातील 'येऊ' (किंवा 'नको') मात्र खटकले. येऊस (किंवा नकोस) कसे योजता आले असते किंवा पर्यायी मिसरा कसा असता, याचा विचार करतो आहे.

लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख देताना मला, थोडे हसा!
सुंदर!