मनाला पटेना

मनाला पटेना तरी ऐकणे
तुझे तेच ते तेच ते बोलणे

मलाही नवे ना तुलाही नवे
ठरावीक होते तुझे वागणे

तुझा नेम कुठला असे नेमका
दुडी चालणे की मला टाळणे ?

कुणाला मिळे नाव यादीतले
कुणाचे असे राहिले टाचणे

तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे

जसा वाहतो पाट शेतातुनी
अजयचे तसे हातचे राखणे

- अजय अनंत जोशी

गझल: 

प्रतिसाद

तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे

सुंदर शेर!

जसा वाहतो पाट शेतातुनी
अजयचे तसे हातचे राखणे

पाटाच पाणी गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित जाते. आपली गझलही ओघवती आहे. हे जर हातचे राखणे असेल तर, अजुन प्रचंड साठा असणार हे निश्चित.

मलाही नवे ना तुलाही नवे
ठरावीक होते तुझे वागणे

तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे

सहल्-सुंदर शेर !

तेच ते दोन्दा का घेतलय?
दुडी म्हणजे काय?
टाचणे च्या ऐवजीए टोचणे हवे होते का?

प्रतिसाद दिलेल्या-न दिलेल्या सर्वांना धन्यवाद.
अनिलजी,
आपल्या माझ्याबद्दलच्या अपेक्षेबद्दल आपल्यालाच शेभेच्छा! :)
अनंतजी,
करंगळीच्या करामतीने 'सहज' चे 'सहल' केले. पण मला तेही वाचून सहल काढावी की काय असे वाटले. :)
बाकी, प्रश्नार्थक मुद्रांना...
पुन्हा कधीतरी...

मक्ता लक्षात आला नाही.

पाट शेतातुनी वाहताना हातचे काय राखतो? (प्रश्नार्थक मुद्रा आहे.)

सहल काढणार असलात तर 'बेफिकीर'लाही कळवा. तो कुठेही कधीही येतो. हा हा हा!

तुझा नेम कुठला असे नेमका
दुडी चालणे की मला टाळणे ?

दुडी चालणे = दुडक्या चालीने चालणे

माझ्या मते , अजय अनंत जोशी यांस हा अर्थ अपेक्षित आहे.

चू.भु.द्या.घ्या.

डॉ.कैलास गायकवाड

तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे >>> व्वा सुंदर

कैलासजी धन्यवाद! (माझे काम केल्याबद्दल..)
मिल्याजी,
धन्यवाद!
अवांतर...
हम कभी 'मिल्या' नही | कभी मिलेंगे क्या?