शब्द होते, तरी..

-----------------------------------------

प्रेम माझे तुझे केवढे खुंटले,
शब्द होते तरी बोलणे खुंटले !

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

मागतांना किती दूर होतास तू,
भेटतांना तुला मागणे खुंटले !

कल्पना ती किती मुग्ध होती बरे!
वृत्तछंदातले सापळे खुंटले

पाहतांना तुला लोचने संपली,
रेखतांना तुला कुंचले खुंटले !

एवढे क्षुद्र झालो अम्ही शेवटी,
की अता आमचे खुंटणे खुंटले !

-ज्ञानेश.
-------------------------------------------

गझल: 

प्रतिसाद

छान! सापळ्याचा शेर सुरेख आहे. पाचव्या शेरात प्रभावी समारोप होतो आहे की नाही असे वाटले.

खुंटणे खुंटले ही कल्पनाही चांगली आहे.

(बरेच दिवसांनी प्रकाशित केलीत.)

कल्पना ती किती मुग्ध होती बरे!
वृत्तछंदातले सापळे खुंटले

वा:!

पण असे वाटले की..
सारखे सारखे खुंटले खुंटले
खेळताना जरा शब्दही खुंटले.

ज्ञानेशराव,

गझल चांगली झाली आहे.
एका शेराबाबत सूचना व मतेः

कल्पना ती किती मुग्ध होती बरे!
वृत्तछंदातले सापळे खुंटले

हा शेर छान आहे.
तुला असे म्हणायचे असावेः एक कल्पना अशी आहे की, कोणत्याही वृत्तात पकडणे शक्य नाही.
वृत्तात पकडणे शक्य नाही इतकी ती आवाक्याबाहेरची, विस्तृत आहे. मुग्ध हा शब्द विस्तृततेसाठी चपखल नाही. मुग्धतेत थोडासा संकोच आहे. 'रम्य' हा शब्द वापरून पहा. अर्थाच्या जवळ जाशील. खरे तर, 'रम्य' हा शब्दही मोठेपणासाठी तितकासा चपखल नाही, पण मुग्धतेपेक्षा बरा आहे. मुग्धतेपेक्षा रम्यता बरी. 'रम्य' ऐवजी आणखी एखादा शब्द सुचला तर उत्तमच.

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !
फारच छान. विशेषतः खालची ओळ. गझलही छान.

सुरेख......

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

गझल आवडली....

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

@केदार-
कल्पना ही अस्पष्ट, धूसर तरीही लोभसवाणी होती, असे म्हणायचे आहे. कदाचित 'मुग्ध' शब्द तितकासा चपखल नसावा. पण 'रम्य' मधे ती छटा येत नाही.
कल्पनेच्या 'मोठेपणा'साठी 'भव्य' शब्द वापरता येईल, पण तो अर्थ अभिप्रेत नाही.
आणखी विचार करतोच.

प्रतिसादाबद्दल पुनश्च आभार.

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

मागतांना किती दूर होतास तू,
भेटतांना तुला मागणे खुंटले !

सुंदर!

ज्ञानेश,
स्पष्टीकरणाबद्दल आभार.
मोठेपणा तुला अपेक्षित नव्हता. लोभसवाणेपण अपेक्षित होते.ः)

ज्ञानेश
वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले ! >>>मस्त

शेवटाचा पण आवडला...

पण खुंटणे ह्या अवघड अंत्ययमकामुळे तुझ्या नेहमीच्या बहारदार प्रतिभाशक्तीवर थोडी मर्यादा आली आहे असे वाटले...

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

छान !