चांदण्याची तोरणे(पुस्तक परिचय)

वा.न.सरदेसाई हे मराठी गझलेतील खूप जुने जाणते नाव.
ध्वनिफीत रसिकांना ते हे का कुणी फुलांना सांगायला हवे या गझलेद्वारे माहीत झाले. भीमराव पांचाळे यांनी ती गझल गायलेली आहे.
सहा वर्षांपूर्वी सरदेसाई यांचा चांदण्याची तोरणे हा सुबक गझलसंग्रह प्रकाशित झालेला असून संग्रहात रुबायाही आहेत. एकोणसत्तर वृत्तातील एकशेवीस गझला व सर्व मान्यताप्राप्त वृत्तांतील चोपन्न रुबाया असलेला मराठी गझल संग्रह असे मुखपृष्ठावरच प्रसिध्द करण्यात आलेले आहे. हा सरदेसाईंचा दुसरा गझलसंग्रह होय.
डॉ.राम पंडितांची प्रस्तावना सरदेसाईंच्या या संग्रहाबाबत सविस्तर सांगते. 'गेयता हा सरदेसाईंच्खुया गझलांचा प्राण आहे', असे श्री.पंडित म्हणतात. सरदेसाई यांचे 'मनःपूर्वक' हे मनोगतही वाचनीय आहे. मनोगतात एका ठिकाणी त्यांच्या म्हणण्याचा आशय असाः काही वेळा मला ओळी सहज स्फुरल्या आहेत. नंतर कळले की तशी वृत्तेच नव्हती. मग, मला स्फुरले ते नव्या लयींचा पर्यायाने वृत्तांचा जन्म होता.
प्रामाणिक भावना, जगाचे अचूक निरीक्षण आणि वृत्तांवरची जबरदस्त पकड या बाबींचा प्रत्यय संग्रहात ठायी येतो. शिवाय, गझलकाराला कोणताही शब्द वर्ज्य नाही. टीच(दारावर पडणारी थाप), अरेच्या, फाटक्यातुटक्या, वगैरे असे शब्द गझलकाराने गझलांमध्ये व्यवस्थित बसवलेले आहेत.परिचयाच्या रदीफापेक्षा खरे म्हणजे, कुणाला काही हे वेगळे रदीफ आढळतात. गझलकाराला कोणताही शब्द वर्ज्य नाही, असे संग्रहातून दिसते. काही ठिकाणी, विरामचिन्हांच्या मदतीने शेर समजवण्याचा प्रयत्न आहे.

दर्जेदार शेरांचे काही मासले असे..
हे लोक न, हे रोगच आहेत, खरे म्हणजे
राहूच नका ह्यांच्या समवेत, खरे म्हणजे

समाजसेवेपुढे कुणालाच वेळ नव्हता
गरीब अपुले स्वतःच अश्रू पुशीत होते

पहाटेस ये भेटण्या एकटी
तिथे चोंबडा शुक्रतारा नको

रसिक मनाला मेजवानी देणारा आणि अभ्यासू मनाला विचारात पाडणारा, असा काहीसा हा संग्रह आहे.मुंबई येथील ठाकुरद्वारच्या 'इंद्रनील प्रकाशन' ची ही निर्मिती आहे. अक्षरजुळणी धुळे येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची आहे. मुखृपृष्ठावरील चित्र जॉन फर्नांडिस य़ांचे आहे. मलपृष्ठावरील परिचयात सरदेसाईंच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलूही आहेत.

...गझल जगणा-यां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिसाद

केदार,
मी काही हे पुस्तक वाचले नाही. म्हणून त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र,
दर्जेदार शेरांचे काही मासले असे..
हे लोक न, हे रोगच आहेत, खरे म्हणजे
राहूच नका ह्यांच्या समवेत, खरे म्हणजे
वरील शेर दर्जेदार कसा हे समजून सांगावे.
त्याचप्रमाणे,
मुंबई येथील ठाकुरद्वारच्या 'इंद्रनील प्रकाशन' ची ही निर्मिती आहे. इथपर्यंत ठीक आहे. परंतु, अक्षरजुळणी धुळे येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची आहे. मुखृपृष्ठावरील चित्र जॉन फर्नांडिस य़ांचे आहे. हे कशाला?

केदार,

माहितीबद्दल धन्यवाद! त्यांचे एक संकेतस्थळही आहे. याच निमित्ताने त्यांच्या एक दोन गझलाही लेखात आल्यास आवडल्या असत्या.

काही मते:

१. फुले, चांदणे या उपमा किंवा प्रतिमा जुन्या वाटतात. मात्र, शुक्रतारा असूनही तो 'चोंबडा' असणे हे नवे वाटले.

२. आपण नोंदवलेल्या रदीफा निश्चीतच वेगळ्या आहेतच.

३. 'गझलेला कोणताही शब्द वर्ज्य नाही ' हे विधान मला व्यक्तिशः पटत नाही.

आपल्यालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

अजय,
अक्षरजुळणी व चित्राचा उल्लेख पुस्तकाचा परिचय देताना होऊन गेला. अक्षरजुळणीचा उल्लेख फार आक्षेपार्ह वाटू नये.
एकवेळ अक्षरजुळणीबाबत आपला आक्षेप किंचित पटवून घेता येईल पण मुखपृष्ठावरील चित्राच्या कर्त्याचे नाव देण्यात हरकत नसावी.अनेक समीक्षांमध्ये पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्राचा उल्लेख असतो. अर्थात, ही समीक्षा नाही. साधा परिचय आहे.
भूषण,
गझलकार हा शब्द मी सरदेसाई यांच्या संदर्भात वापरला होता. गझलकाराला म्हणजे, सरदेसाई यांना कोणताही शब्द वर्ज्य नाही, असा विधानाचा अर्थ होता. एखाद्या साहित्यिकाबाबत लिहिताना एकाच लेखात वारंवार त्याच्या नावाचा वापर करणे टाळले जाते. कवी, लेखक, गझलकार असे शब्द वापरले जातात. सामान्यनाम या अर्थाने हे शब्द त्या लेखात वापरले जात नसून त्या विशिष्ट साहित्यिकासंदर्भात वापरले जातात.

धन्यवाद.

परंतु, अक्षरजुळणी धुळे येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची आहे. मुखृपृष्ठावरील चित्र जॉन फर्नांडिस य़ांचे आहे. हे कशाला?
अजयराव, पुस्तकाचा परिचय देताना ह्या गोष्टी नमूद करत असतात. जॉन फर्नांडिस हे प्रसिद्ध चित्रकार होते.

केदार,
ते अक्षरजुळणी वगैरे जाऊ द्या हो...
पण तो शेर नेमका दर्जेदार कसा ते सांगा ना, पामराला......
(आजोबा(not verified) असते तर कदाचित श्रीखंडाच्या गोळ्याही मिळाल्या असत्या तुम्हाला..)
हा हा हा....

चित्तरंजन,
अजयराव, पुस्तकाचा परिचय देताना ह्या गोष्टी नमूद करत असतात.
बरोबर आहे. मग, मुद्रण कौशल्य कोणाचे ते राहूनच गेले आहे की! किंमतही कळाली नाही. सहज कोठे मिळू शकेल हे कळाल्यास घेता येईल.
अर्थात, या गोष्टी कंसातल्या....

हाहाहा..
इथले प्रतिसाद वाचल्यावर 'चांदण्यांची धोरणे' असे एक पुस्तक प्रकाशित करावेसे वाटेल, सरदेसाईंना.

---------------------------------
@केदार- पुस्तक परिचयाबद्दल आभारी आहे!

बरं का!
आता वा. न. यांचेविषयी राहु द्या. आपल्याला एखादी छान गझल लिहिता येते का ते पाहू......:)

अजयराव,
तो शेर वेगळ्या रदीफच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.
हे लोक न, हे रोगच आहेत, खरे म्हणजे
राहूच नका ह्यांच्या समवेत, खरे म्हणजे

खरे म्हणजे ही रदीफ काढून टाकली तर साधी वाक्ये होतील. खरे म्हणजे ही रदीफ वापरण्यातून गुपित सूचित होते. साध्या वाक्यांना गुपिताचे, एखाद्या कानमंत्राचे मोल प्राप्त करुन देण्याचे सामर्थ्य या रदीफेत आहे.
...इकडे कान करा. खरं सांगू का, हे लोक नाहीतच, रोग आहेत. तुमची लाख इच्छा असेल यांच्यासमवेत राहण्याची पण हे त्या पात्रतेचेही नाहीत....

बाकी,
चांगली गझल..
हं...

केदार,

हे लोक न, हे रोगच आहेत, खरे म्हणजे
राहूच नका ह्यांच्या समवेत, खरे म्हणजे

कृपया शक्य असल्यास ही संपूर्ण गझल येथे द्यावी. मला उत्सुकता आहे. जमीनही वेगळीच आहे.

धन्यवाद!