ईमान

वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...

नाही कुणीच येथे शब्दास जागणारे,
जगण्यासही अताशा वेठीस ठेवलेले...

नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,
दुनियेस वीर वाटे मैदान मारलेले...

जो तो इथे तमाशा पाही बघ्याप्रमाणे,
गमजा उगाच भारी सारेच गोठलेले...

सारे लिहून झाले जे जे लिहायचे ते,
शब्दास धार माझ्या बोरू न तासलेले...

------------------------------नचिकेत भिंगार्डे

गझल: 

प्रतिसाद

छान, स्वच्छ व चांगल्या अर्थाची गझल नचिकेत!

धन्यवाद!

  • वृत्त शेवटपर्यंत नीट पाळलेले आहे. अलामतही सांभाळली आहे. अभिनंदन.
  • आणखी सफाईदारपणा हवा. तसेच काही ठिकाणी दोन ओळींतला संबंध मला स्पष्ट झाला नाही. उदा. मतला.
  • लिहीत राहा. सुधारणा होत जातील.

छान, स्वच्छ व चांगल्या अर्थाची गझल नचिकेत!
---मनापासून धन्यवाद भूषणजी!

आणखी सफाईदारपणा हवा. तसेच काही ठिकाणी दोन ओळींतला संबंध मला स्पष्ट झाला नाही. उदा. मतला.
लिहीत राहा. सुधारणा होत जातील.

माझ्या रचनेला दाद दिल्याबद्द्ल आभार.
मला अशाच मार्गदर्शनाची गरज आहे.
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. काही ठिकाणी दोन मिसर्‍यांमधील संबंध पुरेसा स्पष्ट होत नाहिए.

सर,मला अभिप्रेत असणारा अर्थ असा होता कि,
वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...

"माझ्या वाटेत या जगाने किंवा परमेश्वराने जरी कितीही अडथळे निर्माण केले, तरिही मी या सार्‍यांशी झगडून माझे ईमान शाबूत ठेविले आहे."

माझ्या मते, वरील रचनेतील असाच प्रॉब्लेम असणारा दुसरा शेर कदाचित हा असावा,
नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,
दुनियेस वीर वाटे मैदान मारलेले...

"कर्ण आणि अर्जुन या दोन तुल्यबळ योद्ध्यांत जगाने कायमच अर्जुनाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.
त्याची बाजू पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना फार थोडे दिसतात. कदाचित अर्जुन जिंकल्यामुळे हा परिणाम असू शकतो."

आपल्या सार्‍यांच्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढतो. लिखाणास बळ मिळते. असाच आशिर्वाद राहू दे.
सर्वांना धन्यवाद!

आवडली

सारे लिहून झाले जे जे लिहायचे ते,
शब्दास धार माझ्या बोरू न तासलेले...

जेत्याच्या बाजूने इतिहास लिहिला जातो-

असे आपले मत आपण कर्ण अर्जुनाच्या शेरात व्यक्त केले आहेत. ते स्पष्ट आहे की नाही हा भाग वेगळा. पण मत अतिशय योग्य व चांगले वाटले.

शुभेच्छा!