गझल तिहाई - वृत्तांत
दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला. सभागृहाची आसनक्षमता सुमारे १०० इतकी होती व ते जवळजवळ भरलेले होते. एकंदर उत्साहाचे वातावरण होते.
सुरुवातीला विनोद केंजळे यांनी सर्वांचे स्वागत करून रूपरेषा थोडक्यात सांगीतली. त्यानंतर त्यांनी डॉ. अनंत ढवळेंना तीनही संग्रहांबाबत परिचयात्मक व समीक्षात्मक निवेदन करायची विनंती केली.
ढवळेंनी संग्रहामधील गझला, त्यातील भाषा, प्रतिमांचा वापर व नवेपणा, एकंदर मराठी गझलेच्या पार्श्वभूमीवर या संग्रहांचे स्थान याबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त अशी मते मांडली. त्यांची शैली 'अतिशय विषयाचे भान असलेली' व त्याचवेळी काहीठिकाणी खुशखुशीत अशी होती. ढवळेंच्या भाषणामुळे श्रोत्यांचा संग्रहांबाबत एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊ शकला. माझ्या संग्रहाबाबत त्यांनी 'नवीन प्रतिमा, भाषा-शैली चांगली असणे व अनेक शेर चांगले झालेले असणे' असे मत मांडले तर डॉ. समीर चव्हाण यांच्या संग्रहाबाबत 'विचारपुर्वक व जबाबदारीने काव्याकडे पाहणे, थोडा वेगळा व चांगला प्रवाह गझलेत आणणे तसेच सर्वच शेर संयमीत भाषाशैली वापरूनही भिडणारे झालेले असणे' असे मत मांडले. दुर्दैवाने ढवळेंपर्यंत अजय जोशी यांचा संग्रह वेळेवर पोचू शकला नव्हता मात्र ते अजय यांचे काव्य 'संकेतस्थळांवर' पुन्हा समीक्षकाच्या दृष्टीकोनातून वाचून आले होते. अजय यांचे काव्य चांगले असतेच व त्यांची भाषा शैली भिन्न असूनही गझलेस छान जुळणारी असते असे मत त्यांनी मांडले.
यानंतर गजल गंधर्व श्री सुधाकर कदम यांनी समीर यांना शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेले पत्रही श्री विनोद यांनी वाचून दाखवले.
यानंतर डॉ. समीर चव्हाण यांनी आपले विचार मांडले. त्यांचा हा पहिलाच संग्रह असल्याने आधी त्यांनी सर्व कुटुंबिय, मित्र व प्रकाशक अजय जोशी यांचे आभार मानले. 'डॉ. ढवळेंनी आपल्या काव्याबाबत विचार व्यक्त केलेलेच असल्याने मी माझा संवाद थोडक्यात आवरतो' असे म्हणून त्यांनी त्यांचा एक शेर ऐकवून आपले भाषण संपवले.
यानंतर अजय जोशी यांनी विचार मांडले. त्यांनी 'शायरांनी एकत्र येऊन संग्रह काढल्यास अनेक खर्च कमी होतात व कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर व जास्त चांगला नियोजीत करता येतो' असे मत मांडले. त्याचवेळेस 'प्रकाशक हवा तो निवडा' असे मिष्कीलपणे सांगायला ते विसरले नाहीत. अजय यांनी असे मत मांडले की मराठी गझलकाराने शक्य तितक्या वैविध्यपूर्ण विषयावर व खरे तर जाणीवपुर्वक 'स्व' सोडून इतरच विषयांवर गझलेच्या माध्यमातून लेखन करणे आवश्यक आहे. गझलेतील विषयांमधून 'मी'पण गेल्यास गझल बरीच जास्त उपयुक्तही होईल व तिची व्याप्तीही खूप वाढेल असे ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी त्यांनी त्यांचा मक्ता ऐकवला व त्यातील 'आतला माणूस कोणी ओळखावा' ही ओळ दाद घेऊन गेली.
माझ्या संवादामध्ये मी माझ्या व्यक्तीगत जीवनातील काही त्रास, संकटे वगैरे समोर येतात तेव्हा माझी शायरी उपयोगाला पडत नाही असे म्हणालो. अपघातावेळी माझा डावा पाय तुटलेला असताना एक्स्प्रेस हायवेवर कुणीच माझ्यासाठी थांबत नव्हते या गोष्टीला चार वर्षे होऊन गेल्यानंतर मी 'घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी, चांगले आहेत सारे आपले नाही कुणी' हा मतला रचला. मात्र, ऑफीस, संसार, स्नेही / नातेवाईक , प्रकृती या विविध पातळ्यांवर जेव्हा एखादे संकट, मनस्ताप किंवा त्रास खरोखर भोगायचा असतो किंवा कळकळीने मते मांडायची असतात तेव्हा आपण गद्यच बोलतो, काव्य गुंडाळून ठेवतो व त्यामुळे मला माझे काव्य हे एक थोतांड वाटते असे मत मी मांडले.
यानंतर अध्यक्ष डॉ. राम पंडितांच्या हस्ते प्रकाशन समारंभ पार पडला. अध्यक्षीय भाषणात राम पंडितांनी तीनही संग्रहावर भाष्य केले. त्यांच्या भाषणात सर्वत्र त्यांच्या गझलविषयक प्रदीर्घ साधनेची चुणूक दिसून येत होती. गैरमुरद्दफ गझलेत स्वरकाफिया वापरू नये असे एक मतही त्यांनी मांडले. राम पंडितांचे भाषण खरे तर श्रोत्यांपैकी जे गझलेशी संबंधीत नसून केवळ 'आपल्या मित्राचे / नातेवाईकाचे पुस्तक आहे' म्हणून आलेले होते त्यांना समजलेच नाही. समजण्यासारखे नव्हतेही. पंडितांनी फार मोठ्या निकषांवर हे संग्रह अभ्यासलेले होते. त्यांच्यामते तीनही संग्रहांमधील काव्य चांगले असले तरीही अप्रत्यक्षरीत्या किंवा नकळतपणे प्रभावित होते. त्यांच्या या मतावर नंतर जमलेल्या आमच्यातीलच सहा गझलकारांमध्ये व दोन समीक्षकांमध्ये खासगी पातळीवर जोरदार चर्चा झाली हे सांगणे न लगे. पंडितांनी तिघांचेही त्यांना आवडलेले शेर ऐकवले.
पंडितांच्या भाषणानंतर तरुणभाई खटाडिया (पुण्यातील एक ज्येष्ठ काव्यप्रेमी, कवी व एका मंडळाचे संस्थापक) , श्री शिरीष शेवाळकर (उर्दू साहित्याचे अभ्यासक) व मित्र श्री. वैभव जोशी (हे मुंबईला जाणार असल्याने 'नक्की येऊ शकतील की नाही' याची खात्री नव्हती) या सर्वांचा पंडितांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.
यानंतर चहापानाची वेळ झाली. मध्यंतरात पुस्तकविक्रीला जोरदार प्रतिसाद मिळाला. वीसच मिनिटात पुन्हा रसिक स्थानापन्न झाले. मुशायऱ्याची सूत्रे माझ्याकडे होती. मी प्रत्येक गजलकाराच्या गाजलेल्या ओळी ऐकवून त्यांना व्यासपीठावर बोलावले. श्री. अजय, डॉ. समीर, डॉ. अनंत, श्री. चित्तरंजन व श्री. म. भा. चव्हाण हे सर्व स्थानापन्न झाल्यावर 'चक्री' पद्धतीचा मुशायरा चालू झाला.
इतका जोरदार मुशायरा , प्रामाणिकपणे सांगतो, मीही कधीच पाहिलेला नाही. या कार्यक्रमातील सर्वात दणदणीत भाग झाला तो मुशायरा.
मुशायऱ्याचा वृत्तांत विस्तृतपणे लिहिण्याचा मोह मी खरच टाळू शकत नाही.
चक्रीमुशायरा ठेवल्यामुळे व सुरुवातीलाच परिचय सांगीतलेला असल्यामुळे एकापाठोपाठ एकेक शायर आपली गझल ऐकवू लागले. समीर, अजय, मी या तीन गझला झाल्यानंतर अनंत व चित्तरंजन यांनी आपल्या गझला ऐकवल्या. चित्तरंजन यांचे 'तो आधी माणूस होता त्याचे माकड नंतर झाले' व 'खूप खूप विषयांतर झाले' हे दोन्ही शेर प्रचंड दाद मिळवून गेले. त्यानंतर म. भां नि नेहमीच्या शैलीत गझल ऐकवली. एकंदर मूड तयार झालेला होता. आधी दोनच फेऱ्या घ्यायचे नियोजन होते, पण रसिकांचा वाढता प्रतिसाद पाहून फेऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण राहू शकले नाही. एक फेरी झाल्यावर मुंबईच्या आप्पा ठाकुरांनी व्यासपीठावरून त्यांची एक गझल ऐकवली आणि इथेच त्या मुशायऱ्याला एक जोरदार वळण लागले. आप्पांची गझल सर्वांची प्रचंड दाद घेऊन गेली. दुसऱ्या फेरीत अजय यांनी 'निघून जायचे पुढे' या सुरेख गजलेने सुरुवात करून एक वेगळाच मुड निर्माण केला तर पाठोपाठ मी एक हजलीश रचना ऐकवली ज्यातला शेवटचा शेर रसिकांपेक्षा व्यासपीठाचीच जास्त दाद घेऊन गेला. 'गुरूच्या कल्पना ढापून हे बाळंत झाले, अता सांगायला येतील हे त्यांचे घराणे' असा तो शेर होता. या हझलेतील दोन शेरांना वन्स मोर मिळाले. पण खरी मजा पुढे आली. मुंबईच्याच संदीप माळवींनी व्यासपीठावर येऊन एक छान गझल पेश केली. तोपर्यंत ढवळेंनी मुशायऱ्यात 'रोड जातो त्या जुन्या गावाकडे.. राहतो तेथे कुणी माझ्यातला' हा शेर असलेली गझल ऐकवून पुन्हा वातावरण हळवे केले. चित्तरंजन यांनी मला सुचवले की वैभव जोशी यांना गझल सादर करायला सांगावे. वैभव यांनी मला निक्षून सांगीतलेले होते की 'मी आज स्टेजच्या या बाजूला बसणार आहे' . मात्र मुशायऱ्याचा वाढता जोर पाहून चित्तंच्या सूचनेप्रमाणे मी वैभव यांना विनंती केली. त्यानंतर वैभवरावांनी
ऐकवलेली एक गझल व त्यानंतरची एक हझल ('मला वाटले की पुढारी वगैरे' हा भन्नाट मिसरा असलेली) आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त दाद घेऊन गेली. वैभव यांच्या शायरीने मुशायऱ्याचा मूड पुन्हा पालटला. तोपर्यंत चित्तरंजन यांचा 'डोक्यावरती पंखा रोरावत असतो- मी मिटून डोळे कविता जागत असतो' हा मतला सुरू झाला. चित्त यांची ही गझल सर्वांनाच फार आवडली.
गझलकार अनिरुद्ध अभ्यंकरही आले होते मात्र त्यांच्याकडे गझल रेडी नसल्यामुळे त्यांनी त्यांची गझल ऐकवली नाही.
तिसऱ्या फेरीत पुन्हा मी, अजय व समीर यांच्या गझला झाल्यानंतर अनंतरावांनी पुन्हा काही अंतर्मुख करायला लावणारे शेर ऐकवले. यानंतर आप्पा ठाकुरांनी आणखीन एक जोरदार गझल पेश केली.
या गझलेला त्यांच्या आधीच्या गझलेपक्षा जास्त प्रतिसाद आला. आत्तापर्यंत सभागृह नुसते खिळून बसले होते. यानंतर म भां नि पारंपारिक गझलेला बाजूला ठेवून एक सामाजिक आशयाची रचना पेश केली. म भांचे सादरीकरण अर्थातच भन्नाट आहेच.
म भांच्या शायरीत पेरलेल्या खुशखुशीत ओळी आणखीनच दाद घेत होत्या. 'सगळ्या जगात जर का काही विशेष आहे, माझी मिसेस आहे माझी मिसेस आहे' हा
म भांचा शेर नेहमीप्रमाणेच खसखस पिकवून गेला. म भांनी चित्तरंजन यांच्या गझलबाबतच्या जाणीवेचे यावेळी कौतूक केले.
यानंतर चित्तरंजन यांनी समारोपासाठी 'वाटले बरे किती' ही सुरेख गझल ऐकवली. खरे तर अजूनही कदाचित हा मुशायरा चालला असता, वेळेचे बंधन होते.
बरोबर एक तासात चक्क २४ वैविध्यपूर्ण विषयांच्या गझला व भन्नाट सादरीकरणे असलेला हा मुशायरा व्हिडिओमध्ये बंदिस्त आहे, त्याची उद्या सी डी बनेलच.
यानंतर मी, समीर, अनंत, चित्तरंजन, वैभव, निशात, अनिरुद्ध, अभिजीत, प्रशांत व पराग हे सर्व मुशायऱ्याच्या 'श्रमपरिहारासाठी' भेटलो. :-))
या सभागृहात गझलकार घनश्याम धेंडे, मधुघट हेही उपस्थित होते. ओंकार जोशी मात्र येऊ शकले नाहीत.
प्रतिसाद
केदार पाटणकर
मंगळ, 22/12/2009 - 13:04
Permalink
कार्यक्रम उत्तम झाल्याचे
कार्यक्रम उत्तम झाल्याचे वाचून समाधान झाले. तशी अपेक्षा होतीच.
उदाहरणासकट अजून विवेचन करावे, ही विनंती.
ज्ञानेश.
मंगळ, 22/12/2009 - 14:33
Permalink
वा वा. छानच झाला
वा वा.
छानच झाला कार्यक्रम.
भरपूर इच्छा असूनही मला कार्यक्रमाला येता आले नाही, याचा खेद वाटतो.
आता व्हिडीओ चित्रीकरण पाहून ताकावर भागवावे म्हणतो!
हेमंत पुणेकर
मंगळ, 22/12/2009 - 21:35
Permalink
तीन्ही गझलकारांना
तीन्ही गझलकारांना अभिनंदन!
भूषण, इतका सुंदर वृत्तांत दिल्या बद्दल धन्यवाद!
खुप इच्छा असूनही कार्यक्रमाला येता आले नाही. सीडी कशी मीळु शकेत ते कळवावे.
प्रसाद लिमये
गुरु, 24/12/2009 - 11:32
Permalink
भूषण - छान लिहिला आहेस
भूषण - छान लिहिला आहेस वृत्तांत. या कार्यक्रमाला यायची खूप इच्छा होती. पण त्यादिवशी मुंबईला होतो त्यामुळे येऊ शकलो नाही. एकतर तू, अजय, चित्तरंजन, वैभव जोशी सगळ्यांना भेटता आले असते व आजतागायत प्रत्यक्ष मुशायरा अनुभवलेला नाही , तो ही अनुभव घेता आला असता व अशा छान रंगलेल्या मैफिलीचा. असो.. पुन्हा कधीतरी.
वृत्तांतामधे उल्लेख केलेल्या काही गझला ...उदा. - 'तो आधी माणूस होता त्याचे माकड नंतर झाले' 'खूप खूप विषयांतर झाले' या कुठे वाचायला मिळतील ??