केवढे छान दिवस होते ते
मी तुला पाहताच तू बघणे, केवढे छान दिवस होते ते
आणि कोणास ते न जाणवणे, केवढे छान दिवस होते ते
तू दिसावीस एवढी इच्छा, वाट माझीच पाहणे तूही
आणि दिसताच मी, तुझे लपणे, केवढे छान दिवस होते ते
खूप गर्दी सभोवती असणे, एकमेकात गुंफणे डोळे
मान फिरवून तू हळू हसणे, केवढे छान दिवस होते ते
'छान दिसतेस' मी तुला म्हणणे, 'काय म्हणलास' तू मला पुसणे
बोलणे, ऐकणे, पुन्हा घडणे, केवढे छान दिवस होते ते
चौकशी वेगवेगळी करणे, उत्तरे गोडगोडशी देणे
माहिती रोज रोज वाढवणे, केवढे छान दिवस होते ते
धीट प्रस्ताव मांडणे माझे, लाज अनुमोदनात भिनलेली
हात हातात यायला धजणे, केवढे छान दिवस होते ते
प्रेम माझे कबूल आहे हे, सांगुनी लाजर्या कटाक्षांनी
चोरट्या चुंबनांत सावरणे, केवढे छान दिवस होते ते
नेहमी भेट घ्यायची असणे, नेहमी कारणे पुढे करणे
नेहमी तेच आपले रुसणे, केवढे छान दिवस होते ते
काय होणार यापुढे अपुले, जाण नाही तुला मला काही
आपले 'बेफिकीर'से जगणे, केवढे छान दिवस होते ते
केवढे छान दिवस होते ते.........
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
शनि, 28/11/2009 - 15:36
Permalink
बोलणे, ऐकणे, पुन्हा घडणे,
बोलणे, ऐकणे, पुन्हा घडणे, केवढे छान दिवस होते ते
ही ओळ खूप छान वाटली.
कविता जराशी बोजड वाटतेय...जराशी शब्दबंबाळही.
ही कविता कवीच्या तोंडून त्याच्या चालीत ऐकली तर खुलेल असं वाटतंय.
अजय अनंत जोशी
शनि, 28/11/2009 - 16:22
Permalink
बर्यापैकी झाले आहे. मात्र,
बर्यापैकी झाले आहे. मात्र, 'केवढे छान दिवस होते ते' यामुळे भूतकाळच घ्यावा लागतो आहे आणि त्यामुळे मर्यादा येतात असे वाटते.
ही गझलपेक्षा कथा वाटते आहे. मात्र, शब्दबंबाळ आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शनि, 28/11/2009 - 19:38
Permalink
:) चौकशी वेगवेगळी करणे,
:)
चौकशी वेगवेगळी करणे, उत्तरे गोडगोडशी देणे
माहिती रोज रोज वाढवणे, केवढे छान दिवस होते ते
उपक्रम या मराठी संकेतस्थळाविषयी या अर्थपूर्ण ओळी दिसतात.
मला आवडल्या वरील ओळी. :)
वाचतोय आपले काव्य....!
-दिलीप बिरुटे
ज्ञानेश.
शनि, 28/11/2009 - 20:01
Permalink
भूषणराव, नाही जमली ही
भूषणराव, नाही जमली ही गझल.
सॉरी!
काव्यरसिक
रवि, 29/11/2009 - 14:25
Permalink
ज्ञानेशशी सहमत. तुमच्याच ईतर
ज्ञानेशशी सहमत.
तुमच्याच ईतर रचनांपे़क्षा थोडी वेगळी आहे.
बेफिकीर
रवि, 29/11/2009 - 14:41
Permalink
सर्व प्रतिसादकांचे आभार!
सर्व प्रतिसादकांचे आभार! प्रतिसादांमधील अनेक बाबी वाचून मनोरंजन झाले. मी एक प्रतिसाद देत आहे, त्यातच सर्व प्रतिसादांवर माझी मते देत आहे. अर्थातच, आपल्या सर्वांच्या मतांचा आदर आहेच. (आपली मते चुकीची आहेत हे सिद्ध करायचे नसून मला फक्त माझी मते द्यायची आहेत. अजून चर्चा झाल्यास फारच चांगले.)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कविता जराशी बोजड वाटतेय...जराशी शब्दबंबाळही.
ही कविता कवीच्या तोंडून त्याच्या चालीत ऐकली तर खुलेल असं वाटतंय. - ऋत्विक
१. बोजड वाटणे - बोजड असणे व वाटणे दोन्ही़ शक्य आहे. पण लांब वृत्तामुळे वाटत असल्यास मला माहीत नाही.
२. शब्दबंबाळ - याचा अर्थ मला माहीत नाही. मला एक माहीत आहे की एक तर 'ही संपूर्ण गझलच अनावश्यक आहे' असे मत येऊ शकते' पण या गझलेतील एकही शब्द अनावश्यक नाही. ही गझल मी स्वतःच्या आयुष्यातून जशीच्यातशी घेतलेली आहे. सर्व शेरांमधील गोष्टी घडलेल्या आहेत. त्यात एकही शब्द अनावश्यक नाही.
३. कवीच्या तोंडुन ऐकल्यास खुलेल असे वाटतंय - मी या गझलेला चाल लावलेली आहे. मी स्वतः गातो असा माझा समजही आहे. या गझलेतील पहिल्या शेरातील पहिला मिसरा जसाच्या तसा व चालीत सुचलेला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बर्यापैकी झाले आहे. मात्र, 'केवढे छान दिवस होते ते' यामुळे भूतकाळच घ्यावा लागतो आहे आणि त्यामुळे मर्यादा येतात असे वाटते.
ही गझलपेक्षा कथा वाटते आहे. मात्र, शब्दबंबाळ आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही. - अजय
१. बर्यापैकी झाले आहे - आभार!
२. भूतकाळच घ्यावा लागतो आहे - मला काहीही कधीही घ्यावे 'लागत' वगैरे नाही. जे जसे सुचते तसेच मी लिहितो. ठरवून काळ, कर्ता, कर्म, क्रियापद घेत नाही. हां! एक मिसरा सुचल्यानंतर मात्र त्याच जमीनीत इतर शेर / मिसरे यावेत यासाठी अर्थातच डागडुजी असतेच. पण त्यातू़न गझलकारच नाही तर मुक्तछंदवालेही सुटलेले नाहीत. मुळात 'एकेकाळी फुलत असतानाच्या स्टेजवरील प्रेमच गझलेत सर्वत्र येणार' हे ठरलेले असल्याने 'एखादा काळ घ्यावा लागणे' वगैरे घटना घडत नाहीत. त्यामुळे, मर्यादा निदान मला तरी गझल रचताना आलेल्या नाहीत. आपल्या दृष्टीने गझल मर्यादीत स्वरुपाची असल्यास अर्थातच मताचा आदर आहे.
३. गझलपेक्षा कथा वाटत आहे - गझल कथा असतेच. (असलीच पाहिजे असे नाही, प्रश्नही असू शकेल. पण शेरामधे काही ना काही कथानक येतेच. यासाठी आपला आजवर रचलेला कुठलाही शेर मनात तपासून पाहावात अशी विनंती!)
४. शब्दबंबाळ नाही - धन्यवाद!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिरुटे -
चौकशी वेगवेगळी करणे, उत्तरे गोडगोडशी देणे
माहिती रोज रोज वाढवणे, केवढे छान दिवस होते ते
उपक्रम या मराठी संकेतस्थळाविषयी या अर्थपूर्ण ओळी दिसतात. - मी आपल्याकडून असंबद्ध प्रतिसादाची अपेक्षा करतोच.
मला आवडल्या वरील ओळी. :) - धन्यवाद :)
वाचतोय आपले काव्य....! - जन्म सार्थकी लागला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भूषणराव, नाही जमली ही गझल.
सॉरी!
- ज्ञानेश!
ज्ञानेश, मला आपल्या या प्रतिसादाबाबत काही लिहायचे आहे.
१. सॉरीचा प्रश्नच नाही. ते आपले मत आहे.
२. 'गझल जमली नाही' हेही मत पूर्णपणे मान्य आहे. मात्र, यावर मला काही लिहायचे आहे.
अ - गझल जमणे म्हणजे काय? मागे आपण कुणालातरी 'आपल्याकडून नेहमी ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत' असे म्हणाला होतात तसे मुत्सद्दी विधान न करता कुपया सांगावेत की 'गझल जमणे' म्हणजे काय?
ब - माझ्यामते वरील गझलेतील प्रत्येक शेर गझलेचा असून ही रचना संपूर्णपणे गझल आहे. आपण जाणता की मी माझ्या रचनांच्या बाबतीत कधीच वाद न घालता 'रसभंगासाठी दिलगीर आहे' इतकेच लिहितो. पण या गझलेबाबत मी तसे न लिहिण्याचे कारण की 'कोणती रचना गझल नाही' अशी काहीतरी व्याख्या आपल्या प्रतिसादून तयार होऊ शकेल व ते मला 'माझ्यापुरते' मान्य नाही.
क - मराठी रसिकांना दशकानुदशके 'फक्त आक्रमक व जोमदार ओळींनाच' गझलेच्या ओळी समजायची सवय लागलेली आहे. याचे कारण मी स्पष्ट लिहीत आहे की भटसाहेबांच्या ओरिजिनॅलिटीला सेकंड जनरेशन गझलकारांनी 'आपलीच ओरिजिनॅलिटी' असल्याप्रमाणे समाजापुढे आणले व मराठी माणसाने तोच मूड 'गझलेचा' मूड म्हणून स्वीकारला. भटसाहेबांप्रमाणे नाजूक काव्य मात्र त्यांच्या काव्यात प्रभावीपणे आले नाही. हे कुठल्याही आकसापोटी आलेले विधान नसून 'मुळात उर्दू गझल अशी नाहीच आहे' या मतातून व या सर्व सेकंड जनरेशनच्या गझलकारांचे गझलसंग्रह वाचनातून आलेले विधान आहे. तसेच, भटसाहेबांच्या प्रकाशित काव्यातीलही नाजुक शब्दरचनेच्या गझला व आक्रमक ओळींच्या गझला यातील आक्रमक ओळींचे प्रमाण हे उर्दूमधे सहसा येणार्या आक्रमकतेपेक्षा खूप जास्ती आहे असे मला वाटते. वर मी रचलेली जी रचना आहे (सध्या मात्र गझल म्हणत नाही ) त्यातील प्रत्येक शेरात गझलेस शोभणारा विषय आहे. ( 'आशय फालतू आहे' असे मत असल्यास त्याचा आदर आहे, मी एक यकश्चित यमककार आहे) पण 'गझल' जमलीच नाही हे मान्य नाही. आपणच मला सांगा: 'रणात आम्ही कमावली ती तहात गेली' या आपल्या मिसर्याचा अर्थ काय? आपल्या मते रियासतींचे अवशेष असे सांगत आहेत. मग इतिहास कथन करणे हे आपल्यामते गझलेचे कर्तव्य आहे काय? गझलेचे मूळ कर्तव्य प्रेम, विरह, व्यथा व ईशचिंतन याभोवती शतकानुशतके आलेले स्पष्ट दिसते. तसेच, 'गायही रस्त्यात नाही येत हल्ली' हा मिसरा गझलेचा आहे असे मला समजता येऊ शकत नाही. आपल्या मिसर्यांची उदाहरणे देण्यातही आकस नसून त्या उदाहरणांमार्फत मत स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आपले कित्येक मिसरे सगळ्यांचीच दाद गेहून गेले आहेत. खालील उर्दू व मराठी शेरांची उदाहरणे पहावीत अशी विनंती!
१) आताच पारधी ते सजवून प्रेत गेले
त्यांच्याच आसवांनी करपून प्रेत गेले - इलाही जमादार - जखमा अशा सुगंधी!
कुठले पारधी कुणाचे प्रेत सजवून गेले अन त्यांच्याच आसवांनी ते प्रेत करपून गेले - इतक्या हीन व हिणकस कल्पना गझलेत असतात असे वाटत नाही.
२) इथे माणसांतील पाहून भिंती
म्हणाल्यात पाली "अरेरे अरेरे" - प्रदीप निफाडकर - स्वप्नमेणा
माझ्यामते हा शेर गझलेला शोभणारा नाही.
१ - अब तो ये भी नही रहा एहसास
दर्द होता है या नही होता - जिगर
२- बहोत करीबसे कोई सदा तो देता है
करू तलाश तो मिलता मगर कोई भी नही - एक हयात असलेले श्रेष्ठ उर्दू शायर!
(व्यक्तीगत संदर्भ ही माझी वैयक्तीक जबाबदारी आहे. विश्वस्तांना ते अयोग्य वाटल्यास ते संदर्भ काढणे यास माझा विरोध असू शकत नाही.)
-बेफिकीर!
ऋत्विक फाटक
रवि, 29/11/2009 - 18:17
Permalink
२. शब्दबंबाळ - याचा अर्थ मला
२. शब्दबंबाळ - याचा अर्थ मला माहीत नाही. मला एक माहीत आहे की एक तर 'ही संपूर्ण गझलच अनावश्यक आहे' असे मत येऊ शकते' पण या गझलेतील एकही शब्द अनावश्यक नाही. ही गझल मी स्वतःच्या आयुष्यातून जशीच्यातशी घेतलेली आहे. सर्व शेरांमधील गोष्टी घडलेल्या आहेत. त्यात एकही शब्द अनावश्यक नाही.
१.शब्दबंबाळ याचा अर्थ मला जो अभिप्रेत होता तो तुम्ही योग्य घेतलात. काही शब्द जरासे जास्त झालेत असे वाटते.
'कोणते शब्द?' हा पुढील प्रश्न असू शकेल, पण ह्या कवितेची परत चिरफाड करण्याइतकी चिकाटी माझ्याकडे नाही. क्षमस्व.
२.ही गझल मी स्वतःच्या आयुष्यातून जशीच्यातशी घेतलेली आहे.
माझ्यामते या 'जशीच्यातशी' घेण्यामुळेच बोजडपणा आला असावा.
म्हणजे एखादी गोष्ट 'थोडक्यात सांगणे' आणि 'पाल्हाळ लावून जशीच्या तशी सांगणे' यात जो फरक आहे तोच.
३.कवीच्या तोंडुन ऐकल्यास खुलेल असे वाटतंय - मी या गझलेला चाल लावलेली आहे. मी स्वतः गातो असा माझा समजही आहे.
ही गझल वाचल्यावर तुम्ही ही चालीत म्हणत असाल असेच वाटले.
तुमच्या चालीमुळे गझल निश्चितच वेगळी वाटत असणार.
ज्ञानेश.
रवि, 29/11/2009 - 18:25
Permalink
उत्तरे ! अ)गझल जमणे म्हणजे
उत्तरे !
अ)गझल जमणे म्हणजे काय?
माझ्यापुरते सांगतो- गझल/शेर वाचताक्षणी आवडून जाणे, मनातून दाद जाणे.. याला मी गझल जमणे असे समजतो. आपल्या अनेक टोकदार मिसर्यांना मी अशी दाद दिली आहे, हे आठवत असेलच.
गझल जमणे, शेर फसणे, आवडणे, नावडणे या सगळ्या गोष्टीत प्रत्येकाला आपापली मते असू शकतात. माझा व्यासंग फारसा नसल्याने 'गझल जमणे'ची व्याख्या मी करू इच्छित नाही!
ब) माझ्यामते वरील गझलेतील प्रत्येक शेर गझलेचा असून ही रचना संपूर्णपणे गझल आहे.
ही रचना गझल नाही, असे मी कुठेच म्हटलेले नाही. 'गझल' जमली नाही, इतकेच म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न बाद!
क)गझलेचे मूळ कर्तव्य प्रेम, विरह, व्यथा व ईशचिंतन याभोवती शतकानुशतके..
प्रामाणिकपणे सांगतो- मी एवढा विचार केला/करत नाही. "रणात आम्ही कमावले ते तहात गेले" हा शेर आपल्याला इतिहास कथन करणारा वाटत असेल, तर कठीण आहे.
भावना कुठलीही असो, ती तीव्रपणे आणि ठळकपणे सामोरी आली पाहिजे. शेर 'भिडला' पाहिजे. मग तो शेर माझा, तुमचा की भटसाहेबांचा या गोष्टी दुय्यम आहेत.
तुम्ही उदाहरणे दिलीत, म्हणून थोडे अवांतर लिहितो-
'रणात कमावले ते तहात गेले' हा इतिहास आहे. तो सगळ्यांना माहिती आहे. मग तेच शेरात का लिहायचे? तर यात एक पराभूत भाव आहे. 'च्यायला; सगळं होतं आपल्याकडे, हाताने घालवलं.. हे असंच होत आलं आहे नेहमी..' अशा प्रकारचा उद्विग्न, हताश भाव त्यात आहे. हे उदाहरण 'स्पेसिफिक' असले, तरी ही भावना वैश्विक आहे, असे मला वाटते. अर्थात, आज हे सगळे माझ्या शेराला डिफेंड करण्यासाठी मी लिहित असलो, तरी शेर ज्यावेळी तयार केला तेव्हा यातले काहीही डोक्यात आले नव्हते.
गाय- हिंदू धर्मात गायीचे स्थान नव्याने सांगायची गरज नाही. मी ज्या पद्धतीच्या लहान शहरांत वाढलो आहे, तिथे हे दृष्य अनेकवेळा पाहिले आहे की एखादी गाय भर रहदारीत रस्त्यात येऊन बसते.. पण रस्त्यातल्या कुणालाच त्याचा त्रास होत नाही. कुणी वैतागत नाही, की गायीला हुसकावत नाही. उलट दुचाकीवरचे लोक वळसा घालून, एका हाताने स्पर्श करून तो हात डोक्याला लावतात.. आणि आशिर्वाद दिल्यासारखी गायीची कातडी थरथरते!
केवढा निवांतपणा होता त्याकाळी लोकांना ! हे केवढे काव्य आहे! परस्परांबद्दल पराकोटीचा आदर, भक्तिभाव, इतरांसाठी थोडाफार त्रास सहन करण्याची तयारी असे आपल्या संस्कृतीचे अनेक विशेष मला या साध्या घटनेत जाणवतात.
या सगळ्या जुन्या, मी पाहिलेल्या गोष्टी झाल्या.
तुम्ही म्हणता तो शेर असा आहे-
"जीवनाचा वेग इतका वाढला की-
गायही रस्त्यात नाही येत हल्ली !"
आता काय परिस्थिती आहे? आज एखाद्या वर्दळीच्या रस्त्यात गायीलाही येऊन बसण्याची हिंमत होणार नाही, कारण तिला माहिती आहे की आज आपल्यासाठी कुणी थांबणार नाही, वळसा घालणार नाही.. न जाणो आपल्याच जिवावर बेतेल!
हा शेर आयुष्याच्या वेड्यासारख्या वाढलेल्या गतीवर भाष्य करतो.. गाय हे फक्त एक उदाहरण! हेच उदाहरण का वापरले? याला कारण नाही..
ड)आता तुमच्या वरील गझलेत मला काय त्रुटी आढळल्या, ते सांगतो.
ड१- मोठे वृत्त! मोठे वृत्त वापरणे ही चूक नाही, त्यात तेवढा कंटेंट न भरता येणे ही चूक आहे. (इथे ऋत्विकचा 'शब्दबंबाळ' हा शब्द कुठून आला असावा, हे कळते.) आपला वरील गझलेतील सगळा आशय तुम्हीसुद्धा याहून कमी मात्रांमधे अगदी सहज बसवू शकाल. वृत्ताची लय मला शेवटपर्यंत सापडली नाही. (हा दोष माझाही असू शकेल.)
मोठ्या आणि तरीही सहज लयीत म्हणता येणार्या वृत्ताचे एक उदाहरण-
"अताशा चांदण्यांशी भांडण्यातच रात्र जाते, त्रास होतो त्रास नुसता..
पहाटे मात्र जाणवते पुरे आहे जगाया पौर्णिमेचा भास नुसता !"
ड२- कंटेंट! भावना सच्ची असेलही, ती इतकी वरवर आणि बाळबोधपणे मांडली आहे, की तिचा 'मझा' येत नाही. वास्तविक पाहता 'किती छान दिवस होते ते' आणि 'वो जमाना याद है..' मधली भावना एकच आहे. पण त्या गझलेत ती जशी थेट आणि जोरकसपणे सामोरी येते, तशी आपल्या सदर गझलेत आलेली मला जाणवली नाही. सदर शेर हे दोन पेन्शनरांनी शिळोप्याच्या गप्पा माराव्यात, तसे वाटतात. [किती छान दिवस होते नै ते!]
आपले काहीतरी वैयक्तीक नुकसान झाल्याची, तुटल्याची, हरवल्याची भावना जाणवायला हवी.. तशी जाणवत नाही. (चुपके चुपके रात दिन... मधे जाणवते, त्या पद्धतीने.)
ड३- स्टोरी टेलिंग! एकच गोष्ट सगळ्या शेरात वेगवेगळ्या शब्दात सांगीतली आहे. नीरजच्या 'अशी गोड तू' या गझलेबद्दलची तुमचीच मते एकदा डोळ्याखालून घालावीत, ही विनंती.
(इथे अजयरावांचा 'गोष्ट' हा शब्द कुठून आला, हे कळते.)
ड४- सपाटपणा ! याबद्दल आधीही बरेच दळण दळले गेले आहे. त्यामुळे फार खोलात जात नाही.
पण उपमा, उत्प्रेक्षा, विरोधाभास, कलाटणी.. या गोष्टी निश्चित प्रभाव पाडतात. विशेषतः कंटेंट मर्यादित असेल तर! या सगळ्याच्याविनाही गझला 'महान' बनतात. (उदा.- काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली.. ढवळेसाहेब.) अशी काही उदाहरणे या साईटवर आहेत.
------------------------------------------------------------
बघा, एका 'गझल जमली नाही' या शब्दात काय काय म्हणून सांगता येते.
आज रविवार असल्याने आणि आपली खिलाडूवृत्ती जाणून असल्याने एवढा प्रतिसाद देण्याचे कष्ट घेतले आहेत.
हे एरवी जमत नाही.
----------------------------------------------------------------
ता.क.- आणि हो, हा प्रतिसाद दिवसा दिलेला आहे! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवि, 29/11/2009 - 21:16
Permalink
आपल्या गझलेपेक्षा, आपले
आपल्या गझलेपेक्षा, आपले प्रतिसाद वाचून खूप मनोरंजन होते, आनंद होतो. गुदगुल्या होतात.
कधी नव्हे ते, आपल्यामुळे आमच्या या संकेतस्थळावर चकरा वाढल्यात. आपले प्रथम मनःपूर्वक आभार.
''चौकशी वेगवेगळी करणे, उत्तरे गोडगोडशी देणे
माहिती रोज रोज वाढवणे, केवढे छान दिवस होते ते''
वरील ओळीतून जो अर्थ आम्हाला लागला, ते आम्ही वर प्रतिसादात सांगितले. आपणास तो 'असंबद्ध प्रतिसाद' वाटत असेल तर, आमचा त्याला विलाज नाही, कवीला जे वाटते तेच वाचकांना समजणे ही दैवी गोष्ट ठरावी. अर्थात आपल्याला काय वाटते त्याचे आम्हाला कोणतेच सोयरसुतक नाही.
’ज्ञानेश’ यांचा प्रतिसाद मला मनापासून आवडला आहे. आता लिहिण्यासारखे काही नाही. पण, तुम्हाला इतके सहज सोडू नये असेही वाटते. :)
तंत्र उत्तम लाभलेलं आहे. पण ’काव्य’ जर उंचीवर नेता येत नसेल तर तो दोष लेखकाचा की आमच्यासारख्या वाचकांचा ? शब्दांच्या पलिकडील अर्थ उमजवणारी प्रतिभा आमच्याकडे नाही. साध्या सोप्या शब्दात असलेल्या अर्थांनी आम्ही आनंदून जातो. बुद्धीची परवानगी न घेता, तोंडून दाद निघून जाते ते उच्च काव्य असे आम्ही समजतो.
>>जन्म सार्थकी लागला.
अहो, आमचं मागील कोणत्या तरी जन्माचं पुण्य की आम्हाला आपल्या गझला या जन्मात वाचायला मिळत आहे. प्लीज थांबू नका.......बोलत राहू, भेटत राहू...!!!!
-दिलीप बिरुटे
चित्तरंजन भट
सोम, 30/11/2009 - 01:11
Permalink
छान. "चुपके चुपके रात दिन
छान. "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" ची आठवून करून देणारी वाटते हे खरे.
चर्चेच्या अनुषंगाने माझे काही विचार
१. एकंदरच मुळात लिहिण्यासारखं, सांगण्यासारखं फारस काही नसलं की चित्रकारी वाढते. विशेषणे, दादलेवा विरोधाभास, दिलखेचक इमेजरी ह्या गोष्टींचा उपयोग होतो. ह्याशिवाय (ह्या गोष्टींना बाजूला काढून) दोन ओळींत किती जान आहे हे बघायला हवे. द्विपदीने लोकांची दाद मिळवल्यास उत्तमच. बोनसच. पण तिचा तेवढाच हेतू नको.
२. आक्रमकता, नजाकत-बिजाकतीचे माहीत नाही. पण गझल काळानुसार बदलायला नको काय?
उदा.
सियाही आँखकी लेकर मैं नामा तुमको लिखता हूँ
के तुम नामे को देखो और तुम्हे देखे मेरी आँखे
हा शेर अगदी दादलेवा आहे. पण सध्याच्या काळातला आहे काय? मराठी गझलेतही अशा छान-छान, अप्रगल्भ पण दादलेवा 'गतकालीन'द्विपदींचा कचरा खूप जास्त आहे. (ह्या विषयावर वेगळी सविस्तर चर्चा झाल्यास उत्तमच.)
३. छोटे/मोठे/मात्रा/अक्षरगण वृत्त, तंग/सैल जमीन, 'फष्टक्लास'(आकार-बाजार छाप)/'थर्ड-क्लास' (म्हटले, बसले छाप) यमके ह्या गोष्टींच्या चर्चांना अंत नाही. गझलकार व वाचक-रसिक ह्यांनी चर्चांच्या भूलभुलैय्यातून बाहेर यायला हवे. गझल डोळसपणे वाचून तितक्याच दिलखुलासपणे दाद-प्रतिसाद देणारे किमान काही मर्मज्ञ वाचक-रसिक मराठी गझलेला मिळायला हवेत.
तूर्तास एवढेच.
बेफिकीर
सोम, 30/11/2009 - 11:10
Permalink
ज्ञानेश, १. प्रतिसादातील
ज्ञानेश,
१. प्रतिसादातील प्रामाणिकपणा आवडला.
२. माझा गैरसमज असा झाला होता की 'गझल जमली नाही' म्हणजे 'गझलच झाली नाही' असे आपण म्हणत आहात.
३. मी नीरजच्या 'तुझेच गीत गायचे' या गझलेवर तसे म्हणालो होतो, 'अशी गोड तू' वर नाही. 'तुझेच गीत गायचे' या बाबतीत आपणही नंतर इतरांशी चर्चा करून माझ्याशी जाहीर सहमत झाला होतात. 'अशी गोड तू' ही मात्र माझ्यामते कविता आहे.
४. 'अताशा चांदण्याशी' या गझलेवरही असाच प्रश्न निघाला होता की हे वृत्त एवढे लांब का? आज तो प्रश्न आपण विचारला आहेत.
५. बाळबोध, मझा न येणे, कथा, पेन्शनर या आपल्या मतांचा पूर्ण आदर आहे. माझी गझल श्रेष्ठ आहे असा माझा मुळीच दावा नाही. मला 'ही गझल आहे' एवढेच म्हणण्यात रस होता.
६. ऋत्विक व अजय त्यांची मते द्यायला स्वतंत्र आहेत, माझ्यामते आपण 'त्यांनी असे का म्हंटले असेल' या ऐवजी आपल्याला काय वाटते एवढेच लिहिले असतेत तर बरे झाले असते. असो, मलाही व तुम्हालाही वाद घालायचा नाही.
७. अजूनही , मला शब्दबंबाळ म्हणजे असे वाटते की 'आकर्षक किंवा वेधक शब्दांची आशयात आवश्यकता नसताना केवळ रंगकामासाठी उपयोजना करणे'! पण ही चर्चा स्वतंत्र आहे.
८. 'चुपके चुपके' ची आठवण होणे साहजिक आहे, ते मलाही गझल रचतानाच जाणवले होते. मी माझ्याशी प्रामाणिक राहिलो.
९. लज्जिता वुत्तात एका ओळीत 'गालगा गालगा लगागागा' असा क्रम येतो. तोच दुप्पट करून एका ओळीत घेतलेला आहे. एका गटानंतर यती आहे. तसे वाचल्यास आपल्यालाही ही रचना लयीत म्हणता येईल. म्हणजे, 'मी तुला पाहताच तू बघणे - यती - केवढे छान दिवस होते ते'
१०. 'गझल जमली नाही' याचे स्पष्टीकरण मागीतल्यावर खूप सांगता येते हे मलाही ज्ञात आहेच. :-))
ऋत्विक,
१. बोजडपणा येणे, पाल्हाळ लावणे या आपल्या मतांचा आदर आहे.
बिरुटे,
आपल्या प्रतिसादांनी खूप मजा मजा येते. जगण्यात रस निर्माण होतो.
चित्तरंजन,
१. कदाचित या गझलेत सांगण्यासारखे काही नसू शकेल. आपले हे मत मला समजले व मान्य आहे.
२. सियाही शेराचे आपण दिलेले उदाहरण - मी नुकताच एक शेर रचला होता.
तुझ्या लोचनांना गझल दाद देते
तुझ्या वाचनाचे कवी दास झाले
(अर्थात्, हा शेर बराच वेगळ्या अर्थाचा आहे. ) पण हा कोणत्याही काळात चालू शकेल असे वाटले. गझल काळाप्रमाणे बदलायलाच हवी असे माझेही मत आहे. खरे तर ती आपोआप बदलतेच. पण गझल या काव्यप्रकाराची मूळ वैशिष्ट्ये ( प्रेम / विरह / व्यथा यावर असलेले भाष्य, संवादात्मकता वगैरे व आणखी काही - हे मी आपल्यासमोर बोलणे हा विनोद आहे) मात्र काळाप्रमाणे बदलू नयेत असेही वाटते.
३. तिसरा मुद्दा अर्थातच मान्य आहे. माझ्याकडून या स्थळावर या गझलेच्या निमित्ताने काही अनावश्यक वाद झाला असल्यास क्षमस्व!
सर्वांचे आभार!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोम, 30/11/2009 - 16:23
Permalink
>>कदाचित या गझलेत
>>कदाचित या गझलेत सांगण्यासारखे काही नसू शकेल. आपले हे मत मला समजले व मान्य आहे.
दॅट्स ऑल !
>>आपल्या प्रतिसादांनी खूप मजा मजा येते. जगण्यात रस निर्माण होतो.
:) थॅंक्स....!
-दिलीप बिरुटे
हेमंत पुणेकर
सोम, 30/11/2009 - 22:56
Permalink
ह्या साईट वरचा माझा हा प्रथमच
ह्या साईट वरचा माझा हा प्रथमच प्रतिसाद आहे. मला पुण्यात सहा वर्ष झाले. माझा जन्म आणि शिक्षण गुजराथ मधे बडौद्याला झाले. मी गुजराथी गझल वाचतो/लिहीतो. (माझ्या मराठी साठी क्षमस्व!)
खूप छान चर्चा चालु आहे. तंत्राच्या दॄष्टिने गझल छान आहे. "लाज अनुमोदनात भिनलेली" मधे "लाजनुमोदनात...." असा उच्चार करुन वृत्त निभावले आहेत - खुप छान! थोड्या प्रमाणात सपाटबयानी आहे हे मात्र जाणवलं. बेफिकीर ह्यांचे अभिनंदन!
वृत्ता बद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते. गालगा गालगा लगागागा ह्या प्रमाणे विचार केला तर दिवस ह्या शब्दाचं वजन/माप "गाल" घेतलेलं आहे असं कळतं. पण "दिवस" शब्दाच नैसर्गिक वजन/माप "लगा" आहे. आपण बोलतानां "दि-वस" असा उच्चार करतो. "दिव-स" कृत्रिम उच्चार वाटतो.
बेफिकीर
शुक्र, 04/12/2009 - 11:44
Permalink
ह्या साईट वरचा माझा हा प्रथमच
ह्या साईट वरचा माझा हा प्रथमच प्रतिसाद आहे. - मनापासून स्वागत!
लाज अनुमोदनात भिनलेली" मधे "लाजनुमोदनात...." असा उच्चार करुन वृत्त निभावले आहेत - तसे वृत्त 'निभावलेले' नाही. (वृत्त निभावणे म्हणजे काय ते समजले नाही). लाज = गाल आणि अनु = गा अशारीतीने ते 'गालगा' होत आहे.
खुप छान! थोड्या प्रमाणात सपाटबयानी आहे हे मात्र जाणवलं. - आपल्या मताचा आदर आहे.
वृत्ता बद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते. गालगा गालगा लगागागा ह्या प्रमाणे विचार केला तर दिवस ह्या शब्दाचं वजन/माप "गाल" घेतलेलं आहे असं कळतं. पण "दिवस" शब्दाच नैसर्गिक वजन/माप "लगा" आहे. आपण बोलतानां "दि-वस" असा उच्चार करतो. "दिव-स" कृत्रिम उच्चार वाटतो.
- 'शब्दांची नैसर्गीक व कृत्रिम वजने' ही संकल्पना कृपया विस्तृतपणे सांगावीत.
आभारी आहे.
हेमंत पुणेकर
शनि, 05/12/2009 - 02:08
Permalink
भूषणराव, मनापासून स्वागत! -
भूषणराव,
मनापासून स्वागत! - आभारी आहे
२० तारखेला आपल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन आहे, त्या बद्दल अभिनंदन.
मी गुजराथी गझल (व अगदि थोड्या प्रमाणात उर्दु गझल) वाचुन/लीहून जे शीकलो ते सांगतो. मी कोणी मोठा छंदशास्त्री/वृत्तशास्त्री नाही. तरी पण सवाशे वर्ष जुन्या गुजराथी गझल परंपरेची काहीशी ओळख मराठी गझलकारांनां पण व्हावी म्हणून सांगतो.
नैसर्गीक व कृत्रिम वजन --> एखाद्या शब्दाचा प्रचलित उच्चार जसा करण्यात येतो, त्या प्रमाणेच त्या शब्दातल्या अक्षरांचे वजन ठरवले तर ते नैसर्गीक वजन.
आपल्या भारतीय छंद-वृत्तांमधे लघु-गुरुची विभावना संस्कृत भाषेतुन आली. पण मध्यकालात फारसी भाषेचा भारतीय भाषेंवर परिणाम झाल्याने आपले उच्चार संस्कृत उच्चारांपासून बर्या पैकी लांब गेले. उदाहरणार्थ "दिवस" हा शब्द संस्कृत मधे बोलताना त्याच्या प्रत्येक अक्षराचा उच्चाराला समान वेळ लागत असून त्याचे वजन "ललल" अशे घेता येइल. संस्कृत मधे "ल+ल=गा" हे सूत्र पण स्वीकार्य असल्याने "दिवस" शब्दाचे वजन "गाल" किंव्हा "लगा" असे पण घेउ शकतो. पण आज आपण जेव्हा "दिवस" हा शब्द मराठीत बोलतो तेव्हा त्याचा उच्चार करतानां त्याचे दोन तुकडे करतो. "दि" + "वस्" (स खोडा, शेवटचा अक्षर बहुतेक खोडा असेल असाच बोलला जातो). हा दिवस शब्दाचा नैसर्गीक उच्चार आहे आणि हा उच्चार "लगा" वजनाचा आहे. . आता "दिव" +"स्" हा "गाल" वजनाचा उच्चार करुन बघा, तर काहीतर चुकल्याचं जाणवेल.
हे बोलुन पहा--> "दि वस्" लगा, "दि वस्" लगा, "दि वस्" लगा, "दि वस्" लगा ........
आणि हे बोलुन पहा--> "दिव स्" गाल, "दिव स्" गाल, "दिव स्" गाल, "दिव स्" गाल ........
कोणची ओळ लयबद्ध वाटते ते पहा.
आजुन एक उदाहरण देतो. एक शब्द आहे "एकदम". ह्याचे वजन संस्कृत उच्चारानुसार घेतले तर गालगा/गागाल घ्येउ शकतो. पण हा शब्द बोलतानां आपण "एक"+"दम" असाच बोलतो. त्यात पण "एक" हा शब्द इतक्या वेगानं बोलला जातो कि ह्या शब्दाचे नैसर्गीक माप "गागा" असे घेणंच योग्य वाटतं.
जसं वर सांगीतलं तसं हे बोलुन पहा:
"एक दम्" गागा, "एक दम्" गागा, "एक दम्" गागा, "एक दम्" गागा....
"ए कदम्" गालगा, "ए कदम्" गालगा, "ए कदम्" गालगा, "ए कदम्" गालगा......
कोणची ओळ नैसर्गीक उच्चाराच्या जवळ वाटते?
शब्दांचे नैसर्गीक वजन वापरण्याचा फायदा असा की काव्यपठन करताना त्या शब्दाचा उच्चारही प्रचलित उच्चारा सारखाच होतो आणि म्हणूनच तो शब्द जास्त परिणामकारक होतो.
उर्दु आणि गुजराथी गझलकारां मधे शब्दांच्या नैसर्गीक वजनाचाच वापर करण्याची परंपरा आहे. मी मराठी गझलांचं जे थोडंफार वाचन केलं त्यातुन मला जाणवलं की शब्दांच्या नैसर्गीक वजनाचा वापर आजुन मराठी गझलमधे पूर्णपणे रुजलेला नाही. पण हे माझे नम्र मत आहे आणि ते चुकीचे ही असु शकतं.
"लाज अनुमोदनात" --> गुजराथी व उर्दु गझलेत "ल+ल = गा" हे समीकरण गझलच्या वृत्तंमधे सर्वथा मान्य केलेले नाही. "अनुमोदन" शब्दाच्या उच्चारानुसार "अनु" हया शब्दात दोन्ही लघु इतके "स्ट्रोंग" आहेत की त्यांचा एक गुरु म्हणुन वापर करु नये अशी पद्धत/समज गुजराथीत आहे. ह्याला विपरीत असे उदाहरण द्यायचे झाले तर "पण" ह्या शब्दातले दोन लघु एकमेकांच्या इतके जवळ आहेत की ह्या शब्दांचे वजन "लल" घेणे योग्य नाही. ह्या शब्दाचा उच्चार ""पण्" असाच होतो, आणि तो एक "गा" असा उच्चार आहे.
व वृत्त निभावणे --> समजा दोन शब्द अशे आहेत की ज्यांचं वजन वृत्तात बसत नाही. पण त्यांना एक्मेकां बरोबर ठेवुन त्यांचा एकत्र उच्चार केला तर वृत्तबद्ध होतो. असे केल्यास वृत्त "निभावले" असे गुजराथीत म्हणतात.
उदाहरणार्थ "लाज अनुमोदनात..." ह्याच्यात "अनु" चे माप दोन स्वतंत्र लघु म्हणुन घेतले तर ते वृत्तात बसत नाही. पण "लाज्" + "अनुमोदनात" = "लाजनुमोदनात" असा उच्चार केला तर "गालगा गालगाल" मधे एकदम फिट बसलेल वाटेल (फक्त नु चा नू असा उच्चार करावा लागतो, जो गुजराथीत मान्य आहे, मराठीत पण कदाचित चालेल पण मी जास्त विचार केलेला नाही)
ह्याचे काही उर्दु उदाहरणः
(ललगा लगाल गागा, ललगा लगाल गागा)
ये न थी हमारी किस्मत कि विसाले-यार होता,
अगर और जीते रहते यही इन्तज़ार होता ।
तेरे वादे पर जिये हम तो यह जान झूट जाना,
कि खुशी से मर न जाते अगर एतबार होता ।
तेरी नाजुकी से जाना कि बंधा था अहद बोदा,
कभी तू न तोड सकता अगर उस्तुवार होता ।
कहूं किससे मैं कि क्या है ? शबे-गम बुरी बला है,
मुझे क्या बुरा था मरना ? अगर एक बार होता । (गालिब)
(गालगा गालगाल गागागा)
तुम को देखा तो ये खयाल आया,
ज़िंदगी धूप तुम घना साया ।
संदर्भः http://vmtailor.com/archives/167 (थोडं स्क्रोल केल्यावर उर्दु व हिंदीतले काही उदाहरण ह्या वेब्साईट वर आहेत )
हेमंत पुणेकर
९९२१२८३४८५ (अधीक चर्चा फोनवर करुया? मराठी लीहायला खुप वेळ लागतो :-( )
बेफिकीर
शनि, 05/12/2009 - 09:09
Permalink
आपले विचार वाचले. विस्तृत मत
आपले विचार वाचले. विस्तृत मत देण्यासाठी आभारी आहे. मला आपले विचार इंटरेस्टिंग वाटले. याही दृष्टीने गझल रचताना बघायला हवे. आपण जे लिहिले आहेत त्यानुसार माझ्या वरील रचनेत वृत्त निभावले आहे हे पटणारच. आपण चांगला मुद्दा काढल्याबद्दल आभारी आहे. मात्र मला खालील मुद्दे मांडावेसे वाटतात.
१. समजा आपण 'केवढे छान दिवस होते ते' ही ओळ जुन्या मित्राबरोबर गप्पा मारताना गद्य पद्धतीने उच्चारली, तर आपण म्हणता तसा 'लगा' हा उच्चार नक्कीच होतो. पण कवितेत हीच ओळ पद्यात्मक पद्धतीने उच्चारायला गेल्यास व कविता वृत्तबद्ध असल्यास प्रत्येक अक्षराच्या योग्य त्या मात्रांना एक स्थान आपोआपच प्राप्त होते. माझ्यामते पद्यात ओळ उच्चारताना 'दिवस' या शब्दातील प्रत्येक अक्षराची एक मात्रा 'लगा' या पद्धतीने न उच्चारली जाता 'दि-व-स' अशी 'ल-ल-ल' अशी उच्चारली जाते व ती तशी उच्चारली जाताना त्यातील प्रत्येक उच्चार हा वृत्ताची गरज काय आहे ते पाहून नैसर्गीकरीत्याच त्या त्या अक्षराबरोबर स्वतःचे लग्न लावतो असे मला वाटते. माझे हे मत जर चुकीचे असेल तर मग या गोष्टीला सूट म्हणता येईल का असेही वाटले.
२. माझ्यामते आपण मांडलेले मत उर्दूतील अनेक शेरांना लागू पडावे.
जिंदगी यों भी गुजरही जाती
क्यो तेरा राहगुजर याद आया - (गालिब)
यात 'राहगुजर' मधील 'गुजर' हे 'दिवस' प्रमाणे आहे.
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुआ
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ (गालिब)
यात तर 'बुरा न हुआ' मधील 'न व 'हु' या दोन भिन्न शब्दांतील अक्षरांमधे तसे झाले आहे.
यही निखरा था जौके-नग्मॉ गरी
यही उतरा था शेर का इल्हाम (साहिर लुधियानवी)
यात तर 'इल्हाम' या शब्दातील 'म' चा उच्चार 'ल्हा' या अक्षरावरील एक अनुस्वार असाच होत आहे.
तेव्हा, आपला मुद्दा किती एक्स्टेंटपर्यंत ताणून नेता येईल व कोठे कोठे कसा लागू करता येईल याला माझ्यामते मर्यादा नसणार. शेवटी मराठीसाठी प्रमाण म्हणून भटसाहेबांची बाराखडी आहे. त्यात 'एकाच वृत्तातील ओळी गझलेत असतात' असे विधान आहे. वृत्तात लघु गुरूचा क्रम व संख्या समान असते. या दृष्टीने वरील रचना 'निभावलेली नसून नैसर्गीक आहे' इतकेच मला म्हणायचे होते.
आपण पुण्यात असलात तर कृपया कार्यक्रमाला यावेत. आमचा आनंद द्विगुणित होईल. फोनवर बोलूच.
माझा क्रमांक ९३७१०८०३८७
धन्यवाद!
हेमंत पुणेकर
शनि, 05/12/2009 - 14:24
Permalink
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
प्रतिसादा बद्दल धन्यवाद! तुम्ही नवीन गोष्टींवर विचार करण्याची तयारी दाखवली त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
तुम्ही दिलेल्या तीन उदाहरणां विषयीच लीहितो. बाकी फोन वर बोलुया.
१) जिंदगी यों भी गुजरही जाती
क्यो तेरा राहगुजर याद आया
हे वृत्त "गालगा गालगाल गागागा" नसून "गालगा गाललगा गागागा" आहे.
ह्या गझलचे आणखी तीन शेर अशे आहेत:
फिर तेरे कूचे को जाता है ख़याल (शेवटच्या "ल" ची मात्रा वृत्तात मोजलेली नाही)
दिले गुमगस्ता मगर याद आया
कोई वीरानी सी वीरानी है
दस्त को देखके घर याद आया
मैने मजनू पे लड़पपन में ’असद"
संग उठाया कि सर याद आया
मी वाचलेल्या एल्गारच्या गझलां मधे भटसाहेबांनी "दिवस" किंव्हा तत्सम स्ट्रोंगली लगा मापाचा शब्द गाल वजनात घेतलेला पाहिला नाही. तशे उदाहरण असेल तर मला नक्की कळवा.
२) दर्द मिन्नत-कशे-दवा न हुआ
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ (गालिब)
"गालगा गालगाल गागागा" ह्या वृत्तात शेवटच्या गागागा ऐवजी "गाललगा" असे घेतले तर चालतं. खरं तर हा वृत्त जेव्हा लीहितात तेव्हा "गालगा गालगाल गागागा/गाललगा" असं लीहिण्याची पद्धत गुजराथीत आहे.
उर्दुत अजुन एक सूट ह्या वृत्तात घेतली जाते. ती म्हणजे प्रथम गालगा ऐवजी ललगा घेणे. दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है (गालिब) मधे प्रथम दर्शनी जरी गालगा वाटत असले तरी उर्दुत प्रचलित उच्चार पद्धती प्रमाणे ते "दिले नादां..." असे बोलतात आणि त्यात "दिले" चे वजन लल म्हणून वापरले आहेत.
अर्थात् , हा सघळा उर्दु परंपरेचा भाग आहे. तो जसा चा तसा मराठीत घेण्याची गरज नाही. पण उर्दु परंपरेला २००+ वर्षाचा इतिहास आहे. तसाच त्याला १००० वर्षाच्या फारसी परंपरेचा मजबूत पाठिंबा आहे. तेव्हा उर्दुत अशे का घडले त्याचा विचार व्हायला हवा. त्यातले जर काही तत्व मराठी गझलेला उपकारक असले तर त्यांचा स्वीकार करण्यात काही हरकत नाही, असं मला वाटतं.
३) यही निखरा था जौके-नग्मॉ गरी
यही उतरा था शेर का इल्हाम
ओळी अंती येणार्या लघु चा गुरु करायचा ही संस्कृत आधारीत वृत्तांची पद्धत आहे तर त्याहून एकदम विपरीत अशी त्या लघु चा लोप करायची पद्धत फारसी-उर्दु-गुजराथीत (गझल वृत्तां मधे) आहे. मला आठवतंय तो पर्यंत भटसाहेबांनी पण ह्याचा उल्लेख केलेला आहे. बदललेल्या उच्चारांनुसार शेवटच्या लघुचा लोप करणेच जास्त योग्य वाटतं.
पण हा झाला फारसी-उर्दु-गुजराथी परंपरेचा भाग. मराठी गझलेची दिशा ठरवणारे लोकं तुम्ही आहात. तुम्ही जे कराल ते येंणार्या पिढीसाठी परंपरा होईल. तेव्हा तुम्ही नवीन विचारांचे स्वागत करुन त्यातले काय उत्तम आहेत ह्याचा विचार करत आहात ह्याच्यात च खुप काही आलं.
फोनवर बोलुयाच!
हेमंत पुणेकर
बेफिकीर
शनि, 05/12/2009 - 14:50
Permalink
सुंदर माहिती दिलीत हेमंतराव!
सुंदर माहिती दिलीत हेमंतराव!
१. गालिबच्या त्या गझलेत तसे वृत्त आहे हे माहीत नव्हते.
२. पहिल्या 'गा' ऐवजी 'ल' चालतो हे माहीत होते. माझी तशी एक गझल आहे.
जग चर्चा करायला जमते
अजुनी आपली कथा येते
आपल्याशी चर्चा करून नवीन गोष्टी जाणून घ्यायला मजा येईल. कृपया माझ्या रचनांवर स्पष्ट प्रतिसाद देत जावेत.
धन्यवाद!
बेफिकीर
शुक्र, 18/12/2009 - 00:51
Permalink
हेमंतराव, मला एक बाब पटली
हेमंतराव,
मला एक बाब पटली नाही.
आपले म्हणणे असे:
१) जिंदगी यों भी गुजरही जाती
क्यो तेरा राहगुजर याद आया
हे वृत्त "गालगा गालगाल गागागा" नसून "गालगा गाललगा गागागा" आहे.
आपण जेव्हा 'गालगा गाललगा गागागा' असे म्हणत आहात तेव्हा 'याद आया' याचा उच्चार 'यादाया' असा व्हायला हवा असे गृहीत धरून म्हणत आहात असे वाटते. वास्तविक (अर्थात, उर्दू लिपीची मला माहिती नाही, पण) ते वृत्त लज्जिताच आहे असे माझे मत आहे. म्हणजे, गालगा गालगा लगागागा असेच आहे असे मला वाटते.
जे मला वाटत आहे ते जर योग्य असले तर माझ्या सदर रचनेत 'वृत्त निभावले आहे' हे मत अयोग्य ठरून 'सदर रचनेत व्यवस्थित वृत्त आहे' असे मत दिले जावे. जे मला वाटत आहे तेच अयोग्य असेल तर 'याद आया' यातील 'द' हा 'या' या अक्षराचाच भाग समजला जातो असा अर्थ झाल्यामुळे मुळातच गालिबच्या त्या गझलेचे वृत्त काय आहे हा प्रश्नच निकालात निघावा असे वाटते. याचे कारण जर उर्दूमधे 'आया' (म्हणजे 'आले') हे जर 'आदयाद' असे लिहिले जात असते तर आपण 'आदयाद' ला 'आया'च म्हणालो असतो व वृत्त 'सही' म्हणालो असतो. माझ्यामते गालिबने 'याद' या शब्दात 'या' बरोबर येणार्या 'द' ला समाविष्ट करणे ही सूट घेतलेली आहे.
बेफिकीर!
हेमंत पुणेकर
मंगळ, 22/12/2009 - 22:29
Permalink
भूषणराव, वृत्त-चर्चा बर्या
भूषणराव,
वृत्त-चर्चा बर्या पैकी रंगली आहे. माझ्या आणखी थोड्या कमेन्ट्स!
आपण जेव्हा 'गालगा गाललगा गागागा' असे म्हणत आहात तेव्हा 'याद आया' याचा उच्चार 'यादाया' असा व्हायला हवा असे गृहीत धरून म्हणत आहात असे वाटते.
--> हो. याद आया चा उच्चार "यादाया" असा करुन शेवट चे तीन गुरु घेतले आहेत. उर्दु आणि गुजरातीत ही सूट बरेचदा वापरतात. ( http://vmtailor.com/archives/167 )
वास्तविक (अर्थात, उर्दू लिपीची मला माहिती नाही, पण) ते वृत्त लज्जिताच आहे असे माझे मत आहे. म्हणजे, गालगा गालगा लगागागा असेच आहे असे मला वाटते.
--> उर्दु लिपी विषयी मला ही फार से माहीत नाही.
जे मला वाटत आहे तेच अयोग्य असेल तर 'याद आया' यातील 'द' हा 'या' या अक्षराचाच भाग समजला जातो असा अर्थ झाल्यामुळे मुळातच गालिबच्या त्या गझलेचे वृत्त काय आहे हा प्रश्नच निकालात निघावा असे वाटते.
--> सूट अशी घ्यावी की ज्यामुळे ओळीतल्या शब्दांचे उच्चार नैसर्गीक उच्चारांचा शक्य तीतक्या जवळ राहतील. "याद" मधे 'द' ला 'या' चाच एक भाग मानून "याद" चा एक गुरु करणे उर्दु/गुजरातीत मान्य नाही, हे मात्र मी ठाम पणे सांगु शकतो. "याद आया" आहे म्हणून "यादाया" सारखा उच्चार तीन गुरु म्हणून "निभावला" जाउ शकतो/ चालु शकतो. बाकी "याद करना" कधी ही तीन गुरु म्हणून चालणार नाही. ( http://vmtailor.com/archives/167 )
हे पठन करा: "याद् आया" गागागा, "याद् आया" गागागा, याद् आया" गागागा, याद् आया" गागागा
(याद शब्दाचा उच्चार संस्कृत "यत्" सारखा होतानां वाटेल. तसा उच्चार केल्यास समोरच्याला तो शब्द "याद" आहे असे समजणार पण नाही)
आणि नंतर हे म्हणून बघा: "यादाया" गागागा, "यादाया" गागागा, "यादाया" गागागा, "यादाया" गागागा,
("यादाया" म्हणाल तरी "याद आया" सारखेच ऐकायला येइल)
ह्या गझलेच्या सर्व ओळींचे लघु-गुरु माप अशे आहेत. त्यात वापरलेल्या सूट * ह्या नीशाणीनी दाखविल्या आहेत.
जिंदगी यों भी* गुजर ही जाती.....
गालगा गा ल लगा गा गागा
क्यो तेरा** राह गुजर याद आया
गा लगा गाल लगा गागागा
फिर तेरे कूचे*** को जाता है ख़याल**** (शेवटच्या "ल" ची मात्रा वृत्तात मोजलेली नाही)
गा लगा गाल ल गागा ल लगा (शेवट च्या गागागा ऐवजी गाललगा वापरले आहे)
दिले गुम गस्ता मगर याद आया
लल गा गाल लगा गागागा
कोई वीरानी सी वीरानी है
गाल गागाल ल गागागा गा
दश्त को देखके घर याद आया
गाल गा गालल गा गागागा
मैने मजनू पे लड़पपन में ’असद"
गाल गागा ल लगागा ल लगा
संग उठाया कि सर याद आया
गाल गागाल ल गा गागागा
* --> एकाक्षरी गुरु ला लघु म्हणून वापरणे (उर्दु व गुजरातीत मान्य)
** --> तेरा/मेरा ऐवजी तिरा/मिरा असा उच्चार करुन लगा माप वापरणे (उर्दुत मान्य)
*** --> शब्दांती एकाक्षरी गुरु ला लघु म्हणून चालवणे (उर्दु व गुजरातीत मान्य)
**** --> ओळीअंती येणार्या लघु चा लोप करणे (उर्दु व गुजरातीत मान्य)
ह्या वृत्ताचे अन्य उदाहरणः
१) और क्या अहदे वफा होते है
लोग मिलते है जुदा होते है
२) जाइए आप कहां जायेंगे
ये नजर लौट के फिर आयेगी
बेफिकीर
बुध, 23/12/2009 - 09:38
Permalink
हेमंतराव, खरे तर याच गझलेवर
हेमंतराव,
खरे तर याच गझलेवर प्रतिसाद देत राहणे हे आपण दोघेही चुकून करत आहोत असे वाटते, पण चर्चा चालू आहे व त्यात सातत्य व लिंक रहावी म्हणून इथेच प्रतिसाद देत राहू. आपण गालिबचा जो मक्ता लिहिला आहेत त्यात एक शब्द मिसिंग आहे असे मला वाटते.
मैने मजनू पे लड़कपन में ’असद"
गाल गागा ल लगागा ल लगा
संग उठाया था कि सर याद आया (था हा शब्द राहिलेला आहे असे मला वाटते)
गाल गागाल ल गा गागागा
त्यामुळे:
संग उठाया था कि सर याद आया
यात 'संग' या शब्दाचे मराठीत वजन 'गाल' असे होत असले तरीही उर्दूत माझ्यामते नुसतेच 'गा' असे होत आहे.
संग उठाया था कि सर याद आया
गा लगागा ल गा ल गा-गागा (सर याद आया - या तीन शब्दांचा उच्चार सर्यादाया असा होत असावा)
मूळ मुद्दा हा की लज्जितापेक्षा (गा ल गा गा ल गा ल गा गा गा) लघू-गुरू मधे शिस्तबद्ध बदल करून उर्दू गझलकारांनी काही तितक्याच मात्रांची वृत्ते वेगळी वृत्ते म्हणून वापरली आहेत काय? म्हणजे, लज्जितातील शेवटच्या 'गागागा' ऐवजी 'गाललगा' असे जाणीवपुर्वक केलेले वृत्त उर्दूत आहे काय? आपल्या म्हणण्यानुसार ते आहे असे दिसते तर माझ्या मते ते लज्जिताचेच एक व्हर्जन आहे किंवा लज्जितामधेच एक सूट घेतलेली आहे.
हेमंत पुणेकर
बुध, 23/12/2009 - 12:43
Permalink
भूषण, मक्त्यात सुचवलेला बदल
भूषण,
मक्त्यात सुचवलेला बदल योग्य च वाटतो.
संग उठाया था कि सर याद आया
"गालगागा" चालविण्या साठी "संगुठाया" असा उच्चार केला की वृत्त "निभावला" जातो.
संग --> हा शब्द एक गुरु म्हणून उर्दुत पाहिलेला नाही (माझे उर्दुचे वाचन फार च कमी आहे), पण गुजरातीत फक्त एका ठीकाणी पाहिला आहे. संग चा उच्चार सङ असाच होत असुन एक गुरु म्हणून ही चालेल असं मला वाटतं.
सर याद आया - या तीन शब्दांचा उच्चार सर्यादाया असा होत असावा --> मला माहित आहे तो पर्यंत "सर्यादाया" उच्चार स्वीकार्य नाही. दोन शब्द जोडण्या साठी दुसर्या शब्दाचे प्रथम अक्षर स्वर असणे गरजेचे आहे. लज्जिता मधे शेवट लागणार्या "लगागागा" साठी तुम्हाला "सर्यादाया" अश्या उच्चाराची गरज जाणवते. पण मी सांगतो त्या लघु-गुरु संरचनेला (गालगा गालल गागागागा) अश्या उच्चाराची गरज नाही कारण की त्यात शेवटच्या चार श्रुति गुरु आहेत.
उर्दु मधले वृत्त भारतीय छंद/वृत्तां वर आधारीत नाही. ते अरबी/फारसी तुन आले आहेत. तेव्हा "लज्जिता मधे बदल करुन वापरले" असे तर म्हणता येणार नाही. पण असे म्हणू शकतो की भारतीय व अरबी/फारसी वृत्तांमधे साधर्म्य आहे व ह्या वृत्ताची लघु-गुरु संरचना लज्जितात थोड्या बदलाने तयार होते. शेवटच्या "गागागा" ऐवजी "गाललगा" ही उर्दु/गुजराती गझल वृत्तांमधे मान्य सूट आहे.
आणखी एक म्हणजे कदाचित भारतीय मात्रावृत्तांमधे "गालगा गालगाल गागागा" आणि "गालगा गाललगा गागागा" हे एकच वृत्त आहे पण उर्दु/गुजराती गझल-वृत्तां मधे हे दोन वेगळे वृत्त मानले जातात आणि त्यांना कदीही मिक्स करत नाही.