प्रेम बहुधा

जरा घुश्शात आहे प्रेम बहुधा
तुझ्या-माझ्यात आहे प्रेम बहुधा

अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा

हवा आली तुला स्पर्शून येथे
तिच्या लक्षात आहे प्रेम बहुधा

तरी निम्मे फुलवले मी कसेसे
तुझ्या नादात आहे प्रेम बहुधा

सलग ठोके कसे हृदयात आले?
जरा प्रेमात आहे प्रेम बहुधा

चिताही 'बेफिकिर' गंधीत झाली
तुझ्या श्वासात आहे प्रेम बहुधा

(बेफिकिरी)

गझल: 

प्रतिसाद

अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा

वा: मस्तच!
गझल चांगली झालीये.

तरी निम्मे फुलवले मी कसेसे
तुझ्या नादात आहे प्रेम बहुधा

याचा अर्थ नाही कळला

ठोके आणि मुरवले जाण्याचा शेर आवडले.
गझल छानच !

प्रतिसादांसाठी आभार!

(तरी निम्मे फुलवले - या शेरात 'मी माझ्याकडून प्रेम वाढवण्यासाठी करता येईल तेवढे केले, तू काहीच केले नाहीस' असे म्हणायचे होते, कदाचित शब्दरचना चुकली असावी. )

पहिल्या तीन द्विपदी चांगल्या झाल्या आहेत. दुसरी विशेष.

चित्तंशी १००% सहमत. अबोला फारच छान; हवाही आवडली.

चित्तरंजन व चक्रपाणि,

आभार!

''अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा''

आवडला शेर...!

-दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटेसाहेब!

आपल्या मैत्रीपूर्ण प्रतिसादाने बळ आले.

छान गझल! वृत्तचा निर्दोष उपयोग! "प्रेम बहुधा" हा रदिफ चालवणे सोपे नाही, पण तुम्हाला ते बर्या पैकी जमलं.

हे शेर खुप आवडले:
अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा....वाह!

हवा आली तुला स्पर्शून येथे
तिच्या लक्षात आहे प्रेम बहुधा

सलग ठोके कसे....समजायला थोडा प्रयत्न करावा लागतो....पण छान, सुंदर!

मत्ला प्रथमदर्शनी आकर्षक वाटतो....दोन्ही मिसरे छान आहे पण त्याचं कनेक्शन मला समजलं नाही. Your comments are welcome! बरेचदा शेरला असा थ्रो असतो, त्यातली ऊर्मि इतकी हळुवार असते की तो शेर पूर्णपणे बुद्धिला समजेल त्या आधीच मनाला स्पर्शतो. तसं काहीसं झालं आहे असं वाटतं.

तरी निम्मे... तली भावना बरोबर पहोचत नाही असं वाटलं.

चिताही 'बेफिकिर' गंधीत झाली
तुझ्या श्वासात आहे प्रेम बहुधा
--> तुझ्या म्हणजे कुणाच्या...बेफिकीरच्या कि कोणी अन्य व्यक्तिच्या... ह्या विषयी थोडा संभ्रम राहतो. श्वासतलं प्रेम चितेला गंधीत करु शकायला समर्थ वाटत नाही, किंव्हा ते चित्र मनाला एकदम पटत नाही.

अभिनंदन!

अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा
>>> व्वा व्वा क्या बात हैं

शेवटचा शेर पण आवडला