प्रकाशित करण्याची गझल रसिकासाठी असावी असा एक विचार!
रस्त्यासाठी जमीन खोदणार्या मजुरापासून एक लाख कोटीचा व्यवसाय करून १२० कोटींच्या देशात सुप्रसिद्ध होणारे व्यावसायिक यांच्यापर्यंत - ही जी 'रेंज' आहे त्यामधील बहुतांशी ९८% माणसे ही मायावी जीवनाच्या चक्रात स्वतःला भौतिकदृष्ट्या यशस्वी करण्याकडे झुकलेली असतात... मनाने!
उरलेल्या २ टक्के माणसांमधे नर्तक, अभिनेते ('त्री' पण आल्या ), विदुषक, कसरतकार, वादक, गायक, लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, डोंबारी, शाहिर (शायर ) व यासारख्या 'व्यवसायात' मनाने असलेले लोक येतात. अर्थात, ते 'भौतिकदृष्ट्या पूर्णपणे अयशस्वी' राहून या समाजात जगू शकत नाहीत हे जरी खरे असले तरी निदान त्यांच्या मनात काहीतरी 'इतर' स्वरुपाची संवेदनाही बर्यापैकी जागृत असते असे मानायला वाव आहे. (त्यातील 'काही' भौतिकदृष्ट्याही यशस्वी होतात हे नक्की!)
पुर्वी 'कवी' म्हणून शासनाकडुन मान्यता पावलेली व्यक्ती 'विद्वान' समजली जायची. म्हणजे, शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्यावेळी दौलतीतील काही कवींचा सत्कार केलेला होता. बहादुरशहा जफर हा स्वतःच कवी असल्याने त्याचे उदाहरण सोडून द्या. पण कालिदासाने मेघांना दिलेल्या संदेशात 'त्याचे मेघांबद्दलचे ज्ञान' आजही शास्त्रज्ञांना चकीत करते. याचा अर्थ, काही'शे' वर्षांपुर्वी तरी असा जमाना निश्चीतपणे होता जेव्हा कवीला 'कवी' म्हणून समाजात एक वेगळा दर्जाही होता व तो दर्जा असण्याची कवीची कुवतही होती. (हे मी लिहीत आहे या विनोदाकडे सध्या दुर्लक्ष करावेत अशी विनंती!) पण आज कवी म्हंटले की 'तुमची शबनम कुठे आहे', 'दाढी केलीतच कशी काय', 'डोळ्यात अंगार कसा नाही' वगैरे प्रश्न विचारले जात आहेत. ( विश्वास ठेवा, माझ्या एका घरगुती वर्तुळात माझी ओळख 'हे काव्य करतात' अशी केली जात असून अक्षरशः एका प्रभृतींनी मला 'शबनम' कुठे आहे हा प्रश्न नुकताच विचारला. मला ज्यांनी सदेह पाहिले आहे त्यांना हा प्रश्न कधीच पडणार नाही कारण एका हातात जगाबद्दल पूर्णपणे 'बेफिकीरी' दाखवणारी 'धुम्रकांडी' व दुसर्या हातात एका 'माझ्यामते नसलेल्या' कवीची कविता याशिवाय मी दिसतच नाही.)
तेव्हा, हल्ली 'कवी' ही विनोदाची बाब आहे.
'गझलकार' ही मात्र तितकी विनोदाची बाब नाही याचे कारण 'गझल' हा एक 'विशिष्ट अटी पूर्ण करू शकल्यानंतरच केला जाऊ शकणारा काव्यप्रकार' आहे इतके या समाजाला निश्चीतच माहीत आहे.
मात्र, हे म्हणजे 'हा विद्यार्थी ३३ टक्क्याला ग्रेस मिळाल्यामुळे पास झाला' व 'त्या विद्यार्थ्याला खरोखरच ३५ % मिळाले' असे आहे.
आजच्या समाजाला तुम्ही कवी, शाहीर, गझलकार, गीतकार, अभंगकार किवा काहीही आहात याच्याशी शुन्य सोयरसुतक आहे.
एका विशिष्ट वर्तुळात पोचण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी केल्या जातात हे सत्य काही विशिष्ट लोकांपुरतेच अस्तित्वात असू शकते.
आजच्या समाजाला हवे आहेत 'रंजक' कवी!
म्हणजे काय?
तर मंचावर ज्यांची कविता ऐकून जाहीर हसता येईल, टाळ्या वाजवाव्याश्या आतून वाटेल व ज्यात तो माणूस 'कवी म्हणजे विद्वान आहे' याकडे लक्षच न देता तो 'कवी म्हणजे मनोरंजक आहे' याकडे पाहता येईल तो 'रंजक कवी'! या 'कॅटेगरीमधे' कवी राजकारणी नेते, अभिनेते, एखादे विशिष्ट शहर, एखादी विशिष्ट सुप्रसिद्ध व्यक्ती यांच्या 'नकला कम कविता' करू शकतो.
आता प्रत्येक माणूस कसा काय मनोरंजक, क्रांतिकारक वगैरे होऊ शकेल? शक्य नाही.
मग इतर मंचीय कविता येतात. 'शेतकर्यांच्या आत्महत्या' या विषयावर पोटतिडकीने बोलले (व्यासपीठावर ) की टाळ्यांचा कडकडाट व पेपरात नाव!
मग प्रश्न येतो की 'त्या उर्वरीत दोन टक्क्यांसाठी' कविता कशाला करायची?
या प्रश्नाचे उत्तर आहे:
आजच्या शासनप्रणालीमधे व वेगवान युगात आपल्या कवितेला 'बहुतांशी' जनमानसात शुन्य किंमत असून त्या कवितेची किंमत फक्त तुम्हाला आहे व ती सर्व जगाला पटावी हे होण्यासाठी अत्यंत वेगळी व्यवस्था आली तरच ते होईल. याचे कारण आपण अशा परिस्थितीत आहोत जेथे आपल्याला 'मीर'सारखे दिल्लीवर झालेले अत्याचार पाहायला मिळत नाहीत. दारू विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही. (येत असेल तर निदान मला तरी नक्की सांगा)
अशी वेळ यावी हे खचितच वाईट व दुर्दैवी आहे. 'कवी' म्हणून सन्मान मिळावा किंवा निदान आपल्या कवितांना जनाश्रय मिळावा यासाठीही हे असले काही होण्याची इच्छा कुणाचीच नसेल.
मग? मग कवितेला महत्व मिळणार कसे?
(मुळात कवितेला महत्व मिळावे ही काही चंद कवींचीच इच्छा असेल तर त्याला काय अर्थ आहे? हाही प्रश्न आहेच. पण कवितेमुळे आज कित्येकजणांचे आयुष्य बदललेले किमान मला तरी व्यक्तीशः माहीत आहे. 'उदाहरणे' प्रत्यक्ष भेटीत सांगू शकेन कारण इथे नावे लिहिण्यात अर्थ नाही.)
माझ्यामते आजच्या कवितेने, किंवा त्याहीपेक्षा गझलेने, जास्त रंजक होणे आवश्यक आहे. गझलेत मुळातच 'वृत्तबद्धता आल्याने येणारी एक गेयता' असतेच! गझल जर रंजक झाली तर काही प्रमाणात लोक इकडे वळतील असे प्रामाणिकपणे वाटते. (मी प्रकाशित करत असलेल्या 'हझला' म्हणजे रंजक गझला नाहीत हे मलाही माहीत आहे.) पण मीरच्या दर्दभर्या गझलांना जरी आजही जाणकारांकडून श्रेष्ठ दाद मिळत असली तरी उदाहरणार्थ उर्दू शायरी ही जिगर सारख्या 'मिश्कील शायरी करणार्या' शायरांकडून जास्त टिकवली गेली आहे असे वाटते.
किती दिवस अन्याय, तक्रार, दु:ख, तिडीक हे आणणार? ( मागेच माझ्यावर 'काल्पनिक दु:खे गझलेत गुंफणारा माणूस म्हणून प्रतिसाद आलेला होता. अगदी मी छातीठोकपणे सांगीतले की 'अहो ती खरच माझी दु:खे आहेत' तरी रसिकाला फरक काय पडणार आहे?)
कविता गंभीरपणे घेणे हे जसे आवश्यक आहे तसे कवितेला मिळू शकणारा किंवा 'न मिळणारा आश्रय'ही गंभीरपणे घेणे हे सध्या स्वतःला कवी समजत असलेल्यांचे कर्तव्य आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
हमे याद करनेमे ये मुद्दआ था
निकलजाये दम हिचकियाँ आते आते -
या दागच्या शेरात खरे तर काहीही खरे किंवा विचार करण्यासारखे नसेल. पण तो इतकेच म्हणाला आहे की 'तिने माझी आठवण काढण्यात तिचा इतकाच उद्देश होता की मला उचक्या येउन येऊन मी मरून जावे'! इतकी ती माझ्या शुद्ध प्रेमाच्या बाबतीत कठोर होती.
आजच्या समाजाच्या मनाची गरज (दुर्दैवाने?) हीच आहे.
लोकशाही साठ एक वर्षांची झाल्यावर व देशात हजारो वैभवदायी रोजगार व राहणीमान उंचावणारी साधने निर्माण व मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर कवीच्या दु:खाकडे व आक्रोशाकडे लोक किती लक्ष देणार? लोकांचे काय चुकले?
आपल्याला जी खरी कविता / गझल वाटते ती आपल्याजवळ ठेवून 'प्रकाशित करताना' मात्र 'जे लोकांना आवडेल' ते प्रकाशित करण्याची ही वेळ आहे.
या संकेतस्थळावरच्या माझ्या बेजबाबदार वर्तनाने काही लोक असेही म्हणतील की 'याला खुळ लागले आहे व हा स्वत:ला गालिब समजतो की काय'! पण, खरोखरच आजची आपली गझल समाजाला कंटाळा आणणारी आहे असे वाटते.
'समाजासाठी का लिहायचे?'हा प्रश्न अत्यंत स्तुत्य असून असा प्रश्न विचारणार्यांना माझा असा प्रश्न आहे की 'समाजासाठी प्रकाशितच का करायचे?' 'आपले आपले लिहून स्वस्थ का नाही बसत?'
-बेफिकीर!
प्रतिसाद
ज्ञानेश.
रवि, 08/11/2009 - 10:53
Permalink
सुनीताबाई देशपांडे यांना माझी
सुनीताबाई देशपांडे यांना माझी विनम्र श्रद्धांजली!
सुनीताबाईंच्याच एका पुस्तकात वाचलेला परिच्छेद आठवतो आहे- "कवी कविता का करतो? कवी एक कविता करतो- 'मला मरायचे आहे.' मग जा आणि मर. पण नाही. तो कविता करतो. चार लोकांना दाखवतो. त्यांचे अभिप्राय मिळवतो. याचे कारण हेच, की 'मरणे' ही त्या कवीची खरी गरज नसून आपली ही तीव्र भावनेशी चार लोकांनी समरस व्हावे हाच त्याचा उद्देश असतो."
बाकी कविता 'अशी असावी किंवा तशी असू नये' वगैरे मुद्दे प्रचंड व्यक्तिगत आहेत. ज्याला रंजक कविता /गझल करायच्या आहेत त्याने तशा कराव्यात. ज्याला गंभीर वगैरे लिहायचे तो तसे लिहिणार. एकच नियम सगळ्यांना कसा लावता येईल?
कविता गंभीरपणे घेणे हे जसे आवश्यक आहे तसे कवितेला मिळू शकणारा किंवा 'न मिळणारा आश्रय'ही गंभीरपणे घेणे हे सध्या स्वतःला कवी समजत असलेल्यांचे कर्तव्य आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते
असे सगळ्यांना कसे वाटेल?
'समाजासाठी का लिहायचे?'हा प्रश्न अत्यंत स्तुत्य असून असा प्रश्न विचारणार्यांना माझा असा प्रश्न आहे की 'समाजासाठी प्रकाशितच का करायचे?'
लिहायचे पण स्वतःसाठीच, आणि प्रकाशित करायचे ते पण स्वतःसाठीच!
असो,
यावर फार लिहिता येईल, पण तो एकंदरच वेळेचा अपव्यय आहे.
बेफिकीर
सोम, 09/11/2009 - 00:41
Permalink
बाकी कविता 'अशी असावी किंवा
बाकी कविता 'अशी असावी किंवा तशी असू नये' वगैरे मुद्दे प्रचंड व्यक्तिगत आहेत.
ज्ञानेशराव,
मी माझे व्यक्तीगत मुद्दे लिहिण्यासाठीच इथे येतो. तुमचे किंवा इतरांचे मुद्दे लिहायला मी इथे येत नाही.
'वेळेचा अपव्यय' आहे हे विधान लिहिण्यापुर्वी आपण जे लिहिलेले आहेत ते वाचले.
सुनीताबाईंनी फक्त 'मला मरायचे आहे' असे म्हणणार्या कवीच्या त्याच ओळीवर मतप्रदर्शन केलेले असावे असे आपल्या लिखाणावरून वाटते. मी जर 'माझी ही कविता वाचणारा रसिक तद्दन मूर्ख असून त्याला भर बाजारात पिटून काढावा' अशी ओळ माझ्या एखाद्या कवितेत घेतली तर रसिक 'स्वतःला पिटून घ्यायला' माझ्याकडे येईल का? ('मग जा मर' सारखे?) किंवा 'मग पिट मला' असे म्हणेल का?
आपण कुठल्यातरी एखाद्या अतिविशिष्ट मतप्रदर्शनाचे दाखले देऊन त्या आधाराने आपले मत मांडलेले आहेत असे मला वाटते.
स्वत:साठीच प्रकाशित करायचे - हे आपले मत तर मी धरून सगळेच 'आपले साहित्य प्रकाशित करणार्यांचे' आहेच. त्यात काय वेगळे आहे? मुद्दा असा आहे की आम माणसाला कवितेला आश्रय द्यावा असे वाटण्यासाठी काय करता येईल व मला वाटते कवितेत रंजकता आणली जावी.
माझ्यामते अजून काही काळानंतर हे प्रश्न आपल्याला पडू शकतील. या माझ्या विधानात कोणतीही स्वतःबद्दलची अनाठायी दर्पोक्ती किंवा आपल्याबद्दलचा अनादर नसून मला इतकेच म्हणायचे आहे की 'कवितेला आम माणूस जवळ का करत नाही' याबाबत कदाचित मी आपल्याहून जास्त वेळा विचार केलेला असावा. मला आपल्या गझला आवडतात, तेव्हा वरील विधान आपल्याला दुखावण्यासाठी नाही याची खात्री बाळगावीत. तसेच, मी जास्त वेळा विचार केला आहे असे मला वाटते याचा अर्थ तो विचार फारच दर्जेदार पद्धतीने केलेला असेल असेही नाही.
काव्यरसिक
शनि, 28/11/2009 - 02:57
Permalink
मला वरील लेखतील बरेचसे मुद्दे
मला वरील लेखतील बरेचसे मुद्दे पटले.
वरील लेखात कवींची आणि कवितांची सद्यस्थिती अचूक मांडली गेली आहे.
परंतु त्यावरील कवींची प्रतिक्रिया आणि विचार भिन्न असू शकतात. मी त्यांच्याशी स्वतः देखील सहमत नाही.
मल सर्वात आवडलेला मुद्दा हा कि,
"'समाजासाठी का लिहायचे?'हा प्रश्न अत्यंत स्तुत्य असून असा प्रश्न विचारणार्यांना माझा असा प्रश्न आहे की 'समाजासाठी प्रकाशितच का करायचे?' 'आपले आपले लिहून स्वस्थ का नाही बसत?'"
हे अगदी खरए. निदान माझ्यापुरत तरी.
माझ्या मते कवींची व्रुत्ती अस्शी असावी की,
"मनात मी मनातली वादळे शमवायची,
हसून मीच त्यावरी दादही मिळवायची"
आपापले लिहून आपण गप्प बसावे परन्तु स्वतःस बदलण्याचा विचार कधीही करू नये.
चु भू द्या घ्या.
-------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे.