केवळ तुझी होऊन झंकारायचे

केवळ तुझी होऊन झंकारायचे

आहे ठरवले मी तुला भेटायचे
केवळ तुझी होऊन झंकारायचे

आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?

आयुष्य हाती यायचे नाही कधी
पार्‍याप्रमाणे शेवटी विखुरायचे

'आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
(ठरलेच असते का तुझे भांडायचे?)

आहे मनी इतके कधीचे जे तुझ्या
ते सांग तू -नाही मला बाधायचे

कोठून आणू चांदण्या माळायला?
प्रेमात भलते काय पण मागायचे?

भेटीस येतो तू जरी स्वप्नामधे..
दिवसा मला का एवढे टाळायचे?

तू जवळ असता नेमके का आठवे-
नव्हतास तू तेव्हा कसे वाटायचे

गझल: 

प्रतिसाद

'आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
ते सांग तू -नाही मला बाधायचे....
दिवसा मला का एवढे टाळायचे?

वाहवा! सोनाली, नेहमी प्रमाणे गहरी,मनस्वी गझल!
और आने दो,इंतजार है.
जयन्ता५२

मस्त कलाकृती.

आहे मनी इतके कधीचे जे तुझ्या
ते सांग तू -नाही मला बाधायचे

कसे वाटते-
जे साठले आहे कधीचे अंतरी
ते सांग तू..नाही मला बाधायचे

भेटीस येतो तू जरी स्वप्नामधे..
दिवसा मला का एवढे टाळायचे?

कसे वाटते-
भेटीस येतो तो जरी स्वप्नामधे
दिवसा मला का एवढे टाळायचे ?

संवाद हा प्रियकराशी सुरु आहे, म्हणून भेटीस येतोस हा खरा शब्द.
वृत्तात बसण्यासाठी अनेकदा टाळला जातो.
टाळायचा की नाही, सनातन वादंगाचा मुद्दा.

तू जवळ असता नेमके का आठवे-
नव्हतास तू तेव्हा कसे वाटायचे

अ प्र ति म!

चांगली गझल!

'आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
(ठरलेच असते का तुझे भांडायचे?)

छान! सुरेश भटांच्या शेरांमधे अनेकवेळा असे 'कंस' असायचे, त्याची आठवण आली!

इथे 'ठरलेच का असते तुझे' असं केलं तर ते 'आहे इथे चुकले तुझे' शी जास्त जुळेल असं वाटतं.

वा. गझल चांगली झाली आहे.
तू जवळ असता नेमके का आठवे-
ही ओळ लयीत म्हणताना थोडा त्रास होतो आहे.
असता जवळ तू नेमके का आठवे
असे केल्यास ही बाधा बहुधा दूर व्हावी.

आहे ठरवले मी तुला भेटायचे
केवळ तुझी होऊन झंकारायचे

सन्माननीय सोनालीताई,

मला एक मुद्दा मांडायचा आहे.

मतल्यातील दुसरी ओळ 'केवळ तुझी होऊन झंकारायचे' - यात 'आहे ठरवले मी तुला भेटायचे' या ओळीमुळे 'तुझी होऊन झंकारायचे' ही शब्दरचना कवीची 'इच्छा' आहे असे स्पष्ट होत आहे. भारतीय संस्कृतीतील बहुतांशी ग्रामीण किंवा काही शहरी स्त्रियांना अगतिकतेने 'त्याची होऊन झंकारावे लागते'. (अर्थात, त्यावेळेला 'झंकारायचे' असे त्या म्हणणार नाहीत, पण गझलेत 'झंकारायचे' या शब्दातून दोन अर्थ सुचवता यावेत असे वाटले.)

देते कबूली की तुझे मी व्हायचे

स्वीकारते, केवळ तुझे मी व्हायचे

असे काही पर्याय मला सुचले. आपल्या गझलेतील शेवटचे तीन सोडून इतर शेर मला 'मला सुचलेल्या पर्यांयांच्या' मूडचे वाटले. त्यात एक संसारी स्त्रीची वारंवार दिसणारी अगतिकता येते असे माझे मत!

चु. भु. द्या. घ्या.

आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?

खास! आवडली गझल.

मस्त गझल आहे.
आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?
हे मला सर्व्वअत आवड्ले.

सुरेख गझल आहे.
हा शेर विशेष आवडला

>>'आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
(ठरलेच असते का तुझे भांडायचे?)

सुरेख गझल...
आवडली.

कोठून आणू चांदण्या माळायला?
प्रेमात भलते काय पण मागायचे?

भेटीस येतो तू जरी स्वप्नामधे..
दिवसा मला का एवढे टाळायचे?

सुंदर........!!!

-दिलीप बिरुटे

छान गझल
हे खूप आवडले

आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?

आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
(ठरलेच असते का तुझे भांडायचे?)

तू जवळ असता नेमके का आठवे-
नव्हतास तू तेव्हा कसे वाटायचे

प्रतिसाद आणि सुचवण्यांसाठी सर्वांचे आभार.
सोनाली

व्वा मस्तच

आयुष्य हाती यायचे नाही कधी
पार्‍याप्रमाणे शेवटी विखुरायचे

तू जवळ असता नेमके का आठवे-
नव्हतास तू तेव्हा कसे वाटायचे >>> व्वा व्वा फारच छान