सोडले तेंव्हा तुला...

सोडले तेंव्हा तुला रागात आम्ही..!
आज नाही कोणत्या वादात आम्ही..!

बिंग फुटले आमच्यावर हासण्याने;
मोजले तुमचे दुधाचे दात आम्ही..!

नेहमी येते गळ्याशी का कळेना...
पाडली होती कुठे बरसात आम्ही..!

प्रेम हे समजेल का त्या काळजाला?
की तसे समजायचे प्रेमात आम्ही..?

जा तुलाही पाहिजे ते ते करुन घे!
ठेवली आहे जरा म्यानात आम्ही..!

तोडले सारे तरी थोडे अडकतो;
कोणत्या ना कोणत्या जालात आम्ही..!

शेवटी सीमाच असते वर्तुळाला..
ना भरे त्रिज्या; म्हणे व्यासात आम्ही ..!

गझल: 

प्रतिसाद

बिंग फुटले आमच्यावर हासण्याने;
मोजले तुमचे दुधाचे दात आम्ही..!

वा: कल्पना खूप छान आहे!

गझलही छान झालीये.....पण आपल्या इतर गझलांच्या मानाने जरा सामान्य वाटली.

बिंग फुटले आमच्यावर हासण्याने;
मोजले तुमचे दुधाचे दात आम्ही..! - हा हा हा हा!

नेहमी येते गळ्याशी का कळेना...
पाडली होती कुठे बरसात आम्ही..! - म्हणजे काय?

प्रेम हे समजेल का त्या काळजाला?
की तसे समजायचे प्रेमात आम्ही..? - चांगला शेर

जा तुलाही पाहिजे ते ते करुन घे!
ठेवली आहे जरा म्यानात आम्ही..! - हा हा!

तोडले सारे तरी थोडे अडकतो;
कोणत्या ना कोणत्या जालात आम्ही..! 'जाल'? (जाळ्यात नाही का चालणार, की इंटरनेट या अर्थी ?)

शेवटी सीमाच असते वर्तुळाला..
ना भरे त्रिज्या; म्हणे व्यासात आम्ही ..! - त्रिज्या व्यासात भरणे म्हणजे काय?

बेफिकीर,
त्रिज्या व्यासात भरणे म्हणजे काय?
ना भरे त्रिज्या; म्हणे व्यासात आम्ही..!
याचा अर्थ त्रिज्या व्यासात भरणे असा होत नाही.
वर्तुळ असले की त्याला परिघाची सीमा असतेच. वर्तुळाचा व्यास त्याचा आकार निश्चित करतो. (व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो) ज्यांची उडी किंवा लांबी त्या वर्तुळाच्या त्रिज्येएवढीही नाही ते स्वतःला व्यास समजतात.

ना भरे त्रिज्या; म्हणे व्यासात आम्ही..!
याचा अर्थ त्रिज्या व्यासात भरणे असा होत नाही.
-

स्वतःला जे 'व्यास' समजतात ते महाभारताचा 'व्यास' समजतात, वर्तुळाचा नाही. त्यामुळे 'आम्ही व्यासात' याचा आपण जो 'नंतर' अर्थ काढून दाखवला आहेत तो या शेरातून येत नाही. या शेरात 'आम्ही व्यासात' आहोत आणि 'हे त्रिज्ये एवढेही नाहीत' यात महाभारताचा व्यास व वर्तुळाचा व्यास ही गफलत आहे.

आपल्या खालील तीन विधानांसाठी आपले धन्यवाद!

वर्तुळ असले की त्याला परिघाची सीमा असतेच. -

वर्तुळाचा व्यास त्याचा आकार निश्चित करतो. (येथे मात्र मला अंधुक आठवते की व्यासामुळे वर्तुळाचे क्षेत्रफळ ठरत असावे, वर्तुळाचा आकार वर्तुळच असतो, व्यास कितीही लहान मोठा असला तरी!)

(व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो)

बेफिकीर,
आपला प्रतिसाद वाचून प्रचंड खेद वाटला.
स्वतःला जे 'व्यास' समजतात ते महाभारताचा 'व्यास' समजतात, वर्तुळाचा नाही. त्यामुळे 'आम्ही व्यासात' याचा आपण जो 'नंतर' अर्थ काढून दाखवला आहेत तो या शेरातून येत नाही. या शेरात 'आम्ही व्यासात' आहोत आणि 'हे त्रिज्ये एवढेही नाहीत' यात महाभारताचा व्यास व वर्तुळाचा व्यास ही गफलत आहे.
हे आपले म्हणणे अतिशय चूक आहे. काहितरी इतर गोष्टी मनात ठेवून तुम्ही लिहिलेले दिसते. व्यास कोणता समजायचा ते कवी ठरविणार का तुम्ही?
आपण जो 'नंतर' अर्थ काढून दाखवला आहेत तो या शेरातून येत नाही. - हे आपले म्हणणे हास्यास्पद आहे.

अतिशय साधे विधान आहे की, तू त्रिज्ये एवढाही नसताना स्वतःला व्यासाएवढा समजतो आहेस. हे विधान कोणालाही लागू होईल.
आपला
(व्यथित) अजय

खरे तर आपल्या शब्दरचनेतून 'आपण जे समजावलेत' ते खरोखर स्पष्ट होत आहे. मीच पुर्वग्रहदुषित पद्धतीने बघत होतो असे वाटते.

अभिनंदन!

आपला हाही शेर आवडला.

(व्यथीत वगैरे होऊ नका. 'कुणाची'तरी उगाच आठवण येते. ते व्यथीत, उद्विग्न, वगओरे बरेच काही होत बसतात.)

छान शेर अजय!

प्रेम हे समजेल का त्या काळजाला?
की तसे समजायचे प्रेमात आम्ही..?

वा.

बिंग फुटले आमच्यावर हासण्याने;
मोजले तुमचे दुधाचे दात आम्ही..!

वा. हा शेर फार आवडला! अगदी मराठी. एकंदर गझल छान.

चित्त शी सहमत... हेच दोन फार आवडले

खुप आवडली. दुधाचे दात आवडले.

आवडली गझल.

चित्तरंजन, मिल्या, प्रताप, गंगाधर प्रतिसाद देणार्‍यांचे धन्यवाद.
मुशायर्‍यात सादर करताना एक-दोन बदल केले होते. तेही उपस्थितांना आवडले. धन्यवाद.