...थांबवू नको मला!

मी असाच धावणार...थांबवू नको मला!
जाहला उशीर फार...थांबवू नको मला!

धूप दीप देव सर्व तू तुझे पहा अता
मी न हे जुमानणार...थांबवू नको मला!

एकमेव हा उपाय शेत नांगरायला..
मी स्वतःस जुंपणार...थांबवू नको मला!

रंगहीन चेहरे न येथ पाहती कुणी
मीही आज रंगणार...थांबवू नको मला!

स्वच्छ ना कुणी करील आत जाउनी स्वतः
हे गटार तुंबणार...थांबवू नको मला!

धुंद आज चांदणे, धुंद रूप हे तुझे
आणखी हवाहि गार्...थांबवू नको मला!

चार दीस मैफलीत थांबलो गडे तुझ्या..
संपली अता बहार थांबवू नको मला!

गझल: 

प्रतिसाद

क्रुपया
'मीहि आज रंगणार' असे वाचावे. नजरचुकीने 'हि' ऐवजी 'ही' छापला गेला आहे!

एकमेव हा उपाय शेत नांगरायला..
मी स्वतःस जुंपणार...थांबवू नको मला! ... छान.

चार दीस मैफलीत थांबलो गडे तुझ्या..
संपली अता बहार थांबवू नको मला! .... हे ही छान.

चार दीस च्या ऐवजी चार दिवस हे बरे होईल असे वाटते.

संपली अता बहार थांबवू नको मला! वा! वा!

सहाव्या शेरात वृत्त पहावे.

मी स्वतःस जुंपणार - हा शेर आवडला.

'चाललो निघून मी' परी तुझी गझल दिसे
वाटताच बोलणार, थांबवू नको मला

-बेफिकीर!

चार दीस मैफलीत थांबलो गडे तुझ्या..
संपली अता बहार थांबवू नको मला!

सहाव्या शेरात एक लघु गिळलाय.....
धुंद आज चांदणे, धुंद रूपही तुझे' च्या ऐवजी
धुंद आज चांदणे नि धुंद रूपही तुझे' बसेल.

चांगली आहे गझल.

अगदी कुलकर्णी घाटणीची.

आपला,
(तौलनिक) धोंडोपंत

सर्वांचे मनापासून आभार!

स्वच्छ ना कुणी करील आत जाउनी स्वतः
हे गटार तुंबणार...थांबवू नको मला!
वा!

चार दीस मैफलीत थांबलो गडे तुझ्या..
संपली अता बहार थांबवू नको मला!
वा!

गझल छान झाली आहे.