ओल

मनी काय होते, जनी काय केले?
तुम्ही येउनी या जगी काय केले?

तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले

मला वेगळा काय पर्याय होता?
तरी वाटते - हाय मी काय केले!

पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"

मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे
स्मरेना खरे मी कधी काय केले

खरे चेहरे का कधी पाहिले मी
कसे ओळखावे - कुणी काय केले

तशी काळजाला बरी ओल आहे
विचारू नका पण तरी - काय 'केले'

-- पुलस्ति

गझल: 

प्रतिसाद

२, ३, ४ उत्तम. सफाई आहे. दुसर्‍या शेरातल्या पहिल्या ओळीतला 'हो' टाळता आला तरपहा. इतर सुटे मिसरेही चांगले आहेत. जसे तुम्ही येउनी या जगी काय केले?, 

पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"
हा तर डोळ्यासमोर प्रसंगारूपाने उभा राहतो!!!
छान गझल पुलस्ति.
-आभाळ :)

पहीले सहाही शेर अप्रतिम, सहज स्फुरल्यासारखे आहेत. छान गझल.
शेवटच्या शेरात 'तसा काळजाला बरा ओल आहे ' की 'तशी काळजाला बरी ओल आहे'?
दोन्ही वृत्तात बसतात. पण तुम्हाला पहील्या ओळीत काही वेगळा अर्थ अभिप्रेत आहे काय?
अभि

"तुम्हाला कधी मी कमी काय केले?" हे वाक्य देवघरातून आल्यासारखे वाटते. पण दुसरी अर्थछटाही आहेच.

मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे
स्मरेना खरे मी कधी काय केले
एकदम छान!

सुंदर गझल.
मला वेगळा काय पर्याय होता?
तरी वाटते - हाय मी काय केले!
पुन्हा कोपर्‍यातून आवाज आला
"तुम्हाला कधी मी कमी काय केले?"
हे जबरदस्त! सहज गझल.
वायफळ बडबड :
'मला श्रेय मिळते - भल्याचे , बुर्‍याचे' - जागी
'म्हणे न्याय होतो - भल्याचा, बुर्‍याचा' - कसे वाटेल?
तसा दोष असतो कधी हो कुणाचा - ऐवजी -
तसा दोष नसतो कधीही कुणाचा - कसे वाटेल?
 (माफ करावे!)

'तसा दोष नसतो कधीही कुणाचा' - अगदी हाच मिसरा मला आधी सुचला होता! पण तो मी का बदलला हे आता नीट स्मरत नाहिये. पण बहुतेक हाच मिसरा 'तसा दोष असतो कधी हो कुणाचा' ऐवजी जास्त चांगला होईल. त्याने चित्त यांनी सुचवल्याप्रमाणे भरीचा 'हो' सुद्धा टाळता येईल.
'श्रेय' ची तुमची सूचना विचार करण्यासारखी आहे पण... त्यात 'मला उगाचच श्रेय मिळत जाते' हे उतरत नाही पुरेसे. पुन्हा थोडा विचार करून बघतो.
आणि माफी कसली नाना? अशाच सुधारणा सुचवत राहा. ते आपोआप मनात कुठेतरी रुजते आणि माझ्यासारख्याला पुढच्या रचनांच्या वेळी उपयोग होतोच..
धन्यवाद,
पुलस्ति.

अभि, 'तशी काळजाला बरी ओल आहे'? - असेच हवे. माझा पतंग, ओल, दोर अशा काही शब्दांबद्दल असा घोळ होतो. क्षमस्व.
-- पुलस्ति.

वा वा छान.
मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे
स्मरेना खरे मी कधी काय केले

उत्तम. 
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com