लोचट आशा, नेक निराशा, एक उसासा जीवन

लोचट आशा, नेक निराशा, एक उसासा, जीवन
ही अभिलाषा, ती अभिलाषा, हाच दिलासा जीवन

वाट जशी मी काढत होतो मुक्त, मनस्वी होण्या
त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीवन

एक नको ती लाट म्हणाली 'ये चल माझ्यासोबत'
सागरकाठी तडफडणारा व्याकुळ मासा .... जीवन

'जन्म कुठे अन अंत कधी' हातातच नाही जेथे
दैव सगे देईल जसे त्यांच्यातच नासा जीवन

दौलत, ईभ्रत मिळवत बसणे, शेवट नाही याचा
गूढ लढाई लावत हसते, ठेवत प्यासा जीवन

वाट अशी की भान न राही 'साफ मने करण्याचे'
एक उरे पर्याय खुला, मृत्यूतच घासा जीवन

वाटत होते काय मला अन काय तुझे हे झाले?
बास करू 'बेफिकिर' तुझे हे पोकळ वासा जीवन

गझल: 

प्रतिसाद

पहिले तीन शेर खरोखर काबिले तारीफ!

दैव सगे देईल जसे त्यांच्यातच नासा जीवन ही ओळ समजली नाही.
बाकी गझल उत्तम वाटली.

एक नको ती लाट म्हणाली 'ये चल माझ्यासोबत'
सागरकाठी तडफडणारा व्याकुळ मासा .... जीवन

शेर नाही सव्वाशेर आहे!

वा:
एक वेगळीच मस्त गझल आहे!
आपला हा दैनंदिन निर्भेसळ आणि प्रतिभासम्पन्न गझलांचा रतीभ खरोखर कौतुकास्पद आहे!

वाट जशी मी काढत होतो मुक्त, मनस्वी होण्या
त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीवन......

फारच छान सुटकेची वाटचाल !

"माणसाची ' आशा ' ही एक आश्चर्यकारक साखळी आहे,
तिने जखडलेले सुटकेसाठी धडपडतात, आणि मोकळे असलेले मात्र पांगळे वाटतात. "_ अशा अर्थाच्या संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.

वाट जशी मी काढत होतो मुक्त, मनस्वी होण्या
त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीवन
वा! गझल आवडली.

सर्वांचा आभारी आहे.

प्रतिसादांनी उत्साह आला.

*लोचट आशा, नेक निराशा, एक उसासा, जीवन
ही अभिलाषा, ती अभिलाषा, हाच दिलासा जीवन*****

वाट जशी मी काढत होतो मुक्त, मनस्वी होण्या
त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीवन

त्याच गतीने धावत होते टाकत फासा जीव***

एक नको ती लाट म्हणाली 'ये चल माझ्यासोबत'
सागरकाठी तडफडणारा व्याकुळ मासा .... जीवन

व्याकुळ मासा .... जीवन****

अप्रतिम म्हणजे अप्रतिमच शेर!!!

विदेश,

ते सुभाषित असे आहे.

आशानाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला
बद्धा यया प्रधावन्ती मुक्तास्तिष्ठन्ती पंगुवत

हबा!

आपला आभारी आहे.

लोचट आशा, नेक निराशा, एक उसासा, जीवन
ही अभिलाषा, ती अभिलाषा, हाच दिलासा जीवन

अप्रतिम शेर!!!