आयुष्य खूप गेले,

आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
आडून आसवांच्या थोडा हसेन म्हणतो

शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

न्यायालयी कसा मी निर्दोष आज सुटलो?
आता नवे पुरावे गोळा करेन म्हणतो

रस्तेच वाट चुकले, ना दोष पावलांचा
गावात याच परक्या आता वसेन म्हणतो

ती आमिषे जगाची नव्हती कधीच खोटी
खोटे तुझे इशारे पण मी फसेन म्हणतो

माझ्याच काळजाचा आता लिलाव आहे
बोली तुझी कितीची तेही बघेन म्हणतो

---------------------------------------------------
जयन्ता५२
(इतरत्र प्रकाशित)

गझल: 

प्रतिसाद

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो..
या शेराचा 'फील' फार आवडला.

छान आहे ही गझल.

छान, स्वच्छ गझल! दुसरा व शेवटचा शेर जरा नेहमीच्या कल्पनांचे वाटले. बाकी सगळे एकदम फ्रेश वाटले. अभिनंदन!

तू काव्य एरवीचे पाहू नकोस माझे
दीपावलीस खाश्या गझला करेन म्हणतो

-बेफिकीर!

व्वा जयन्तराव ! क्लास ! मजा आली ! उत्तम !

श्वास शेर विशेष आवडला!!

आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
आडून आसवांच्या थोडा हसेन म्हणतो

सुरेख मतला! म्हणतो या अंत्ययमकामुळे मुळातच एक ' आता तरी असे करेन म्हणतो' असा काहीसा आर्त भाव निश्चीत होतो. खूपसे आयुष्य गेल्यावर आता कुठे जरासा जगेन असा विचार कवीच्या मनात जागत आहे. ही मनस्थिती गझलेला फार शोभते. खरे तर, 'आयुष्य खूप गेले' ही पहिली ओळ व 'आता जगेन म्हणतो' ही दुसरी ओळ असली तर जास्तच छान वाटावे असे वाटले. त्यामुळे काही बदल करावे लागतीलच. दोन्ही ओळी चांगल्या असूनही काही वेळा शेर तितकेसे अस्वस्थ करत नाहीत. याचे कारण हे असते की एक संपूर्ण कल्पना कवी दोन्ही ओळीत आकर्षक किंवा भेदकरीत्या विभागून न मांडता दोन वेगवेगळ्या कल्पनांना दोन ओळींत स्थान देतो. खूप आयुष्य निघून गेले आहे, आता जरा जगावे... ही एक कल्पना आहे व परिपूर्ण कल्पना आहे. अश्रूंच्या आडून (आडूनमधे 'अश्रू असणारच आहेत, पण मी जरा त्यांना चुकवून हसेन असा भाव छान आला आहे.) हसेन म्हणतो ही एक वेगळीच कल्पना आहे. म्हणजे, 'जे काही खूप आयुष्य गेले' ते आसवांमधे गेले असे पहिल्या ओळीत जाणवत नाही. ते कदाचित संसाराच्या रहाटगाडग्यात गेले असावे असा विचार सुरुवातीला मनात येतो. त्यामुळे, शेरात एकच कल्पना दोन्ही ओळीत विभागून मांडल्यास जास्त भिडते असे मत लिहावेसे वाटले.

शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो

दुसरी ओळ फार सुरेख आहे. तसेच, ती ओळ 'प्रेयसी' या 'तू'च्या पहिल्या ओळीत प्रामुख्याने जाणवणार्‍या अर्थापासून 'तू' ला जरा मोकळे करते. म्हणजे, हा 'तू' कुणीही असू शकते. याच पद्धतीने, सर्व ओळींमधील व्यक्तींबाबतचे निर्देश जरा अस्पष्ट ठेवण्यामुळे एक वेगळीच मजा येऊ शकते. म्हणजे, 'मी' म्हणजे 'कवी' हे वाचकाला सरळ जाणवणारच! पण 'तू' म्हणजे 'कोण' हे ज्याच्या त्याच्यावर सोडण्याइतके शेर खुले ठेवणे ही एक मजा आहे. एकंदर या शेरात 'शर', 'काळीज' हे काही फारसे भिडले नाहीत. मनावरील जखम असेही म्हणता येईल! शर म्हणजे बाण किंवा तीरच म्हणण्याला तसा विशेष संदर्भ वाटत नाही.

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

या शेरातील पहिल्या ओळीत 'जगी' या शब्दाचे प्रयोजन नसावे. 'जगी या' ऐवजी 'कधीही', किंवा 'उधळून टाकले मी' वगैरे शब्दप्रयोग केले जाऊ शकतात. शेरातील शब्दरचना 'रिप्लेसेबल' न होऊ देणे हे एक कौशल्य मानले जावे. दुसरी ओळ सहज बोलल्यासारखी व छान आहे. अतिशय छान आशयाचा शेर!

न्यायालयी कसा मी निर्दोष आज सुटलो?
आता नवे पुरावे गोळा करेन म्हणतो

यात कवीला काय म्हणायचे असावे याचा अंदाज आम्हाला तरी आला नाही. एक तर 'आपण निर्दोष कसे सुटलो' हा एक असामान्य प्रश्न कवीला पडला आहे. यामधे 'आपण निर्दोष सुटणे शक्यच नव्हते' याबाबतची एक मजबूत खात्री आढळते. त्यानंतर कवी पुरावे गोळा करण्याच्या विचारात आहे. आता 'पुरावे कसले गोळा करणार आहे' असा प्रश्न आपण स्वतःला विचारला की पहिल्या ओळीच्या अनुषंगाने पहिले उत्तर मन देते ते म्हणजे 'मला निर्दोष सोडणे कसे चूक होते हे सिद्ध करणारे पुरावे'! कवीला कशातून निर्दोष सुटायची इच्छा नाही हे काही समजत नाही. म्हणजे, हमरस्त्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून जात असताना 'मैल निदर्शक' पाट्या असतात त्यावर जर एखाद्या पाटीवर नुसताच 'एखादी दिशा दाखवणारा बाण' असला, म्हणजे त्या बाणाच्या दिशेला गाव कुठले आहे हेच पुसले गेलेले असले तर कसे वाटेल? म्हणजे, बाण आहे हे समजले, त्या बाणाच्या दिशेला एक गाव आहे हेही समजले, किलोमीटरही कळले, पण कोणते गाव आहे ते मात्र समजले नाही. असे काहीतरी! हा शेर मात्र निर्दोष सुटता कामा नये अशी आमची प्रार्थना!

रस्तेच वाट चुकले, ना दोष पावलांचा
गावात याच परक्या आता वसेन म्हणतो

व्वा! अप्रतिम कल्पना! 'ये मेरे ख्वाबोंकी दुनिया नही सही लेकिन.. अब आगया हू तो सोचा कयाम करता चलू' हा शेर आठवला. अर्थात, कवीने रचलेला शेर वेगळा व आम्ही दिलेल्या शेराहून खूपच सुंदर आहे. अतिशय सुंदर शेर!

ती आमिषे जगाची नव्हती कधीच खोटी
खोटे तुझे इशारे पण मी फसेन म्हणतो

दोन भिन्न कल्पना पुन्हा एकदा दोन ओळींमधे आल्यासारख्या वाटल्या. जगाची आमिषे खोटी नव्हती. याचा अर्थ जग जी आमिषे दाखवत होते ते लाभ मला होणार होते. त्यासाठी मला जगासाठी काहीतरी करावे लागणार होते. ही एक कल्पना झाली. तुझे इशारे खोटे असूनही मी फसेन ही एक वेगळीच कल्पना आहे. आता, 'तुझे इशारे खोटे असूनही मी त्यांना फसेन' पण 'जगाने दाखवलेल्या खर्‍याखुर्‍या आमिषांकडे मात्र ढुंकूनही पाहणार नाही' अशी कल्पना मांडायची असेल तर 'जगाची आमिषे खरी होती पण मी ती टाळली' यातील 'मी ती टाळली' हा भाव शेरात आल्यासारखा वाटत नाही. आता, 'हे काय अगदी स्पष्ट केलेच पाहिजे का' असा प्रश्न जर उपस्थित होणार असेल तर आम्ही काही बोलू शकत नाही.

माझ्याच काळजाचा आता लिलाव आहे
बोली तुझी कितीची तेही बघेन म्हणतो

पहिल्या ओळीत 'माझ्याच' या शब्दातील 'च'चे प्रयोजन समजले नाही. म्हणजे, आजपर्यंत मी इतरांच्या काळजांचे लिलाव करत होतो किंवा पाहत होतो, किंवा, आजपर्यंत तू इतरांच्या काळजांच्या लिलावात चांगल्या चांगल्या बोली लावत होतीस / होतास असे काहीतरी असल्यास माझ्या'च' मधील 'च' मान्य! तसेच, दुसर्‍या ओळीत 'तेही'चे प्रयोजन समजले नाही. तेही ऐवजी 'आता', 'मीही' वगैरे पर्याय न चालण्याइतपत 'तेही'चा काय संदर्भ आहे? म्हणजे, 'याशिवायही' काही इतर मी पाहणार आहे का? एकंदर फीलच्या दृष्टीने शेर पाहिला तर फारसा अस्वस्थ करणारा शेर वाटला नाही.

एकूण, गझल चांगली, एकांतात ऐकायला फार भिडणारी वाटेल अशी व सहज झाली आहे.

काही कमीजास्त लिहिले गेल्यासारखे वाटल्यास माफी!

सुरेख!
शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो
खास शेर!

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

वा जयंतराव वा वा

क्या बात कही है|

आहेत कनवटीला..... खूप छान झालाय.

शुभेच्छा

धोंडोपंत

शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो

वेगळेपणा नसला तरी छान. वरच्या ओळीमुळे शेर नेहमीचा वाटतो आहे.

सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

वा. कनवटीला श्वास असणे फार मस्त.

आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
खोटे तुझे इशारे पण मी फसेन म्हणतो

ह्या ओळीही छान. एकंदर गझल छान.

माझ्याच काळजाचा आता लिलाव आहे
बोली तुझी कितीची तेही बघेन म्हणतो

वा: वा:!
सुंदर गझल!

शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो

माझ्याच काळजाचा आता लिलाव आहे
बोली तुझी कितीची तेही बघेन म्हणतो

दोन्ही शेर आवडले.