खुशाली

एकेक स्वप्न मातीतुन उगवत जाते
मी आठवणींचे वावर तुडवत जाते

तू समोर येता गीत नवे रुणझुणते,
शब्दांत तुझ्या स्पर्शांना रुजवत जाते

टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा,
नात्यांची विरली वाकळ उसवत जाते

काही न बोलता गुन्हेगार ठरलेली
मी, मान तुकवते; मलाच फसवत जाते

पोटिची भूक चंद्रात भाकरी बघते,
व्याकुळ मन त्यातुन कविता फुलवत जाते

प्रतिबिंबाआडुन काळ खुणावत जातो,
की पिसाट नियती हासुन रडवत जाते?

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

गझल: 

प्रतिसाद

वा वा वा!
गझल अतिशय आवडली. सगळेच शेर.
सोनाली

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

झकास शेर आहे.

मान तुकवण्याचा सुद्धा मस्त आहे शेर. पुन्हा वाचल्यानंतर मतलाही आवडला.

धन्यवाद

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

अप्रतिम शेर! खूप आवडला.
तसेच 'वावर' हा अगदी मातीतला शब्द वापरलात, त्याबद्दल अभिनंदन.

क्रान्ती,

उत्तम गझल!

अभिनंदन!

सगळे शेर आवडले.

या गझलेवरून चित्तरंजन यांच्या 'मी मिटून डोळे कविता जागत असतो'ची आठवण झाली.

-सविनय
'बेफिकीर'

आवडली. पण काही ओळी भावगीतासारख्या वाटल्या. तसेच अनेक ठिकाणी दीर्घचा ह्रस्व केला आहे. असे केलेले चालते का गजलेमधे?
स्वदेश कानिटकर

क्रांती, गझल चांगली झाली आहे. मथळा, शब्दांत स्पर्शांना रुजवणे, मक्ता विशेष. 'वाकळ'ही आवडली. 'टाके कधि तुटती, कुठे निसटतो धागा' ही ओळ अधिक चांगली होऊ शकेल असे वाटले. प्रतिबिंबाच्या शेर सफाईदार व्हायला हवा असे वाटले.

अवांतर:

३-४ वर्षांपूर्वी भाकरीवर दोन द्विपदी सुचल्या होत्या. त्या आठवल्या
का भुकेल्यांनी दळावी पौर्णिमा?
चंद्र का देईल त्यांना भाकरी?

पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे

'वावर' आणि 'खुशाली' वरून वरून माझी एक ४-५ वर्ष जुनी गझल आठवली.

घर असो कसेही ते घर होते
डोक्यावरती तर छप्पर होते!

तू कळवलीस पत्रात खुशाली,
पण उदास अक्षर अक्षर होते


तो प्रश्न म्हणुनही मुश्किल होता,
तुज ठाउक माझे उत्तर होते!

मग आठवणी येतात कुठुनश्या,
मग वेळ अचानक कातर होते

ह्या पावलांतुनी सुगंध घुमला
(ते काट्यांचेही वावर होते!)

ते सगळे वरवरचेच उमाळे
आतून स्मितांचे अस्तर होते

आयुष्य म्हणाले नाही नाही
हो, म्हणावयाला जर-तर होते

आपण कसे/काय लिहायचो आणि कसे/काय लिहीत आहोत हे ह्यानिमित्ताने कळते.

मतला व पत्राचा शेर उल्लेखनीय.

टाक्याचा, प्रतिबिंबाचा आणि भुकेचा शेर...या तीनही शेरात लय मिळत नाही.
प्रतिबिंबाच्या शेरात अर्थाचे पुरेसे सूचन नाही.

भौगोलिक वातावरण व मनोव्यापारांचा मतल्यात जो मिलाफ साधलेला आहे, तो केवळ विलोभनीय.
कवयित्री आठवणींचे वावर तुडवीत आहे. ती वावरातून नुसतीच जात नाही. ती वावरातून केवळ आजूबाजूची सुंदर दृष्ये पाहतही जात नाही. तिच्या जाण्यात भूतकाळ अपरिहार्यपणे मागे टाकणे, आहे. अपरिहार्य वाट नेहमी तुडवली जाते. त्या वाटेने रमतगमत जाता येत नाही. पणतीला निरोप देतात तसाही ती भूतकाळातील घटनांना निरोप देत नाही तर अक्षरशः एकेका घटनेला स्वतःच्या जीवनमार्गातून दूर करत निग्रहाने पुढे जात आहे.
हे करत असताना ज्या वावराला ती तुडवत जात आहे, त्याच वावरातून नवी स्वप्ने पाहत जात आहे. तुडविली जाणारी भुईच नवी स्वप्ने उगवून तिच्या प्राक्तनाच्या झोळीत टाकीत आहे, हे कवयित्रीला माहीत आहे.
त्यामुळे तिचे तुडविणे एकाचवेळी त्रासदायक आणि आल्हाददायकही होत आहे.
वावर आणि माती या निराळ्या शब्दांच्या वापराने वैविध्य साधता साधता मनोदिशा एकच ठेवण्यातही कवयित्रीला यश मिळालेले आहे.
अभिनंदन !

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

सुंदर,,,
एकूण एक शेर आवडला..
तुमच्या गझला नेहमीच भिडतात...
पुलेशु..

भन्नाट ....आवडली

कधितरी तुला लिहिलेले पत्र बिचारे,
माझीच खुशाली मलाच कळवत जाते

चित्तरंजन,

आपल्या आठवणीतील आपले सगळे जुने शेर आवडले.

कृपया प्रकाशित करावेत अशी विनंती!

केवढी भूक लाघवी आहे - हा तर सुपर्ब!

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद! केदार, मतल्याच्या अतिशय मर्मग्राही रसग्रहणाबद्दल शतशः धन्यवाद! चित्तरंजन, आठवणीतल्या सगळ्या द्विपदी आवडल्या.

@ क्रान्ति,
छानच झालीये गझल!

@चित्तरंजन,
आपली ४-५ वर्षांपूर्वीची गझल आणि ३-४ वर्षांपूर्वीच्या द्विपदी दोन्ही उत्कृष्ट आहेत!
पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे

हा शेर तर थेट हृदयाला भिडतो! केवळ सुंदर!