सुतक

रोज ओवी कोण गाते?
नित्य दळते धूळ जाते

आसवांच्या मुद्दलीचे
मी उघडतो रोज खाते

काजव्यांनी रात्र जळते
अन दवावाचून पाते

थोर बाणांची उधारी!
घेतले उसनेच भाते

संशयाचे विष नसावे
तू हवे तर तोड नाते

मृगजळाचे व्यसन सोपे
सत्य अवघड,लाच खाते

उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?

 

 

गझल: 

प्रतिसाद

उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?
बहोत खूब,
मात्र
आसवांच्या मुद्दलीचे
मी उघडतो रोज खाते
हा शेर काही रुचला नाही...आसवांत नहाणा-या उर्दू शायरचा वाटतो,आधुनिक भाषेत आहे एवढेच.

सुतक बरोबर की सूतक?
उंबर्‍याला काय त्याचे
कोण येते कोण जाते

असं असतं तर??

धन्यवाद समीर.
अभिजीत,
'सुतक' असे असेल तर...
उंबर्‍याल सुतक नाही...
कोण येते कोण जाते?
असे करता येईल ना?
पण 'सूतक' असेच असावे बहुधा...

"सूतक" बरोबर आहे.
गझल आवडली! तोड नाते आणि उंबराचा शेर मस्तच आहे!!
-- पुलस्ति.

काल माझ्या कविता पाहताना मला
आसवांच्या मुद्दलीचे
मी उघडतो रोज खाते
असं काहीसं म्हणणारा शायर दोनेक ठिकाणी दिसला. पूर्वी असं बरं वाटायचं. पण आजकाल रुचत नाही. 

मलाही तुम्ही जाणीव करून दिल्यानंतर हा शेर बाऊन्स झालेल्या चेकसाराखा  फालतू गेला असे वाटते आहे...
असो... हे 'खाते' बंद करून टाकतो...
तोच तोच पणा गझलेला घातक आहे हे एकदम मंजूर!!!
नाविण्य हवेय... जगण्याचे अनुभवविश्व वृद्धिंगत होत जाईल..तसे नाविण्यही...
पण सध्या 'खाते' बंद!
असंच मार्गदोषदर्शन करा ही विनंती.
-आपला आभाळ :)
 

गझल मस्त आहे, आभाळा.
पण "सुतक" मधला सु र्‍हस्व हे नक्की!
सुत = मुलगा / पुत्र
सूत = धागा किंवा सूत = घोडे सांभाळणारा. (सूतपुत्र कर्ण)
सुत जे करतो ते = सुतक ?
असो. बाकी -
उंबर्‍याला सुतक नाही...
कोण येते कोण जाते? - हे ही छानच!
 
 

 बोलीभाषेत याला सुतुक म्हणतात ,त्यामुळे ह्रस्व दीर्घ बदलल्याने फरक पडत नाही.शिवाय कविता आणि  प्रुफरिडिंग या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?
सुंदर !

आभाळ,
'छोटी बहर' आवडली.

रोज ओवी कोण गाते?  - हा मिसरा अप्रतिम.
नित्य दळते धूळ जाते .. धुळीनं थोडी निराशा केली. मला दुसरा समर्पक शब्द मात्र मिळत नाहीये.  मात्र दळते नित्य जाते असं केलं तर?
आसवांच्या मुद्दलीचे
मी उघडतो रोज खाते
- हा शेर आवडला. मुद्दल पुल्लिंगी असतं (मुद्दलाचे हवं होतं), असं वाटलं.
उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?
- वा! वा! वा!
- कुमार

वा आभाळा. छोट्या वृत्तातील छान ग़ज़ल.
उंबर्‍याला काय सूतक?
कोण येते, कोण जाते?
वा.

उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल आधी दिलगिरी व्यक्त करतो. गझल सुंदर आहे, सफाईदार आहे.

सुतकाबद्दल म्हणाल तर अर्थावर आघात न करता कवीला शुद्धलेखनाचे नियम सहज पाळता येत असल्यास जरूर प्रयत्न करावा, असे माझे मत आहे.

धन्यवाद चित्त...आणि दिलगीरी कशाची हो?
तुमचे प्रतिसाद नेहमीच लिहिणार्‍याला विचारप्रवृत्त करतात आणि मार्गदर्शनही.

शुद्धलेखनाविषयी सहमत. शब्दांची/अक्षरांची पायतोड न करता गझलेची बांधणी होणे महत्वाचे.
धन्यवाद कुमार,
मतल्याच्या सानी मिसर्‍यात धूळीनं निराशा केलीय त्याबद्दल क्षमस्व.
'मात्र दळते नित्य जाते'
हा बदल छान आहे...पण 'मात्र' चे प्रयोजन समजत नाहीये...पर्यायी शब्दासाठी विचार करतो आहे.
-आपला आभाळ :)

भूत दळते नित्य जाते... किंवा गात फिरते नित्य जाते.
आपली एक सुचवण!

ओवी नाही गायली तरी चालेल हो...
पण भूताला जात्यावर नका बसवू....
'गात फिरते नित्य जाते' हा बदल आवडला.
 पण उला मिसर्‍यात 'गाते' हा काफिया आल्याने ..पुन्हा सानी मिसर्‍यात 'गात फिरते...' कसे वाटेल??
पाहूयात तरी...विचार करतोय..
-धन्यवाद :)
 

आभाळा, कांही गैरसमज झालेला दिसतोय.
भूत म्हणजे ते पांढरे, तरंगणारे, मानगुटीवर बसणारे नव्हे...
भूत म्हणजे भूतकाळ  - मनात तरंगणारा, हृदयात घर(घरघरही) करणारा!
असो...

'गात फिरते नित्य जाते' हा बदल आवडला.
 पण उला मिसर्‍यात 'गाते' हा काफिया आल्याने ..पुन्हा सानी मिसर्‍यात 'गात फिरते...' कसे वाटेल??
माझ्या मते पुनरुक्तीने शेर अधिक परिणामकारक होत असेल तर बिनदिक्कतपणे पुनरुक्ती करावी.