मंत्र

जगण्यास मंत्र व्हावा माझेच गान आता
अन् पावलास यावे रस्त्यात भान आता

सत्यास लाटले या लाचार पंडितांनी
लपले कुठे सुखाने संतप्त ज्ञान आता ?

तलवार वा सुऱ्याने मज मारता कशाला ?
शब्दास धार लावा तुटण्यास मान आता.

माझी खरी कहाणी तू ऐकली कशाला ?
दु:खास आसवाचे देशील दान आता !

कैदी जरी असे मी कविता न कैद माझी
लाखो मुखात साध्या राखील स्थान आता

मातीत सांडले ते माझेच रक्त होते
फुलले म्हणे अचानक ओसाड रान आता

मौनावरीच माझ्या चर्चा जनात चालू
एकान्त बोलतो मज ,बोले स्मशान आता

गझल: 

प्रतिसाद

वा! मस्तच!
मातीत सान्डले ते माझेच रक्त होते
फुलले म्हणे अचानक ओसाड रान आता

हा विशेष आवडला!

जरा शुद्धलेखनाच्या चुका संपादित करा ना!
वाचताना नजर अडतेय तिथे.

ओसाड रान आता - हा शेर चांगला आहे.

बाकी:

पहिल्या 'मिसर्‍याचा' दुसर्‍या 'मिसर्‍याशी' संबंध, 'अंत्ययमकाचा' प्रत्येक 'सानी मिसर्‍याशी' संबंध, शुद्धलेखन, आशयाची स्पष्टता यात (मला तरी ) काही ना काही तफावत जाणवली.

कृपया माफ करावेत.

आहेच लाभलेला अर्थास मान आता
तू आण छानशी बस तंत्रास शान आता

-सविनय
'बेफिकीर'!

प्रतिसादा बद्दल सर्वाचे आभार्-गझल नसेल कदाचित कवितातरी आहे हे मन्य केल्यबद्दल
सविनय्-----प्रशान्त

मस्त गझल... (गझल असेल असं गृहीत धरलंय, तंत्र तपासलं नाहीये..)
गझलेची धार प्रत्येक शेरात दिसली, म्हणून आवडली...
अख्खी आवडली..

ही गझलच आहे आणि उत्तम आहे.
मला आवडलेले....

सत्यास लाटले या लाचार पंडितांनी
लपले कुठे सुखाने संतप्त ज्ञान आता ? दुसरी ओळ फारच छान.

माझी खरी कहाणी तू ऐकली कशाला ?
दु:खास आसवाचे देशील दान आता ! छान.

कैदी जरी असे मी कविता न कैद माझी ... खरे आहे.

मातीत सांडले ते माझेच रक्त होते
फुलले म्हणे अचानक ओसाड रान आता हा शेर तर जबरदस्त.

मौनावरीच माझ्या चर्चा जनात चालू पहिली ओळ छान.
एकान्त बोलतो मज ,बोले स्मशान आता

आनंदयात्रीजी ,अजय जोशीजी आभार!
प्रशांत वेळापुरे