एवढे फिरून..

===================
"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले

चाललो धरून दाट सावली मनातली,
मी मला उन्हात ना कधीच आजमावले..

मी फुलायची मिजास बाळगू तरी कशी?
रोपटे नवीन मी कुठे अजून लावले?

काय ही रसायने अबोल पापण्यांमधे-
तू भरून पाहता, मला भरून पावले!

खोल ते घड्याळ, आज शोध घेऊया जरा
कोणत्या पळात प्रेम नेमके दगावले?

-ज्ञानेश.
====================

गझल: 

प्रतिसाद

सगळेच शेर छान आहेत. बर्‍याच दिवसाच्या गॅपनतर आपली गझल वाचायला मिळाली याचा आनंद झाला.

छान गझल! रोप लावणे व रसायने हे शेर सुरेख आहेत.

शेर खूप चांगले पुन्हा पुन्हा मि वाचले
का 'कमावलेस' यातल्या 'स' ला ठकावले?

-सविनय
'बेफिकीर'

तंत्र चान्गले जमलेले आहे. पण माफ करा ज्ञानेशजी की मला फारशी नाही आवडली ही गजल.
- स्वदेश कानिटकर

खोल ते घड्याळ, आज शोध घेऊया जरा
कोणत्या पळात प्रेम नेमके दगावले?

वा! अगदीच खास!
सगळ्याच द्विपदी आवडल्या, पण ही अधिक आवडली!

काय ही रसायने अबोल पापण्यांमधे-
तू भरून पाहता, मला भरून पावले!

खोल ते घड्याळ, आज शोध घेऊया जरा
कोणत्या पळात प्रेम नेमके दगावले?

अप्रतिम..! सुरेख..!
खूप छान..!

मतला, तिसरा, चौथा व पाचवा शेर...छान.

जळातले रसायन यासारख्या शब्दप्रयोगामुळे एक निराळी अनुभूती मिळते. एकाच वेळी दोन गोष्टी कळल्यासारख्या होतात. पाण्यात कवीला काहीतरी निर्मळ दिसतं तर शास्त्रज्ञाला एच टू ओ.
संगीता जोशींच्या एका गझलेत शंभरावर पाच कोटी असे लिहिलेले आहे. शेर तर होतोच शिवाय संख्या डोळ्यांसमोर येते.

पळात शब्दप्रयोगाचा चातुर्याने वापर केला गेला आहे. घड्याळाशी पळांचा संबंध आहे, क्षणांचा नाही. वास्तविक, सेकंद हा पळ ही असतो आणि क्षणही असतो.

...हरवलेले क्षण असे शोधता येत नाहीत, पण घड्याळ खोलून बघू या काही मिळतंय का...?

प्रतिसादाबद्दल सगळयांचे आभार.

वा....
सुं....द....र...

"एवढे फिरून सांग काय तू कमावले?"
थांबताच मी, मला विचारतात पावले
या ओळी फार छान.

रस्तेभर रो रो के हमसे पूछा पाँव के छालों ने....
हे आठवले.
छान.