पुन्हा केव्हातरी
संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी!
"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या,
सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी
झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी
दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!
सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"
आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
बुध, 16/09/2009 - 23:07
Permalink
आयुष्य शोभादर्शकाच्या
आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
व्वा! सगळी गझलच सुरेख आहे! मस्त!
प्रत्येक ओळीला हवे स्वातंत्र्य अर्थाचे..... बघा,
दुसरा नि पंचम 'द्वी'पदी... बोलू पुन्हा केव्हातरी
उत्तम निघाली बांधणी अन अर्थसुद्धा चांगला
ही 'बेफिकिर' 'मतदर्शने' रोखू पुन्हा केव्हातरी...
-सविनय
बेफिकीर!
विश्वस्त
गुरु, 17/09/2009 - 14:05
Permalink
"सांगू पुन्हा केव्हातरी"
वा! साधेपणा-सहजपणा, बोलकेपणा फार देखणा आहे. एकंदरच ही स्वरयमकांची गझल चांगली झाली आहे.