गातो तुझेच गाणे

माझे न हे तराणे! गातो तुझेच गाणे
लांगूलचालनाचे हेही नवे बहाणे

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

पुष्पक नको अम्हाला! इथल्या पुरेत गाड्या
झाले खरेच सोपे स्वर्गात आज जाणे

गझल: 

प्रतिसाद

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

फार छान! बाहेरच्या नसते तरी चालून गेले असते असे वाटून गेले. सुखांचे तसे असणे कळते आहेच. स्पष्टता चांगलीच; पण अर्थाला अगदी चमच्याने भरवणे(स्पूनफीडिंगही) नको. बाहेरच्या ह्या शब्दाऐवजी अर्थवृद्धी करणारा एखादा शब्द आल्यास उत्तमच. अर्थात ही तारेवरची कसरत आहे. आणि ह्या कसरतीची मजा वेगळीच.

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

वा! मळमळ ओकून टाकणे आणि पचनी पडणे एकत्र चांगले आले आहे.

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

छान. खालच्या ओळीतही प्रश्न विचारायला हवा होता असे मला वाटले. देवा तूच सांग तुझे नाणे चलनात आहे का असे काहीतरी..

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

वा..सहज.

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

वाव्वा! आवडले.

एकंदर गझल आवडली हे सांगणे न लगे.

व्वा!

मिलिंदराव उत्तम गझल!

चित्तरंजन यांच्या 'बाहेरच्या' या शब्दाबाबतच्या मताशीही सहमत आहे.

तुझ्याप्रमाणे, देवा तुझेच नाणे व मुजोर ठाणे हे शेर फार आवडले.

असतात धूमकेतू अगदी तुझ्याप्रमाणे
झुरतात आजही पण काही तुझे दिवाणे

- सविनय - बेफिकीर!

गझल आवडली

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

सु रे ख...

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

- छान. खालची ओळ मस्त.

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

- सुंदर शेर. नवी कल्पना. गोटीबंद बांधणी.

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

- सु रे ख. 'खरेच खोटे'मधील बारकावा सुंदर.

पुढील लेखनाला मनापासून शुभेच्छा.

प्रतिसाद दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद...

चित्त सुचवण्या आवडल्या

'बाहेरच्या' वर विचार करतो...

तसेच 'देव' शेरात खालची ओळ पण प्रश्नार्थक हवी होती हे पटले... थोडा प्रयत्न केला पण जमले नाही

अजून विचार करतो त्यावर

भूषण : तुम्ही शेर लिहून दिलेली दाद आवडली

गझल फारच आवडली. दु:ख उदासवाणे बसले असल्याची ओळ तर कायम लक्षात राहीलशी!

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

प्रचंड आवडला हा शेर.
एकूण गझल मस्तच.

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

वा! सही गझल!

घरटे जुनेपुराणे आणि मक्ता दोन्ही विशेष आवडले.
सोनाली