करून झाले

त्याने जे जे सांगितले ते करून झाले
वार्‍याशी लावून शर्यती फिरून झाले

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते
झाले तितके विरोध सारे घरून झाले

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे-माझे वाद एवढ्यावरून झाले

काट्यांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला,
झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले

काहीही दिसले नाही, जे नकोच होते,
आठवणींचे कपाटही आवरून झाले

आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला,
कोसळणारे डोलारे सावरून झाले

गझल: 

प्रतिसाद

त्याचे माझे वाद एवढ्यावरून झाले.

आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला

हे दोन्ही शेर फार आवडले.

माझ्यामते, लवकरच आपलीही पुलस्तींप्रमाणे इ-पुस्तिका निघायला हरकत नाही. तितके गांभीर्य, सातत्य व गुणवत्ता निश्चीतच आहे आपल्या गझलांमधे! नावीन्य (आशयाचे ) मात्र सतत तपासायला हवे असे माझे नम्र मत!

(मात्र, त्याआधी आपल्या सर्व गझला निर्दोष करून ठेवाव्यात. ई-पुस्तिकेमधे दोष असलेल्या गझला असणे हे कवीसाठी व स्थळासाठीही योग्य नाही. ज्ञानेशनेही खरे तर किरकोळ दोष काढून टाकायला हवेत असे वाटते.)

असो, चु. भु. द्या. घ्या व अंतिम निर्णय विश्वस्तांचाच याची जाणीव आहे.

क्रान्ती,
गझल आवडली....

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते
झाले तितके विरोध सारे घरून झाले

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे-माझे वाद एवढ्यावरून झाले

छान गझल, क्रांति!
मुख्यतः 'विरोध' आणि 'कपाट' हे शेर!

पण आपल्या संमतीने लहान तोंडी मोठा घास घेतो:
वृत्ताबद्दल काही शंका होत्या. उदा:

"त्याने जे जे सांगितले ते करून झाले" याचे वृत्त (माझ्या अल्पमतीनुसार):
गागागागा गागागागा लगालगागा
पण
"वार्‍याशी लावून शर्यती फिरून झाले" याचे वृत्त दिसते आहे:
गागागागा गालगालगा लगालगागा

बाकी शेरांमध्ये पण असे जाणवते. उदा:
"झाले तितके विरोध सारे घरून झाले"
गागागागा लगालगागा लगालगागा

अशी मात्रांची सवलत (बेरीज बरोबर, पण वजन नाही) गझल मध्ये चालते का? हा सर्वांना प्रश्न. माझ्या मर्यादित माहितीनुसार चालत नाही. कृपया निरसन करावे ही विनंती!

नेहमीप्रमाणे चू. भू. दे. घे.! धन्यवाद.

माध्यमांचे साध्य करणे व्यर्थ आहे
आशयाची शर्थ इतका अर्थ आहे

सविनय

-बेफिकीर

ज्ञान विश्वाचे कुणी मिळवू नये का?
शेवटी सारेच त्याप्राप्त्यर्थ आहे...

ध्येय लोकांची किती भंडावणारी....
मी इथे असणेच बहुधा व्यर्थ आहे

क्रान्ति!

आपल्या गझलेखाली मी दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व. पण माझी जिज्ञासा खरीखुरी आहे याची हमी देऊ इच्छितो! (या प्रकारची चर्चा करावी की नाही याबाबत माहिती नसल्याने मी थोडा गोंधळात पडलो आहे. विश्वस्तांनी खुलासा केल्यास तो प्रमाण मानून त्यानुसार आचरण करीन.)

याशिवाय महत्वाचे म्हणजे, आपल्या गझलेची चर्चा बाजूला ठेवून उगाच इतरांशी 'शेरेबाजी' करत'बसलो याबद्दल माफी मागतो! परत असे होणार नाही.

परत सविनय धन्यवाद!

जे जे केले क्रांतीजींनी, ठीकच झाले
'मात्रावृत्ताला' ते सारे धरून झाले

गझल आवडली क्रांती!
माघारीचा शेर तर अप्रतिम आहे!!!

ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते
झाले तितके विरोध सारे घरून झाले

फार छान!

माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे-माझे वाद एवढ्यावरून झाले

वाव्वा!

काहीही दिसले नाही, जे नकोच होते,
आठवणींचे कपाटही आवरून झाले

वाव्वा! साधा आणि चांगला.