कचरा

ही स्वानुभवावर आधारित गझल आहे, जरी विडंबनात्मक वाटली तरी!
खरोखरच हडपसरातला कचरा डेपो (नाक दाबून) पाहण्यासारखा आहे :)
==================================
हडपसराच्या वाटेवरला कचरा डेपो कचरा खाउन पोट भरेतो फुगतो आहे
धडधडणारा पिवळा वेटर कढई उलटी सांडुन त्याची सोय उद्याची करतो आहे

येथ कवीला स्फूर्तीसाठी आकाशीच्या बगळ्यांच्या माळेशी नाही देणेघेणे
झुकझुकगाडी डुकरांच्या रांगेची केली, खंडाळ्याच्या घाटामध्ये फिरतो आहे

एक दुचाकीस्वार सिटावर बसल्याबसल्या हेल्मेटातच यमनाची करतो मनधरणी
दाद मिळाली नाकापाशी दुर्गंधाची, गंधाराचा साज गळ्यातच गळतो आहे

पाउसओल्या जखमा अंगी बाळगणार्‍या रस्त्यावरती कोणी करतो डांबरपट्टी
मरण्यापूर्वी 'डेड' ठरविल्या दूरध्वनीच्या केबलसाठी कोणी थडगे खणतो आहे

गांधीजींच्या आकांक्षांचा 'स्टांप' बनवला, शिक्के मारुन मारुन त्याचा केला कचरा
होतकरूंच्या जंत्रीवरती ठोकुन शिक्का लोकसभांच्या कचराकुंड्या भरतो आहे

रचनाकर्ता असलेला किंवा नसलेला बहुधा करतो अनंत काळापासुन खाडे
सत्याचे गल्लीरस्ते आच्छादुन गेले, कचरा विश्वाचा उघड्यावर सडतो आहे

कविता करता करता बहुधा 'अलख निरंजन' उपडी करतो डोक्यामधली कचराकुंडी
कचरा कुठला, कविता कुठली, काय कळेना, पाहुन इकडे जो तो नाक मुरडतो आहे

गझल: 

प्रतिसाद

गांधीजींच्या आकांक्षांचा 'स्टांप' बनवला, शिक्के मारुन मारुन त्याचा केला कचरा
होतकरूंच्या जंत्रीवरती ठोकुन शिक्का लोकसभांच्या कचराकुंड्या भरतो आहे
तुमची लांबलचक मात्रावृत्तातली गझल जरी विडंबनात्मक वाटली तरी फार आवडली. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

पूर्ण आदरपुर्वक,

कृपया व्यक्तिगत घेतले जाऊ नये. मात्र, या अशा 'गझला' (?) कृपया प्रकाशित करू नयेत असे मनापासून वाटते. बाकी कवीचे स्वातंत्र्य व प्रकाशकांच्या अधिकाराचा आदर आहेच.

आशय - अजिबात आवडला नाही.
अभिव्यक्ती - आवडली नाही.
उत्साह - आवडला.
प्रामाणिकपणा व आशयाची सत्यता - दोन्ही फार आवडले.

भट साहेब आणि कटककर साहेब,

आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!

मागे एकदा एका मित्राने कविता ही स्वानुभवावर आधारितच असली पाहिजे असे भाष्य केले होते. त्याला उत्तर म्हणून ही गझल माझ्या रोजच्या प्रवासाच्या अनुभवावर आधारली. त्यालाही आशय आवडला नाही, पण मलाही माझा अनुभव आवडला नव्हता :) मग तडजोड म्हणून "पूर्णपणे स्वानुभवावर आधारण्याची गरज नाही, काही काल्पनिक बाबी चालतील" असा त्याच्याकडून संकेत आल्यावर अशा कविता करणे सोडून दिले. त्यामुळे आता अशा गझला येणार नाहीत ही आशा बाळगतो :)

यातून एक प्रतिप्रश्न - जर अनुभवच सुंदर नसेल तर त्यावर काव्य न केलेलेच बरे असा गझल बाबतीत तरी अलिखित संकेत आहे का? कळावे.

अजिबात नाही.

कुठलाही अनुभव गझलेत असावा असे माझे वैयक्तिक मत! मात्र, गझलेतील विचार गझलेसारखा येणे व द्विपदीतील संदेश हा अनुभुतीशी / अनुभुतीच्या कल्पनेशी निगडीत असणे हेही माझ्यामते आवश्यक आहे.

पुर्णपणे सामाजिक, देशभक्तीपर, नुसतीच शृंगाराची वर्णने अशी गझल नसावी हे माझे वैयक्तिक मत असून आपण ते स्वीकारावेत असा आग्रह नाही.

भटांचे 'माझ्या कवितेचा प्रवास' व तत्सम लेख वाचून त्यातून त्यांची काही महत्वाची मते लक्षात येतात गझलबद्दल! ती कृपया वाचावीत. अर्थात, ती आपण वाचली असतील किंवा आपण 'गझल रचणे' या प्रवासात बरेच पुढे असाल तर माफी!

मात्र, बाराखडीत भटसाहेबांनी गझलेची केलेली व्याख्या ही 'फक्त गझल तंत्र म्हणजे काय हेही ज्यांना माहीत नव्हते' त्यांच्यासाठी असावी असे मला वाटते तर त्यांच्या या स्थळावरील इतर लेखांमधून 'गझल' म्हणजे फक्त तंत्र नाही असे त्यांनी कळकळीने सांगीतलेले दिसते. मी दुसर्‍या मताला स्वीकारले आहे, अर्थातच, तंत्र बाणल्यानंतर!

चु. भु. द्या. घ्या.

शुभेच्छा!

कोथरुड ते हडपसर हा प्रवास रोज टू अ‍ॅन्ड फ्रो मीही करतो. मात्र, कृपया कधीही कुणाचेही सल्ले घेऊन कविता करू नयेत असे मैत्रीपूर्ण प्रतिपादन! (अगदी, माझा वरच्या प्रतिसादात मी दिलेला सल्लाही घेऊ नयेत.) :-))

गझलला मात्र तंत्र आहे व ते आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता नाहीच!

चु. भू. द्या. घ्या!

मात्र, या अशा 'गझला' (?) कृपया प्रकाशित करू नयेत असे मनापासून वाटते.

अशाप्रकारचे प्रतिसाद अजिबात स्वागतार्ह नाहीत. इथे नव्याने गझल लिहू लागलेल्यांना जमेल तसे, शक्य तिथे प्रोत्साहन देणे हे संकेतस्थळाचे एक उद्दिष्ट्य आहे.

माझ्यामते कविता ह्या पूर्णपणे स्वानुभवावर असतातच असे नाही, असायला हव्यातच असे नाही. इतरांचे अनुभव, कल्पनाविलास कवितेत आल्यास वावगे नाहीच.

नव्या गझलकारांना तुमची मत'प्रदर्शने' बघून भंजाळायला होईल. जरा दमानं.

मान्य आहे!

विश्वस्त महोदय व श्री. चित्तरंजन,

आपले दोघांचेही मुद्दे अर्थातच मान्य आहेत.

माझं बरेच वेळा चुकतंच!

अशी मत'प्रदर्शने' होणार नाहीत याबद्दल खात्री बाळगावीत.

धन्यवाद!

(यापुढे प्रतिसाद म्हणून फक्त शेर देत जाईन.)

परत सर्वांच्या मताबद्दल अनेक धन्यवाद!

कटककर साहेब,
आपल्या मताचा आदर करतो. माझ्या मतामध्ये काही वावगे वाटले असल्यास क्षमस्व!
आपल्या बोलण्यात तंत्राचा उल्लेख आला. माझ्या वरील गझल मध्ये ज्या तांत्रिक चुका आपल्याला दिसल्या असतील, त्या कृपया जरूर कळवाव्या. त्यामुळे मला तंत्र सुधारायला मदत होईल, कारण मी इथे फक्त आपल्यासारख्या जाणकारांकडून शिकायला आलो आहे!

धन्यवाद!

मी कवी नाही मला माहीत आहे
फालतू मी, फालतू अवडंबरे ही

कटककर साहेब,

मी फालतू हा अभिप्राय प्राप्त झाला. त्याबद्दल अनेक धन्यवाद! याचा अर्थ अजून सुधारणेचा बराच वाव आहे असा घेतो :))

"...फालतू मी फालतू अवडंबरे ही"
बोचणारे शब्द 'ते' देऊन गेले
काळजाची टांगली मी लक्तरे ही

तू कसा आहेस ते सांगीतले कोठे तुला मी?
वर्णनाला मी स्वतःच्याही तसा अपुराच आहे

वा! वा! क्या बात है!

काय ऐकावे कुणाचे? काय बोलावे कुणाला?
सोबतीला कोण घ्यावे? शोध हा अधुराच आहे...

ही गझल वाचून फार गम्मत आली !!!

ज्याप्रकारे मा़झा दिवस गेला होता.....त्यात ही रचना वाचून पहिल्यांदा हसलो आणि आनंदित झालो....!

हेच या गझलेचं यश !

जीयो अलख !

अशा गझला सुचल्या तर रचायला आणि येथे प्रकाशित करायला काहीच हरकत नाही असे मला वाटते....

येथे आम्ही सामान्य रसिक नव्या चांगल्या गझलांचा आस्वाद घ्यायला येतो....त्यामुळे येथील वातावारण नेहमी गम्भीर व अभ्यासू असावयासच हवे असे नाही !

कृपा करून तुमच्या उर्मींना रो़खू नका ! ह्या तुमच्या गझलेने मला हलके वाटले....आभारी !

अनेक धन्यवाद, श्रीवत्स!!

तुम्ही दिलेल्या धीराने मला हलके वाटले :))

'कविता करता करता बहुधा 'अलख निरंजन' उपडी करतो डोक्यामधली कचराकुंडी'

एकुण रचना... छा$$$$न.