मी शशीची कोर व्हावे
मी शशीची कोर व्हावे
मुक्त रानी मोर व्हावे
खूप उंडारून झाले
की स्वतःचा दोर व्हावे
कोण लावे नाव मागे?
मीच अल्लड पोर व्हावे
जाग आली, स्वप्न होते
'बेमुरव्वतखोर व्हावे'
माणसे चरली मनावर
आज आपण ढोर व्हावे
बास झाले रोज रुसवे
एकदा घनघोर व्हावे
गप्प मी, नादामधे ती
प्रेमही चतकोर व्हावे?
काळजी माझी कशाला?
माणसांनी थोर व्हावे
आवरेनासा मला मी
त्यात मी शिरजोर व्हावे?
मित्र शत्रू एक झाले
मी कुणाचा जोर व्हावे?
जीव तू व्हावेस माझा
मी जिवाचा घोर व्हावे
आशयाचे गाव, येथे
'बेफिकिरसा' चोर व्हावे
गझल:
प्रतिसाद
पुलस्ति
बुध, 26/08/2009 - 02:29
Permalink
छान! घनघोर आणि चतकोर शेर फार
छान!
घनघोर आणि चतकोर शेर फार आवडले!!
चित्तरंजन भट
बुध, 26/08/2009 - 20:14
Permalink
जाग आली, स्वप्न
वा! हा शेर फार आवडला. घनघोर, चतकोरही.
ज्ञानेश.
गुरु, 27/08/2009 - 17:02
Permalink
जाग आली, स्वप्न
जाग आली, स्वप्न होते
'बेमुरव्वतखोर व्हावे'
बास झाले रोज रुसवे
एकदा घनघोर व्हावे
गप्प मी, नादामधे ती
प्रेमही चतकोर व्हावे?
हे शेर आवडले. 'बास' ऐवजी 'फार' किंवा 'खूप' कसे वाटते?
कोण लावे नाव मागे?
मीच अल्लड पोर व्हावे
". . . . . . . . . . . . ."
भूषण कटककर
गुरु, 27/08/2009 - 20:18
Permalink
पुलस्ति, चित्तरंजन व
पुलस्ति, चित्तरंजन व ज्ञानेश,
आभार! प्रतिसादांनी उत्साह आला.
ज्ञानेश,
'बास ऐवजी फार किंवा खूप कसे वाटते?' - हा आपला प्रश्न!
उत्तर -
खूप = अ लॉट
फार = टू मच
बास = इनफ ( अर्थात, हे तुम्हाला माहीत नाही असे मुळीच म्हणायचे नाही.)
अर्थातच, मला इनफचीच छटा अभिप्रेत होती.
".................."
क्रान्ति
रवि, 30/08/2009 - 12:51
Permalink
गझल आवडली. जीव तू व्हावेस
गझल आवडली.
जीव तू व्हावेस माझा
मी जिवाचा घोर व्हावे
खूप खास!