न्यास

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

गझल: 

प्रतिसाद

फार छान! क्रान्ति, हे शेर खूप छान वाटले.

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

या शेरात अभिव्यक्ती संदिग्ध वाटली.

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

(मतला समजला नाही.)

क्रांती,
गझल आवडली.

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
सुरेख.

भन्नाट
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

मोह्तरमाह,... - क्रान्तिजी,
वाह वाह्, बहोत खूब...
मा.भूषणजींच्या बरोबर मी ही सहमत....छान गझल.
` ख़लिश '-वि.घारपुरे/२१-०८-२००९

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

छान.

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,

ही ओळ फार छान आहे. खालची ओळ भरतीची वाटली. 'सक्तमजुरी आणि कारावास होता' हे वृत्तात वाचायला मात्र मजा येते आहे.

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

छान.

धन्यवाद मंडळी.
चित्तरंजन, सक्तमजुरीच्या ओळीबद्दल अगदी सहमत! असेच मोलाचे मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा.