मुखवटा घातल्यानंतर

किती झाले तरी भासे कमी झाले
तुझेही जीवना आता अती झाले

तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले

किती बाहेरचा झालो घरामध्ये
अता ऐकून घेतो जे घरी झाले

उगाचच जागरण झाले तुझे माझे
तिथे तू आणि मी येथे तरी झाले

जगापाशीच होते चांगले पैसे
खिशामध्ये जमवले, दगदगी झाले

मलाही चालते आता 'तुझे नसणे'
तुझेही केस थोडे रेशमी झाले

करावा पंचनामा विश्व-जन्माचा
कुणी केले, कसे केले, कधी झाले?

तुला भेटून हा परिणाम झाला की
मला जे भेटले ते ते कवी झाले

मनावर पायधुळ झाडून जाताना
तुलाही वाटले ना, 'एकटी झाले'?

मुखवटा माणसाचा घातल्यानंतर
किती गुणगान माझे या जगी झाले

कुणी इतिहास लिहिला काळजीने हा?
म्हणे की 'बेफिकिर' नाही कुणी झाले

गझल: 

प्रतिसाद

भूषणजी, वाह वाह. छान गझल. सारेच शेर आवडले..

पण हे विशेष.....
मनावर पायधुळ झाडून जाताना
तुलाही वाटले ना, 'एकटी झाले'?

मुखवटा माणसाचा घातल्यानंतर
किती गुणगान माझे या जगी झाले

` ख़लिश '-वि.घारपु रे/२१-०८-२००९.

काही सुट्या ओळी फार छान आहेत.

तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले

किती बाहेरचा झालो घरामध्ये
अता ऐकून घेतो जे घरी झाले

हे शेर छान आहेत.

करावा पंचनामा विश्व-जन्माचा
कुणी केले, कसे केले, कधी झाले?

जन्माचा पंचनामाही करतात का! खालची ओळ आवडली. वरची ओळ अजून सुधारता येईल बहुधा.

तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले

वा! गझल आवडली.

चित्तरंजन,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपले हे मत!

जन्माचा पंचनामाही करतात का! खालची ओळ आवडली. वरची ओळ अजून सुधारता येईल बहुधा.

मृत्यूचा करतात म्हणूनच मला असे वाटले की आपण जन्माबाबत तसे लिहावे. तसेच, असेही म्हणावेसे वाटले की ( पंचनामा ही एक सर्वसाधारणपणे 'दुर्घटनेची' केली जाणारी बाब आहे असे समजून ) 'विश्वनिर्मीती' ही एक दुर्घटना आहे असा विचार लिहावा. तरी, आपले मत वाचल्यानंतर माझी मूळ शब्दरचना तपासून एक सुचलेला बदल इथे लिहीत आहे. त्याबाबत आपले मत कळावे.

हवे होते कुठे हे विश्व कोणाला?
कुणी केले, कसे केले, कधी झाले?

खलिश, चित्त, क्रान्ती - आभार! प्रतिसादांनी उत्साह आला.

तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले

वाहवा! बढीया शेर!

घराचा शेरही चांगला आहे :)