पुन्हा
वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा?
वाहते वारे विनाशाचे पुन्हा
यायचे नव्हते तुला येथे कधी,
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?
वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा?
कोरडे रडणे, उमाळे बेगडी,
दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा?
सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?
बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?
गझल:
प्रतिसाद
प्र...मोद
मंगळ, 04/08/2009 - 10:45
Permalink
डाव
बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?
व्वा..!
ज्ञानेश.
मंगळ, 04/08/2009 - 11:28
Permalink
सुंदर!
अभिनंदन क्रांतीताई.
एक से बढकर एक गझलांचा धडाका लावलाय नुसता!
वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा?
वाहते वारे विनाशाचे पुन्हा.. छान.
('वाहती' हवे ना?)
वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा?
बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?
हे तीन शेर आवडले.
पुलेशु.
भूषण कटककर
मंगळ, 04/08/2009 - 14:36
Permalink
रदीफ.
क्रान्ति, काही नम्र मते देत आहे. कृपया राग नसावा.
वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा?
वाहते वारे विनाशाचे पुन्हा - दोन ओळींचा संबंध लक्षात आला नाही.
यायचे नव्हते तुला येथे कधी,
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा? - छान! ( पुन्हा ऐवजी अता हवे असे वाटले.)
वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा? ( रदीफेचा संबंध लक्षात आला नाही.)
कोरडे रडणे, उमाळे बेगडी,
दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा? - ( कुणाचे किंवा कसले दु:ख ते लक्षात आले नाही.)
सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा? ( 'केव्हा व पुन्हा' किंवा नुसत्या 'पुन्हा'चे प्रयोजन लक्षात आले नाही.)
बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? - (यातही पुन्हाचे प्रयोजन लक्षात आले नाही.म्हणजे, पुन्हा शिवायच शेराचा अर्थ पूर्ण होत आहे असे वाटले.)
माफी!
क्रान्ति
शनि, 08/08/2009 - 18:08
Permalink
अर्थ
ज्ञानेशजी, धन्यवाद. 'वाहती वारे' असं मूळ संहितेत लिहिलं होतं, टंकलेखनात चूक झाली.
भूषणजी, आपल्या प्रश्नांची उत्तरं. [थोडा उशीर झाला, कार्यव्यस्ततेमुळे काही दिवस जालावर येऊ शकली नाही.]
१] जेव्हा विनाश, सर्वनाश दिसू लागतो, तेव्हा अंधार हवाहवासा वाटतो, प्रकाशात जाण्याची भीती वाटते. इथे किंवा मतल्यातही विनाश आणि नाश हे शब्द चुकांचे अनिष्ट परिणाम अशा अर्थाने देखिल आलेले आहेत. विनाशाची चिन्हं दिसताहेत, म्हणून काळोखात रहावं वाटतंय.
२] या गझलमधले सगळेच शेर हे एकच परिस्थिती वारंवार आल्यावर तिच्यावरची प्रतिक्रिया अशा स्वरूपात आलेले आहेत. इथे यायचं नाही असं सांगून न येण्याचे खोटे खुलासे करणं, हे एकदा घडून गेलेलं आहे, आणि तेच परत घडत आहे, म्हणून 'पुन्हा' चं प्रयोजन.
३] जो केवळ वादळांवर स्वार होतो, ज्याचं आयुष्य वेगवेगळी वादळं, कठीण आव्हानं पेलण्यात जातं, तो बव्हंशी एकाकी रहातो. एकदा त्याची साथ दिलेला कोणीही पुन्हा त्याच्या सोबत जाण्याचा विचार करत नाही. अशा व्यक्तीला आपला लढा एकट्यानेच लढावा लागतो.
४] रडण्याचं, खोटे उमाळे दाखवण्याचं नाटक करून झाल्यावर पुन्हा खूप दु:ख झाल्याचे फसवे उसासे कशासाठी? सांत्वनातली कृत्रिमता, खोटेपणा मांडणारी ही द्विपदी आहे. ब-याच वेळी हा प्रकार होतो आणि तो अत्यंत क्लेशकारक असतो. [दु:ख नको पण सांत्वन आवर असा काहीसा!]
५] वस्तुतः फाशावर सोंगट्या अवलंबून असतात, फासा जसा पडेल, तसं त्यांचं दैव बदलतं. पण इथे सोंगट्यांच्या खेळीमुळे फासा अडकला आहे, असा अर्थ आहे. सोंगट्यांनी ही खेळी कधी केली, [जी आधीही कधी केलेली होती] आणि फासा पुन्हा कसा त्यात फसला, हे केव्हा आणि पुन्हा चं प्रयोजन आहे.
६] पुन्हा एकदा माझ्या नाशाचं [चुकीच्या अनिष्ट परिणामांचं ] मूळ शोधताना मीच गुन्हेगार ठरते. माणूस आपल्या चुकांचे माप नेहमीच दुस-यांच्या पदरात घालायचा प्रयत्न करत असतो, पण आपल्या मनाला तो फसवू शकत नाही. चार बोटं आपल्याकडे वळलेली असतात, आणि हे वारंवार होत रहातं, म्हणून इथेही 'पुन्हा!'
थोडक्यात या अर्थानं ही गझल आलेली आहे. काही स्वानुभव तर काही परदु:ख यांचं मिश्रण अशा स्वरुपात. इथे गझलमागची भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
चित्तरंजन भट
रवि, 09/08/2009 - 01:55
Permalink
मतला आणि
मतला आणि शेवटचा शेर फार आवडले. दुसरा आणि तिसराही छान.आवडला. एकंदर गझल आवडली.
कल्पना नव्या नाहीत. असल्याच पाहिजेत असेही नाही. किमान लहजा आणि प्रतिमा नव्या असल्यास उत्तम. पण शेर चांगले जमले आहेत. 'वादळाहातीच ज्याचे होडके' ही ओळ प्रसन्न शेंबेकर ह्यांच्या 'वादळाहातीच आता नाव देतो' ह्या ओळीची आठवण करून देणारी आहे.
'यायचे नव्हते तुला येथे कधी,का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?' हा शेर कविवर्य सुरेश भटांच्या 'राग नव्हता तुझ्या नकाराचा, चीड आली तुझ्या बहाण्याची' ह्या द्विपदीची आठवण करून देणारी असली तरी चांगली आहे, सफाईदार आहे.
क्रान्ति
शुक्र, 14/08/2009 - 20:05
Permalink
धन्यवाद चित्तरंजन.
धन्यवाद चित्तरंजन.
ॐकार
रवि, 23/08/2009 - 16:13
Permalink
यायचे नव्हते तुला येथे
यायचे नव्हते तुला येथे कधी,
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?
छान!
परंतु ह्या रचनेत म्हणावी तशी गझलीयत नाही( हे माझे वैयक्तिक मत). गझलियत म्हणजे नक्की काय ह्याची व्याख्या मला तरी करता येणार नाही. गुलाबाचा सुवास जसा व्याख्येत मांडता येणार नाही तसे काहीसे. राग नसावा.