जरा गर्दी जमेपर्यंत........

प्रकाशाचे पुरे साम्राज्य सुस्तीला दिले
निशेचे घेतले काळोख, मस्तीला दिले

जुने होते बरे की काय आता वाटते
तुझ्यापाशी उगाचच मन दुरुस्तीला दिले

कुठे घेऊन गेलो देह माझा शेवटी?
मिळाले सर्व जे वस्तीत, वस्तीला दिले

दिले सोडून केव्हाचेच रुंजी घालणे
तुझ्यामागे मनाला फक्त गस्तीला दिले

हसू येते अता, नामानिराळा राहिलो
सुवर्णाची गदा, लंगोट कुस्तीला दिले

असावे पुण्य नरकातील काही आपले
म्हणूनच जन्म देवाने प्रशस्तीला दिले

तसा मृत्यूच आहे चित्रपट, .....जीवन कुठे?
जरा गर्दी जमेपर्यंत पुस्तीला दिले

गझल: 

प्रतिसाद

दुसरा शेर छान आहे.

जुने होते बरे की काय आता वाटते
तुझ्यापाशी उगाचच मन दुरुस्तीला दिले

कुठे घेऊन गेलो देह माझा शेवटी?
मिळाले सर्व जे वस्तीत, वस्तीला दिले

मस्त !

"दुरुस्ती" हा शेर आवडला. थोडा हजलीश वाटतो.
कुस्ती, प्रशस्ती समजले नाहीत.

('पुलस्ति' या काफियावरून एक वात्रट शेर सुचला मघाशी.. पण नकोच!)

चित्तरंजन व वैभव - आभारी आहे.

ज्ञानेशः

१. आभार!
२. कुस्ती - इतरांच्यात मारामारी लावून मी नामानिराळा राहिलो याचे हसू येत आहे.
३. प्रशस्ती - नरकात असताना काहीतरी पुण्य केले असणार, त्यामुळे हे जन्म देवाने बक्षिस म्हणून दिले आहेत, असे म्हणायचे होते. मी विशेष विचार करत नाही शेरांवर! करायला हवा हे मला मान्य आहे.
४. पुलस्ति या काफियावर वात्रट शेर सुचणे - आपल्याला काय सुचावे यावर नियंत्रण असू शकत नाही. तसेच, आपल्याला जे सांगायचे आहेत ते आपण सांगून टाकलेच आहेत. तेव्हा, शेर दिलात काय अन नाही दिलात काय! अजून 'आपल्याला जे सुचले आहे ते वात्रट आहे' हे लक्षात येत आहे हे चांगले आहे असे माझे आपले एक मतः-))

जुने होते बरे की काय आता वाटते
तुझ्यापाशी उगाचच मन दुरुस्तीला दिले

दिले सोडून केव्हाचेच रुंजी घालणे
तुझ्यामागे मनाला फक्त गस्तीला दिले

वाहवा! शेर अगदी आवडले. क्या बात है!

दुरुस्ती मलाही आवडला!!