जायचे आहे कुठे पण?
आणले भानावरी खालावलेल्या प्रकृतीने
चालली होतीस केव्हाचीच तू माझ्या गतीने
उभयपक्षी कलम प्रस्तावात आले, मान्य झाले
'पाळुया याच्यापुढे कंत्राट दंडाच्या भितीने'
"आजही आहे तुला संधी कुणाचे व्हावयाची"
मी कुठे दिसलो तुला तर सांग हे माझ्यावतीने
कोण कोणाच्यामुळे या राहणीमानात आहे...
स्पष्ट झाले केवढे त्या एवढ्याश्या पावतीने
आज मागे पाहिले की वाटते झाले कसे हे?
शक्य दिसते काढणे आयुष्य माझ्या संगतीने
या समाजाच्यापुढे हा प्रश्न आलेला नसावा
व्हायचे कोणी कुणाचे का कुणाच्या संमतीने?
आजही होऊन गेली वेळ येण्याची तुझी बघ
आजही आकांत केला लोचनांच्या आरतीने
हा जमाना वैभवांचा, भेट देणे शेकडोंची
तो जमाना लाघवांचा, चकित होणे किंमतीने
एक पश्चात्ताप माझे पिंड आच्छादेल बहुधा
'वागणे जमलेच नाही एकदाही इभ्रतीने'
जो स्वतःबाहेर केव्हाही नसावा पोचलेला
तो जगावा वा मरावा, काय मागावे सतीने?
माणसे होती तशी सच्ची मनाने, ठीक आहे
जायचे आहे कुठे पण.. लाभलेल्या सद्गतीने?
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शुक्र, 31/07/2009 - 13:01
Permalink
आजही होऊन
आजही होऊन गेली वेळ येण्याची तुझी बघ
आजही आकांत केला लोचनांच्या आरतीने
वा!
भूषण कटककर
शुक्र, 31/07/2009 - 14:10
Permalink
आभार
धन्यवाद चित्तरंजन!
अॅक्च्युअली या गझलेतील 'शेवटचा सोडून' सर्व शेर हे खर्या अनुभवांवर आहेत. पण शेरांवर आशयाशिवाय मी काही विचार केला नव्हता. तेही बघायला हवे!
खलिश
शुक्र, 31/07/2009 - 18:59
Permalink
आजही होऊन
आजही होऊन गेली वेळ येण्याची तुझी बघ
आजही आकांत केला लोचनांच्या आरतीने
हा जमाना वैभवांचा, भेट देणे शेकडोंची
तो जमाना लाघवांचा, चकित होणे किंमतीने
भूषण साहेब, वाह वाह, बहोत खूब, आफरीन.......
` ख़लिश ' - वि ठ्ठल घारपुरे/३१-०७-२००९.
( एक शंका: आपण ` चकित' ह्या शब्दात, च आणी कि, ह्या दोन लघूं चा एक गुरू मोजला आहे का ? )
क्रान्ति
शनि, 01/08/2009 - 08:12
Permalink
गझल आवडली.
माणसे होती तशी सच्ची मनाने, ठीक आहे
जायचे आहे कुठे पण.. लाभलेल्या सद्गतीने?
हा शेर खूप आवडला.