ह्या कशा उबदार ओळी...

ह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?"
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा !

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
"काय आम्ही वारलो का?" देव खेकसले पुन्हा

ही गज़ल लिहिताच आला सर्रर्रकन काटा जुना
मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा

"आयला ! असला कवी नाहीच झालेला !" म्हणे
आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा

गझल: 

प्रतिसाद

मतला, आक्रसणे, फसणे, बसणे, ठसठसणे वा!...सगळी गझल चांगली झाली आहे.  आवडली. मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा ही ओळ फार फार आवडली. विकतचे दुखणे ठसठसणे ही कल्पनादेखील. नियमावलीला कागद भावला नसावा. किंवा कागदांना नियमावली भावली नसावी. म्हणून कायद्यांना धाब्यावर बसावेसे वाटायला हवे होते असे वाटून गेले.

हम्म!
वेगळीच गझल केलीत यावेळी.

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
"काय आम्ही वारलो का?" देव खेकसले पुन्हा

"आयला ! असला कवी नाहीच झालेला !" म्हणे
आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा

हे आवडले.

ही ओळ व मोगरा जाई जुई आवडले.

मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा :-)

यावेळी एवढी नाही आवडली गझल!

छान...
बह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?"
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

ही हझल आहे.

मला वाटली तशी ही रचना हझल नाही हे चित्तरंजन यांच्या प्रतिसादावरून दिसते. मला मिश्कील विनोदी म्हणजे हझल वाटत होते.

गझलेत 'एखादा' शेर हझलस्वरुपाचा असू शकतो का? की आली तर संपूर्ण रचनाच हझलेसारखी असावी लागते? कृपया सांगावेत.

धन्यवाद!

ही हझल नाही. ही चांगली नर्मविनोदी, मिश्किल अशी गझल आहे असे म्हणता येईल. (तसाही हझल हा काव्यप्रकार वर्गीकरणात उपलब्ध करून दिलेला आहे. कवीला तो निवडता आला असता.) माझ्यामते हझल ही अधिक बोचरी आणि हास्योत्पादक असते. आज बेडा पार पांडू!
ही हझल वाचावी.

तो काव्यप्रकार वर्गीकरणात आहे हे खरे आहे.

हझलेत सहसा कोणते विषय असू शकतात तेही कृपया सांगावेत.

धन्यवाद!