विसावा

जगाया माणसाला अन्न, पाणी अन् विसावा लागतो?
उपाशी झोपताना फक्त आवंढा गिळावा लागतो

निभावावे कसे बेरोजगारांच्या जुन्या गर्दीमधे?
स्वतःचा जीवही कवडीपरी येथे विकावा लागतो

शिवाजी काय होता जाणण्याचा काय आहे फायदा?
शिवाजी फक्त होता आमचा हा वाद व्हावा लागतो

किती गेला पुढे हा देश नुसत्या कागदांवरती पहा
सुखी होण्यास नुसता सूख असल्याचा दिखावा लागतो

कसा झटक्यात येथे योजनांचा बोजवारा वाजतो
अरे, पेन्शन मिळाया प्राण असल्याचा पुरावा लागतो

नवे नाहीच काही होतसे अन्याय होताना अता
जराशी बातमी येण्यासदेखिल जीव जावा लागतो

जगदिश

गझल: 

प्रतिसाद

जगदीश,

छान सामाजिक गझल! विशेषतः, शिवाजीचा शेर आवडला.

मतल्यातील दोन ओळींचा संबंधाची नेमकी छटा जाणवली नाही, कदाचित माझे अपयश असावे.

( बाकी, सामाजिक विषय गझलेत कितपत असावेत / नसावेत हा ज्याचा त्याचा प्रश्नच आहे.)

पेन्शनचा शेर वेगळाच व भिडणारा!

किती गेला पुढे हा देश नुसत्या कागदांवरती पहा
सुखी होण्यास नुसता सूख असल्याचा दिखावा लागतो

या शेरावरून ज्ञानेशच्या 'जाहला बराच वेळ' मधील

............फुगीर आकडे नकाच दाखवू......
रोज येथल्या चुलीचुलीत अन्नही शिजायला हवे - हा शेर आठवला.

आपले अभिनंदन!

@ भुषण.
मतल्यात मला असे म्हणायचे आहे की,

जगण्यासाठी माणसाच्या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्या लागतात का?
तसे तर उपाशीच झोपणारे बरेच लोक आहेत
(नुसता आवंढा गिळून उपाशीच झोपलेलंही चालतं !)
हे उपहासात्मक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

जमलं नाहीये असं वाटतय का? अजून मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो.

प्रतिसादासाठी आभारी आहे.

(चु. भु. द्या. घ्या.)

ही रचना आवडली.
शिवाजीचा शेर तर सणसणीत चपराक..

शेर अजून सफाईदार होणे शक्य आहे.
चित्तरंजन यांची मदत घ्यावी.

.केदार पाटणकर

छान्...गझल आवडली
शिवाजी काय होता जाणण्याचा काय आहे फायदा?
शिवाजी फक्त होता आमचा हा वाद व्हावा लागतो

किती गेला पुढे हा देश नुसत्या कागदांवरती पहा
सुखी होण्यास नुसता सूख असल्याचा दिखावा लागतो

कसा झटक्यात येथे योजनांचा बोजवारा वाजतो
अरे, पेन्शन मिळाया प्राण असल्याचा पुरावा लागतो

छान सामाजिक गझल.
कलोअ
चूभूद्याघ्या