तुझ्यानंतर
चालली ही माणसे सारी कुठे?
संपते ही वाट अंधारी कुठे?
कोण जो, नाही जुगारी जाहला?
माहिती कोणास, व्यापारी कुठे?
वाटतो मी दुःख पाण्यासारखे
पाहिली आहेच बेकारी कुठे?
दर्शनाची रांग येथे पोचली
जायचे होते तुझ्या दारी कुठे?
लक्ष्य आवाक्यात जेव्हा भासते
राहतो तेव्हा धनुर्धारी कुठे?
चित्रगुप्ता धाड माघारी मला
दुष्मनी झाली कुठे... यारी कुठे
मी तुझ्यानंतर उरावे ईश्वरा
एवढा आहेस तू भारी कुठे?
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 12/07/2009 - 05:24
Permalink
सहज आपला अर्थ देत आहे. लिहून ठेवला होता म्हणून
चालली ही माणसे सारी कुठे?
संपते ही वाट अंधारी कुठे?
जरी
सुर्याचे ऊन किंवा दिव्यांचा झगमगाट असला तरी पुढे काय होणार किंवा आपल्या
योजना सत्यात येणार की त्या आधीच आपण जाणार / आपले भवितव्य काय हे कुणालाच
माहीत नाही. ही झगमगलेली वाट खरे तर अंधारी आहे. लोक आपले बेभानपणे चालत
आहेत. मला प्रश्न पडतो की ते कुठे चालत आहेत. त्यांना माहीत नाही का की ते
मरणार आहेत?
कोण जो, नाही जुगारी जाहला?
माहिती कोणास, व्यापारी कुठे?
एखादा
जुगाराचा अड्डा असावा तसे जग आहे. लोक येऊन पैशाऐवजी आपले प्राण जुगारात
लावून सुखाची वाट पाहत आहेत. पण हा अड्डा काढणारा व्यापारी ( म्हणजे देव )
कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही.
वाटतो मी दुःख पाण्यासारखे
पाहिली आहेच बेकारी कुठे?
मी
सारखा लोकांना मनस्ताप / दु:ख का देतो बरे? कारण मला ते जगाकडून मुबलक
मिळत राहते. मी त्याबाबतीत जर कधी बेकारी पाहिलेलीच नाही तर जगाला सतत
दु:ख वाटत बसायला काय हरकत आहे? ( हा उपरोध आहे की मला जगाकडून दु:ख
मिळाले की मी जगाशी तसाच वागतो. खरे तर मी चांगले वागायला हवे.)
दर्शनाची रांग येथे पोचली
जायचे होते तुझ्या दारी कुठे?
मी
कधीच अस्तिक नव्हतो. पण तुझ्या देवळाची रांग इतकी लांबली की ती
माझ्यापर्यंत पोचली अन सगळ्यांना वाटले की मी त्याच रांगेत आहे. मला थोडेच
तुझ्या दारी यायचे होते? पण या जगापुढे निरुपाय आहे. मला तर हे जग
निर्मिणाया देवा, तुझा तिटकारा आहे.
लक्ष्य आवाक्यात जेव्हा भासते
राहतो तेव्हा धनुर्धारी कुठे?
माणूस ज्या सुखासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो ते मिळते तेव्हा त्याचा काळ आलेला असतो. मग काय उपयोग?
चित्रगुप्ता धाड माघारी मला
दुष्मनी झाली कुठे... यारी कुठे
हे
चित्रगुप्ता, मला यावेळेस मो़क्ष मिळावा म्हणून तू भूतलावर पाठवले होतेस.
पण पुन्हा माझे मन गुंतले. कुठे दुष्मनी तर कुठे दोस्ती झाली. आता परत मला
’न्युट्रल’ व्हायला जावे लागणार.
मी तुझ्यानंतर उरावे ईश्वरा
एवढा आहेस तू भारी कुठे?
उपहासात्मक
शेर! आपण काही देवाइतके मोठे नाही हे माहीत झाल्यावर झालेल्या जळफ़ळाटातून
हा ’ कोल्ह्याला द्रा़क्षे आंबट’ स्वरुपाचा विचार! ’हे देवा, तू काही इतका
महत्वाचा नाहीस की मी तुझा अंत होईपर्यंत मी उरावे व तुझी देखभाल करावी’
आशा आहे की हा अर्थ वाचकांना ठीक वाटावा.
ज्ञानेश.
रवि, 12/07/2009 - 11:21
Permalink
.
दर्शनाची रांग येथे पोचली
जायचे होते तुझ्या दारी कुठे?
छान शेर आहे.
अजय अनंत जोशी
सोम, 13/07/2009 - 10:40
Permalink
संपते ही वाट अंधारी कुठे?
वा! छान.
हेही घ्या.
आंधळ्या बनल्या हजारो बायका..
सापडेना आज गांधारी कुठे !
कलोअ चूभूद्याघ्या
चित्तरंजन भट
मंगळ, 14/07/2009 - 13:01
Permalink
मतला आणि दारी
छान. मतला आणि दारी आवडले.
क्रान्ति
शनि, 18/07/2009 - 22:40
Permalink
लक्ष्य
लक्ष्य आवाक्यात जेव्हा भासते
राहतो तेव्हा धनुर्धारी कुठे?
खास! सगळीच गझल [अर्थासह] आवडली.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}